Wednesday, April 17, 2019

स्टॅलिनचं कोंबडं

 स्टॅलिनचं कोंबडं 

डॉ. ह.  नि. सोनकांबळे 
dr. hanisonkamble@gmail.com

#या कथेचा भारतीय मतदारांशी काहीही संबंध नाही, असलाच तर तो एकमात्र योगायोग समजावा. 

एके दिवशी स्टॅलिन  एक कोंबडं  घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला,
कोंबड्याचं मुंडकं स्टॅलिनने आपल्या बगलेत दाबून धरले होते, 
आणि तो चालत चालत, त्या कोम्बड्याचे एक एक पंख उपसून काढत होता. 
कोंबडा जिवाच्या आकांताने ओरडत होता. तो स्टालिनच्या बगलेतून सुटका करू  पाहत होता. 
पण स्टॅलिन  त्याला न सोडता, त्याच्या ओरडण्याकडे लक्ष न देता, पंख उपसत होता. 
मंत्रिमंडळातले सदस्य स्टॅलिनला म्हणत होते, त्या मुक्या प्राण्याला असा त्रास देऊ नका, सोडा त्याला. 
पण स्टॅलिन कोणाचेही ऐकायला तयार नव्हता. 
शेवटी सर्व पंख उपसून झाल्यावर त्याने त्या कोंबड्याला खाली फेकले. 
आणि खिशातून काही दाणे काढून तो कोंबड्याला खाऊ घालू लागला. 
अशा अवस्थेत कोंबडा ते दाणे खाण्यासाठी पुन्हा स्टॅलिनच्या हाताकडे बघू लागला. 
स्टॅलिन देखील त्याला दाणे खाण्यासाठी जवळ बोलावू लागला आणि थोड्या वेळाने ते थोडेफार दाणे खाण्यासाठी तो कोंबडा स्टालिन जवळ येऊन बसला. इतका वेळ जो कोंबडा स्टॅलिन पासून सुटका करून घेत होता तोच कोंबडा चार दाण्यासाठी स्टॅलिन च्या पुन्हा जवळ बसला. 
मंत्रिमंडळातले सर्व लोक त्याला म्हणाले. की, हा काय प्रकार होता. 
त्यावर स्टॅलिन  म्हणाला, मतदार हे असेच असतात  साडे चार वर्ष आपण त्यांचे पंख  उपसायचे असतात आणि शेवटी सहा महिन्यात त्यांना चार दाणे टाकायचे असतात. 
या चार दाण्याच्या नादात हे मतदार साडेचार वर्षात आपण केलेला सर्व अन्याय विसरून जातात. 
आणि आपल्यालाच मतदान करतात. 

पुन्हा एकदा # या कथेचा भारतीय मतदारांशी काहीही संबंध नाही, असलाच तर तो एकमात्र योगायोग समजावा. 

Sunday, April 7, 2019

राज ठाकरेची गरज काँग्रेस ला का भासतेय?





डॉ. ह.  नि. सोनकांबळे 
dr. hanisonkamble@gmail.com

राजकारण हा सत्तेचा खेळ आहे, ज्याला कुणाला या खेळाचे नियम आणि डावपेच माहित असतात तोच या खेळाचा विजेता असतो.  कधी काळी या खेळाचे तरबेज खेळाडू म्हणून काॅंग्रेसमधल्या अनेकांची नावे घेतली जायची त्यातले बरेच जण आज हयात नाहीत. पण याच यादीत ज्यांचे नाव घेतले जायचे ते ‘शरद पवार’ आज हयात आहेत. पण ते सध्या एकटे  आहेत.  महाराष्ट्राच्या राजकारणात जो वैचारिक बेस (Think Tank) त्यांच्याकडे होता तो आता दिसत नाही. कधी काळी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसची सभा म्हटलं की, लोक काही दिवस आगोदरपासूनच तयारीत असायचे कारण नवीन काही तरी ऐकायला भेटणार आणि आपल्यालाही काही तरी शिकायला भेटणार असे लोकांना वाटत होते. अता तसे कोणालाही वाटत नाही कारण जी माणसे बोलायला स्टेजवर असायची तशी माणसे पुढे कोणालाही सांभाळता आली नाहीत, राजकारणातला अरेरावी  पणा बघून कोणते विचारवंत देखील त्यांच्याकडे जात नाहीत.  खरे तर पक्ष उभा असतो तो विचारधारेवर, आणि सध्या काॅग्रेंस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, मनसे या कोणत्याही पक्षाकडे विचारधारा नाही. केवळ मोंदींना हरवण्याच्या अजेंडयाखाली निवडणूका लढवल्या जात आहेत आणि त्या साठीच लोकांनी एकत्र यावे असेच चित्र निर्माण केले जात आहे. वैचारिक पातळीवर लोकांना एकत्र जोडणारा एकही नेता या पक्षाच्या स्टेजवर दिसत नाही. त्यामूळे मध्यम सुशीक्षीत वर्ग दूर गेला आहे.

परिणामी, वक्तृत्व स्पर्धेतल्या पोरांना स्टेजवर बोलवून मोदिविरोधात बोलायला लावणे आणि टाळया आणि शिटयात सभा संपवणे हेच चित्र सध्या दिसत आहे. म्हणूनच सुषमा अंधारे, राज ठाकरे ( कधी काळी एकमेकांची टिंगल करणारे) अशा एका स्टेजवरुन दुसऱ्या स्टेजवरच्यांना वाकडं तिकडं बोलून टिंगल करणाऱ्या (मनोरंजनासाठी ) लोकांची आवश्यकता काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसला भासत आहे. कधी काळी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांसमोर विचारवंत हा शब्द देखिल वापरला जायचा आता त्या लायकीचे नेते कुठेच दिसत नाहीत. म्हणून एखाद्याला जर मोदीविरोधात टिका करता येत असेल, किंवा मोदीवर हास्य कविता करता येत असेल तर त्याला अशा स्टेजवर संधी मिळण्याची शक्यता आहे.

बोलणाऱ्या लोकांची एक फळी पक्षात असावी ही बाब महत्वाची आहेच पण काहीही बोलून मनोरंजन केल्याने गर्दीचे रुपांतर मतात होत नाही हे दहावीत नागरीकशास्त्र शिकणारा पोरगा देखिल सांगू शकतो पण ही गोष्ट काॅंग्रेसच्या नेत्यांना का कळत नसावी? कारण तेवढं चिंतन करण्यासाठी देखील त्यांच्याकडे माणूस उरला नाही हे वास्तव कोणीही नाकारु शकत नाही.

खरे तर हक्काने मते मागण्याचा अधिकार केवळ काॅंग्रेसकडेच असायला हवा होता  कारण 60 वर्ष सत्तेत राहून केलेल्या कामाच्या पावत्या दाखवून ते लोकंाना हक्काने मते मागू शकतात पण ती कामे लोकांना पटवून देण्यासाठी देखील माणसे लागतात. पण त्यातही त्यांची वानवा सुरु आहे.

महाराष्ट्रात अशी माणसे केवळ काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसकडेच असू शकली असती कारण रयत शिक्षण संस्थे सारख्या सगळयात मोठया शिक्षण संस्थेसह महाराष्ट्रातील इतर संस्था देखील त्यांच्याकडे आहेत. पण या शैक्षणीक संस्थामध्ये केवळ प्रचार यंत्रणेसाठी वापरली जावीत अशीच माणसे दिसतात. काही वर्षापासून आ. सतीष चव्हाण यांनी मराठवाडयाचा महावक्ता या स्पर्धेतून बोलणारांची एक फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या फळीला जी विचारधारा देणे आवश्यक होते ती पुढे  पुरवली गेली नाही.  त्याच्यामूळे स्पर्धेत बक्षीसे मिळवून ती पोरं देखील घरीच आहेत.

मूळात मुददा हा आहे की, ज्या स्टेजवरून कधी काळी, डॉ. जनार्धन वाघमारे, प्रा. लक्ष्मण ढोबळे, लक्ष्मण माने, रामदास फुटणारे अशा अनेकांनी वैचारिक प्रबोधनातून माणसे जोडली त्या काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्या मोठया पक्षावर अशी वेळ का आली? आणि अश्या अवस्थेत हे दोन्ही पक्ष कोणती राजकीय क्रांती करण्याचे स्वप्न बघत आहेत?  कारण जेवढया काही क्रांत्या राजकीय पक्षांनी जगभरात केल्या आहेत त्या सर्व कोणत्या ना कोणत्या विचारधारेवर केलेल्या आहेत. जो पक्ष विचारधारेवर आधारलेला नसतो तो लवकर संपुष्टात येतो. काॅंग्रेस मधली ‘समिश्र राष्ट्रवाद’ सांगून लोकांना एकमय करणारी विचारधारा संपुष्टात आल्याने आता पक्ष देखील संपुष्टात येवू लागला आहे. हे वास्तव नाकारता येणार नाही.

पण तोच संमिश्र राष्ट्रवाद सांगून, लोकांच्या मूलभूत प्रश्नावर बोलून, लोकांना पटणारी विचारधारा शांतपणे सांगून लोकांना एकत्र करण्यात ऍड. बाळासाहेब आंबेडकर यशस्वी होत आहेत. गर्दीचे रूपांतर मतात करत आहेत. म्हणून लोकांची गर्दी त्यांच्यासभेला वाढत आहे. आता ती कमी करण्यासाठी, तरुण पोरांना आकर्षित करण्यासाठी राज ठाकरे च्या सभा घ्या असे काँग्रेस सांगत आहे. 60 वर्ष सत्ता उपभोगून शेवटी राज ठाकरे यांची सीएचबी वर नियुक्ती केली गेली. राज ठाकरे  यांच्या भाषणाचे अनेकांनी  कौतुक केले कारण  त्यांनी मोदींवर टीका केली. पण निवडणूका या केवळ टीकेवर जिंकता येत नाहीत, किंवा टीका करून लोकांच्या मनात स्थान देखील निर्माण करता येत नाही. त्यासाठी पक्षाकडे एक विशिष्ट्य कार्यक्रम असावा लागतो जो कि सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे दिसत नाही. म्हणूनच काहीतरी सांगून सभेत मनोरंज करण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. ज्याने लोकांचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत.