Sunday, December 27, 2020

रामदास आठवले : हॉस्टेल ते थेट मंत्रालय

 


डॉ. ह. नि. सोनकांबळे

डॉ.  बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की,  माणसाने इतिहास विसरू नये "जे लोक इतिहास विसरतात ते लोक इतिहास घडवू शकत नाहीत."  म्हणूनच आमच्या तरुणांनीही पॅंथरचा इतिहास विसरून चालणार नाही. भलेही आज , ती पॅंथर अस्तित्वात नसली किंवा पॅंथर मधील नेते इतर कुठल्याही पक्षात असले तरीही, त्यांना फक्त आपला राजकीय विरोध असावा पण त्यांनी महाराष्ट्रात उभी केलेली पॅंथर अर्थातच अन्यायाच्या विरोधात लढणारी पॅंथर विसरून चालणार नाही. मग ते या पॅंथरचे नेते नामदेव ढसाळ, अरुण कांबळे, राजा ढाले, रामदास आठवले असोत किंवा इतर कोणीही. त्यांनी जो त्याग पॅंथर संघटना उभी करून केला तो आजच्या घडीला कोणीही करू शकणार नाही. आज रामदास आठवले जरी कोणत्याही पक्षात असले तरी त्यांनी केलेला संघर्ष आणि त्याग आजच्या पिढीला ही प्रेरणा देणारा आहे. आज ते कुठे आहेत यापेक्षा काल त्यांनी आपल्यासाठी काय केलं याचाही पाढा वाचणे गरजेचे आहे.



1971-72 च्या दुष्काळा दरम्यान सांगली हुन मुंबईत आलेला हा तरुण लवकरच दलित पॅंथर मध्ये सहभागी झाला आणि अन्याय अत्याचाराने पीडित असलेल्या समाजाचा तो एक आधारस्तंभ झाला. मुंबईतली झोपडपट्टीअसो की महाराष्ट्रातील दुर्गम खेडी असोत जिथे जिथे गरीबावर अन्याय अत्याचार होईल तिथे तिथे हा पॅंथर पायाला भिंगरी लावून फिरला आणि न्यायाची भूमिका घेऊन सातत्याने लढत राहिला. घरी अठराविश्व दारिद्र्य असलं तरी त्याने पोटाच्या भुकेची चिंता कधीच केली नाही. खिशात एक रुपया जरी असला तरी तेवढाच घेऊन पायात स्लिपर घालून हा तरुण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरला. पण मी एक रुपयात तिथपर्यंत पोहोचू शकेन का जाताना रस्त्यात काय खावं याची चिंता करत तो बसला नाही. माझ्या समाजावर तिथे अन्याय झाला आहे मला तिथे गेलेच पाहिजे ही भावना घेऊन तो तिथपर्यंत पोहोचायचा.



आजच्या तरुण पिढीने टिंगलटवाळी करण्यापूर्वी एकदा या पँथरला जगून बघितलं पाहिजे, म्हणजे पायापासून मेंदूपर्यंत काय आग होते याची जाणीव होईल. हा तरुण म्हणजे कुठल्या मोठ्या घरातून आला नव्हता तर मोलमजुरी करणाऱ्या एका परिवारातून तो मुंबईत पोहोचला होता. मुंबईमध्ये वडाळयातल्या सिद्धार्थ होस्टेल च्या खोली क्रमांक 50 मध्ये तो राहायचा आणि अन्याय अत्याचाराची बातमी येताच तो होस्टेलमधून बाहेर पडायचा. थेट लढण्यासाठी सज्ज व्हायचा.



दरम्यानच्या काळात सुरू असलेल्या नामांतराच्या लढ्याचे नेतृत्व वसतिगृहामध्ये राहून याच तरुणांनी केले. पँथरमध्ये फूट पडली तेव्हा रामदास आठवले यांनीच पँथर मधील तरुणांचे नेतृत्व केले आणि नामांतराच्या चळवळीची धुरा सांभाळली. त्यांच्यामध्ये असलेली आक्रमकता संघटन कौशल्य कार्याची ऊर्जा अशा अनेक गुणांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील नेते त्यांना आदरपूर्वक ओळखू लागले. अशातच 1990 मध्ये शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांची नजर रामदास आठवले यांच्यावर पडली आणि हॉस्टेल मधला हा तरुण थेट मंत्रालयात मंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी पोहोचला. देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होते की, हॉस्टेल मधला एक तरुण विद्यार्थी थेट मंत्री होतो आहे.

 


 त्यांच्या मंत्री होण्याने नामांतराचा प्रश्न लवकर सुटेल असे सर्वांना वाटत होते. परंतु तरीही नामांतराचा प्रश्न लांबत चालला होता. याच दरम्यान महाराष्ट्रात नामांतर आंदोलनही भडकत चाललं होतं. अशातच शरद पवारांनी 14 जानेवारी 1994 रोजी नामांतराची घोषणा केली आणि नामांतराचा प्रश्न संपुष्टात आणला. यात  या पँथरचा वाटा सिंहाचा होता. तो विसरून चालणार नाही.



पॅंथर मध्ये फूट पडल्यापासून आजपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने अनेक संघटना आणि राजकीय पक्ष अस्तित्वात आले, समाज विभागला गेला. याचा परिणाम आंबेडकरी राजकारणावर होत गेला. समाज एकत्र येणे शक्य नाही या गोष्टी लक्षात येऊ लागल्याने प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाला हाताशी धरून राजकारण सुरू केले. अशा परिस्थितीत रामदास आठवलेही राजकीय समीकरणापासून वंचित राहू शकले नाहीत. तेही इतर पक्षांशी जुळवून घेत उत्तर-मध्य मुंबईतून 1998 मध्ये आणि पंढरपूर मधून 2004 मध्ये  लोकसभेवर पोहोचले. 2009 ला त्यांना शिर्डी मधून पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी केलेला रिडालोस व शिवशक्ती-भीमशक्ती चा प्रयोग यशस्वी झाला नाही. 

त्यांनी असे केलेले अनेक प्रयोग व नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या गटात राहण्याचा केलेला प्रयत्न काही लोकांना आवडला नाही. म्हणून त्यांच्यावर सातत्याने टीकाही होत राहिली पण ज्यांनी त्यानंतरच्या काळात रामदास आठवलेंना जवळून अनुभवले त्यांनी त्यांची साथही सोडली नाही. त्यांचे पँथर चळवळीतले अनुभव ऐकले तर आजही अंगावर शहारे उमटतात.

आंदोलने, मोर्चा,  रस्ता रोको,  उपोषण, जेल, पोलिसांचा मार हाच रामदास आठवले यांच्या जगण्याचा नित्यक्रम होता. जो आजचा तरुण कितीही राजकारणाच्या गप्पा मारत असला तरीही हा नित्यक्रम स्वतःसाठी स्वीकारू शकत नाही.  म्हणूनच या पँथरला विसरून चालणार नाही.  आज या पॅंथरचा वाढदिवस त्यानिमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटते की,  "पॅंथर, काल तू आमच्यासाठी जगलास आज तू स्वतःसाठी जग.  कारण,  माणसाने स्वतःसाठीही थोडंफार जगल पाहिजे. 


पँथर जिंदाबाद! 

2 comments:

  1. Sir very nice information give us by this article. Thank you so much

    ReplyDelete
  2. स्वतःसाठी जगतात ते प्राणी!इतरांसाठी जगतात ती माणसं!
    त्यांना पाहिजे तर भली माणसं म्हणा!

    ReplyDelete