प्र. के. अत्रे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळयात आधुनिक भारत पाहिला होता म्हणूनच ते त्यांना ‘नवभारताचे निर्माते’ म्हणत असत. डाॅ. बाबासाहेब आंबेडरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांनी त्यांच्यावर स्वतंत्र लेखमालाच चालवली आणि त्यांचे अनेक पैलू उलगडले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रप्रेम सांगत असताना अत्रे म्हणतात, ‘अखंड भारताचा जन्मभर पुरस्कार करुन शेवटी ज्यांनी देशाच्या फाळणीला मान्यता दिली आणि कोटयावधी लोकांच्या प्राणांचा, अब्रूचा आणि मालमत्तेचा विध्वंस केला ते आज देशाचे उध्दारकर्ते बनलेले आहेत. देशभक्तीचा सर्व सन्मान आणि प्रतिष्ठा आज त्यांना प्राप्त झालेली आहे. पण ज्यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय संकटाचा आधीपासून सर्वांना इशारा दिला आणि त्यापासून राष्ट्राने आपले कसे संरक्षण करावे याचा मार्गही दाखवून दिलाः एवढेच नव्हे तर पाकिस्तानवाल्यांच्या सर्व अनुयायांना ठोकरुन आपल्या कोटयावधी अनुयायासह स्वतंत्र भारतात राहावयाचे ज्यांनी ठरविले त्यांना देशाच्या राजकारणामध्ये आज कसेलीही सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे स्थान असू नये हयापेक्षा अधिक मोठा कोणता अन्याय असू शकेल? भारतीय ऐक्याचा आणि स्वातंत्र्याचा त्यांच्याएवढा प्रचंड निष्ठावंत पुरस्कर्ता या देशात दुसरा नाही. परंतु त्यांना आपण केवळ हिंदूंचे आणि भारतीय स्वातंत्र्याचे विरोधक एवढयापुरते मर्यादित समजून घेतले. ते कधीच स्वातत्र्याचे विरोधक नव्हते. त्यांना राजकीय स्वातंत्र्याच्या आगोदर सामाजिक सुधारणा महत्वाच्या वाटत होत्या कारण एकवेळेस ब्रिटीश भारतातून गेल्यावर इथे उच्चवर्णीय लोक राज्यकर्ते बनतील आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर आधारीत समाज जशास तसा राहिल याची चिंता त्यांना होती. म्हणूनच ब्रिटीश भारतातून जाण्याच्या आगोदर इथे ‘समता’ प्रस्थापित होणे त्यांना गरजेचे वाटत होते. हिंदूंमधील काही वाईट प्रथा आणि परंपरांचे ते कडवे विरोधक होते परंतु त्यांनी कधीच हिंदूं जनतेचा तिरस्कार केला नाही.
भारताला महासत्ता होण्याचा मार्ग अत्रेंना बाबासाहेबांच्या विचारांत दिसत होता. स्वातंत्र्याच्या एक महिना आगोदर म्हणजेच 13 जुलै 1947 च्या नवयुगच्या अंकात अत्रे म्हणतात, ‘ अमेरिका आणि रशीया यांच्याशी स्पर्धा करण्याइतके सामर्थ्य या देशाच्या अंगी यावे असे आपल्याला जर वाटत असेल, तर आपण हया देशाच्या भवितव्याची सूत्रे नेहरुसारख्या आणि आंबेडकरांसारख्या अव्दितीय बुध्दिमत्तेच्या मुत्सुद्यांच्या हातातच सोपविली पाहिजेत. असे झाले असते तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला एका वेगळया उंचिवर नेउन ठेवले असते. परंतु केवळ जातीचा व्देष करुन अनेकांनी त्यांना सत्तास्थानापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. नेहरुंना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची साथ मंत्रीमंडळात हवी होती. म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी काॅग्रेसमध्ये राहावे असे त्यांना वाटत होते. परंतु असे झाले तर आपल्या विचारस्वातंत्र्याची गळचेपी होईल याची जाणीव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना होती. म्हणून शेवटपर्यंत ते काँग्रेसपासून दूर राहिले.
भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थीक आणि शैक्षणिक विकासाची ‘निळी प्रिंट’ (ब्लूप्रिंट) त्यांनी आगोदरच तयार करुन ठेवली होती. नेहरु आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये जो फरक होता तो म्हणजे, नेहरु आजचा विचार करायचे तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आजच्यासह उदयाचाही विचार करायचे. पं. नेहरु भांडवलदार, व्यापारी आणि श्रीमंत शेतकऱ्यांचे नेते होते तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शोषीत, पिडीत आणि वंचित घटकाचे नेते होते. याचा आढावा अत्रेनींच पहिल्या सर्वत्रिक निवडणुकीच्या वेळी घेतला आहे.
नवयुगच्या 2 डिसेंबर 1951 च्या एका लेखामध्ये मुंबईत झालेल्या पं. नेहरु आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेगवेगळया दोन सभांचे वर्णन केले आहे. ते म्हणतात की, पं. नेहरुंच्या सभेला व्यापारी, भांडवलदार आणि श्रीमंत लोकांची गर्दी होती. शहरातल्या व्यापाऱ्यांना पत्र पाठवून दुकाने बंद करुन काॅंग्रेसच्या सभेला जबरदस्ती बोलावण्यात आले होते. सभेला साधारणतः दोन लाख लोकांचा जनसमुदाय होता तर त्याच्या काही दिवसानंतर अशोक मेहता यांनी शिवाजी पार्कवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची एक प्रचंड मोठी सभा घेतली होती. या सभेला गरीब, शोषीत, पिडीत आणि वंचित असलेला अडीच लाख जनसमुदाय होता. इथला सामान्य माणूस डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनाच आपला ‘मसिहा’ समजत होता. त्यांच्याशिवाय कोणीही आपला उध्दारकर्ता नाही असे त्यांना वाटत होते. त्यांच्या आपेक्षा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून काही प्रमाणात पुर्णही केल्या. कडव्या विरोधामूळे ज्या पूर्ण करता आल्या नाहीत त्या पूर्ण करुन घेण्याचा मार्गही त्यांनी भारतीयांना दिला. त्यांना या देशावर भविष्यात कोसळणारी सर्व संकटे दूर करायची होती म्हणूनच ते म्हणायचे की, सामाजिक न्यायावर, समतेवर आणि सहकार्यावर आधारलेला नवसमाज या भारतात ताबडतोब अस्तित्वात आला नाही तर ब्रिटीश साम्राज्यशाहीपेक्षाही अधिक भीषण आपत्ती या देशावर कोसळल्याशिवाय राहणार नाही. त्यांची ही भूमिका आपण भारतीयांनी समजून घेणे आवश्यक आहे. त्यांचे भारतातील अनेकांसोबत वैचारीक मतभेद होते परंतु त्यांनी कधीच कोणाचा व्यक्तीव्देश केला नाही.
विरोधकांची मने जिकण्याचा स्वभावधर्म त्यांच्या विचारसाधनेत होता. म्हणूनच प्रो. सेलिग्मन, य. दि. फडके, भालचंद्र फडके, रामास्वामी नायर, ग्रॅनव्हिल आॅस्टिन, ब्रिटीश पार्लमंेटचे सदस्य जेरमी कार्बीन, जेफ्री हून, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष थाबो एम्बकी, श्रीलंकेच्या कुमारी हेलेन, हॅरीस, हंगेरीचे द डॅक आणि सोरायसीस अशा अनेक लोकांनी व जगभरातल्या अनेक विद्यापीठांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेतृत्व ठरवले आहे. म्हणूनच अत्रे म्हणतात की, आजच्या पक्षीय राजकारणाची आणि सामाजिक पूर्वग्रहाची धूळ जेव्हा वातावरणातून नष्ट होईल आणि जनतेच्या स्वातंत्र्याचा निपःक्षपाती इतिहास जेव्हा लिहला जाईल तेव्हा त्यामध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव ‘नवभारताचे निर्माते’ असेच घेतले जाईल.
लेखन आणि संकलन : डॉ. ह. नि. सोनकांबळे
No comments:
Post a Comment