रेकॉर्ड : 21 वर्षाची तरुणी महापौर
100% सुशिक्षित लोकांचे राज्य म्हणून रेकॉर्ड असलेल्या केरळने पुन्हा एकदा नवीन रेकॉर्ड केले आहे. या राज्यातल्या तिरुअनंतपुरम शहरातील जनतेने चक्क एका 21 वर्षाच्या तरुण विद्यार्थिनीवर विश्वास दाखवत तिला महापौर पदाच्या खुर्चीवर बसवले आहे. 21 वर्षे वयात महापौर पदाची खुर्ची सांभाळणारी देशातली ही पहिलीच तरुणी आहे. यापूर्वी कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा जनतेने एवढ्या तरुण वयातील उमेदवारावर विश्वास दाखवला नाही. खरेतर याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जबाबदार आहे असेच म्हणावे लागेल. कारण हा देशातला एकमेव असा पक्ष आहे जो विद्यार्थ्यांना आठवीपासूनच राजकारणात ओढतो आहे
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी चे विद्यार्थी संघटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया च्या माध्यमातून जी काही सदस्य नोंदणी केली जाते त्यात अठरा वर्षे पूर्ण होण्याअगोदरच्या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य देऊन त्यांना राजकीय पक्ष म्हणजे काय? त्यांची भूमिका नेमकी काय असते? विद्यार्थी संघटन म्हणजे काय? देशाचा राज्य कारभार कसा चालतो? अशा वेगवेगळ्या गोष्टींची ओळख करून दिली जाते. यातूनच विद्यार्थी नेतृत्व घडवण्याचा त्यांचा कयास असतो. फक्त केरळच नाही तर देशभरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे हे काम जोरात चालू असते. तरुणांना राजकारणात आणून त्यांना ट्रेनिंग देणे यात हा पक्ष आघाडीवर असल्याचे दिसते. या पक्षाने आतापर्यंत राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अनेकांना राजकारणाच्या खुर्चीवर बसवले आहे. जे की इतर कोणत्याही पक्षाला ते जमले नाही.
आता तर चक्क या पक्षाने देशातले सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत केरळातल्या आर्या राजेंद्रन या विद्यार्थिनीला चक्क तिरुअनंतपुरम या मोठ्या शहराचे महापौर करण्याचे ठरवले आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ एका विद्यार्थी संघटनेची कार्यकर्ता असणारी आर्या हिचे नाव पक्षाने महापौर पदासाठी पुढे केले आहे.
कोण आहे आर्या राजेंद्रन?
आर्या राजेंद्रन हिला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. तिचे वडील व्यवसायाने इलेक्ट्रिशियन आहेत आणि आई एलआयसी एजंट आहे. आर्या सध्या तिरुअनंतपुरम च्या ऑल फ्रेंड्स कॉलेजमध्ये बीएससी मॅथेमॅटिक्स च्या दुसऱ्या वर्षात शिकत असून ती स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया च्या राज्य कार्यकारिणीची सदस्य आहे. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिने यु डी एफ च्या उमेदवार श्रीकला यांचा 2872 मतांनी पराभव केला आहे.
हे फक्त कम्युनिस्ट पक्षच करू शकतो?
देशभरात सध्या 2000हून अधिक राजकीय पक्षांची नोंदणी निवडणूक आयोगाकडे आहे. पण कोणत्याही पक्षाकडे तरुणांना राजकीय खुर्ची देण्याचा अजेंडा नाही. असलाच तर त्या खुर्चीवर राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुठल्यातरी वारसदारांची वर्णी लागते आणि त्यालाच आपण तरुणांचा नेता म्हणून संबोधतो. या व्यतिरिक्त कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी शिवाय राजकारणात येऊन महापौर, आमदार किंवा खासदार होता येत नाही. परंतु देशात कम्युनिस्ट पक्ष असा एकमेव पक्ष आहे जो कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना तरुणांना राजकारणात संधी देताना दिसतो आहे. इतर पक्षांचा विचार करता कांशीरामजींनी अशाच काही तरुणांना राजकारणात संधी देण्याचा प्रयत्न केला होता. याव्यतिरिक्त काँग्रेस पक्षातही थोड्याफार प्रमाणात असे प्रयत्न केले जायचे पण नंतर नंतर हा पक्षही वारसदारासाठीच खुर्च्या राखीव ठेवताना दिसतो आहे.
आर्याच्या शिक्षणाचं काय?
आर्या सध्या बीएससीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. निवडणुकीतला विजय किंवा महापौर पद हे माझं शिक्षण थांबू शकत नाही अशी आर्याची भूमिका आहे. हे सर्व सांभाळत मी माझं शिक्षण घेणार आहे असेही ती म्हणते. तरुणांनी शिक्षण घ्याव स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि मग राजकारणात यावं असं बोललं जात असतानाच शिक्षण घेता घेता ही राजकारणात झेप घेता येऊ शकते हेच आर्याने दाखवून दिले आहे. खरेतर तिचे अभिनंदन करत असतानाच पक्षातील ज्येष्ठांचे ही अभिनंदन करणे गरजेचे आहे कारण त्यांनी एका विद्यार्थिनीवर विश्वास दाखवला आहे.
कम्युनिस्टांचा तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
आर्याला महापौर करून येणाऱ्या केरळच्या निवडणुकीत तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न कम्युनिस्ट पार्टीचा आहे असेही बोलले जात आहे. पण त्यानिमित्ताने का होईना केरळात तरुणांचा राजकीय टक्का वाढणार आहे हे मात्र निश्चित झाले आहे.
संविधान की मनुस्मृती (25 डिसेंबर)
आजच्याच दिनी स्त्रियांना हक्क नाकारणाऱ्या मनुस्मृतीचे दहन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते. त्याच दिनी भारताच्या संविधानाने एका स्त्रीला अधिकाराच्या खुर्चीवर बसवले आहे. म्हणून हा दिवस आपल्या आर्या सह आपल्याला विचारप्रवृत्त करणारा आहे.
#arya_rajendran #Indian_constitution #mnusmruti #youth_politics #kerla #Tiruanantpiram
No comments:
Post a Comment