Thursday, May 2, 2019

बाबासाहेबांची ‘पाॅलिटिकल ट्रेनिंग स्कूल' : काळाची गरज








डाॅ. ह. नि. सोनकांबळे


संसदीय संस्थेमध्ये सभागृहाला आपल्या सौम्य अथवा तीक्ष्ण तर्कशुध्द आणि माहितीपूर्ण भाषणाने जो सभासद भारुन टाकू शकतो तोच सभासद यशस्वी होउ शकतो.

हेही वाचा; स्वातंत्र्यापूर्वीच सविधानाचे 7 मसुदे तयार होते.
जगाला राजकारणाचे प्रभावी धडे देणारा ग्रंथ म्हणून मॅकिअॅव्हलीच्या ‘द प्रिन्स’ या ग्रंथाकडे पाहिले जाते. या ग्रंथाच्या सतराव्या प्रकरणात तो वर्तनवादावर बोलताना असे म्हणतो की, माणूस हा कृतघ्न, चंचल, दांभिक आणि भित्रा असतो. जो पर्यंत तुम्ही त्याचे कल्याण करता, तो पर्यंत तो तुमच्या सोबत असतो. तुम्हाला तो रक्त, संपत्ती, आयुष्य, पोरेबाळे काय वाटेल ते अर्पण करतो. ज्या दिवशी त्याचा स्वार्थ संपेल त्या दिवशी तो तुमच्या विरुध्द विद्रोह करतो. स्वार्थी माणसे स्वार्थ संपताच प्रेमाचे बंधन बिनदिक्कतपणे तोडून टाकतात. मॅकिअॅव्हलीचे हे मत जशास तसे आजच्या भारतीय राजकारणालाही लागू पडताना दिसते आहे. सत्ता हे लोककल्याणाचे प्रभावी माध्यम असते असे म्हटले जाते. म्हणूनच भारतीय संविधानाने सत्तेला विशेष शक्ती दिलेली आहे. परंतु या शक्तीचा उपयोग जनकल्यानासाठी न होता. जात, धर्म आणि स्वार्थासाठी करणारे राजकीय नेतृत्व  दिवसेंदिवस प्रभावी होताना दिसत आहे. स्वातंत्रयानंतरच्या साठ वर्षात जर या संवैधानिक  शक्तीचा उपयोग सत्तेतील लोकांनी जनकल्याणासाठी केला असता तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या अनेक प्रश्नांचा छडा लागला असता. परंतु असे न होता स्वार्थ, जात आणि धर्म या गोष्टींना केंद्रबिदू ठेवून उदयास येणाÚया नेतृत्वामूळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. म्हणूनच या प्रश्नाला आवर घालण्यासाठी जनता नव्या आणि प्रभावी नेतृत्वाच्या शोधात आहे. त्यासाठीच ती राजकारणाची खांदेपालट करुन पाहत आहे. म्हणूनच भारतीय लोकशाही एका नव्या वळणावर येवून उभी असल्याचे दिसते आहे. हा काळ तसा संक्रमण काळ आहे. या काळात सर्वच गोंधळलेल्या आवस्थेत आहेत. हा काळ किती वर्षे असाच राहिल हे निश्चितपणे सांगता येणार नाही. जर हे सर्व  कुठेतरी थांबवायचे असेल आणि जनतेला आणि उदयाच्या भारताला एक सक्षम नेतृत्व द्यायचे असेल तर गरज आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या ‘ट्रेनिंग स्कूल फाॅर एन्ट्रन्स टू पाॅलिटिक्स’ ची. 

काय होती त्याची ‘ट्रेनिंग स्कूल फाॅर एन्ट्रन्स टू पाॅलिटिक्स’ ची संकल्पना? भारतीय लोकशाहीला एक सक्षम नेतृत्व मिळावे आणि कें्रद्रिय आणि प्रांतीय कायदेमंडळाला लोककल्याणकारी, शीलवान आणि प्रज्ञावंत नेतृत्व मिळावे यासाठीचे हे एक महाविद्यालयच होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्पीलेल्या रिपब्लीकन पक्षामध्ये कार्य करणारा प्रत्येक तरुन यातून ट्रेंन्रिग घेवून बाहेर पडावा असे त्यांना वाटत होते. जर असे झाले तर रिपब्लीकन पक्षाला एक नवे बळ येईल आणि या स्कूल मधून बाहेर पडलेला तरुण थेट जनतेच्या प्रश्नावर कार्य करेल याचा विचार करुन त्यांनी या स्कूलची स्थापना जुलै 1956ला केली होती. 1 जुलै 1956 ते 1957 पर्यंत या स्कूलचे कामकाज बाबासाहेबांचे ग्रंथपाल शां. शे. रेगे यांनी पाहिले होते. राजकारणात प्रवेश करणाÚया व्यक्तीला जनतेच्या प्रश्नाचा आभ्यास असणे गरजेचे आहे, त्याचे व्यक्तीमत्व आकर्षक असले पाहिजे, त्याच्याकडे वक्तृत्वाची उत्तम शैली असणे गरजेचे आहे, तो प्रज्ञावंत, शीलवान असणे गरजेचे आहे, तो आभ्यासू असला पाहिजे असे बाबासाहेबांना वाटत होते. म्हणूनच एका भाषणात ते असे म्हणतात की, संसदीय संस्थेमध्ये सभागृहाला आपल्या सौम्य अथवा तीक्ष्ण तर्कशुध्द आणि माहितीपूर्ण भाषणाने जो सभासद भारुन टाकू शकतो तोच सभासद यशस्वी होउ शकतो. परंतु सद्यस्थितीमध्ये असे एकही नेतृत्व पहावयास मिळत नाही. म्हणूनच जनतेच्या मूळ समस्याचा आभ्यास करुन त्यावर प्रभावी उपाय कायदेमंडळाला सापडत नाहीत.

स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या मंत्रीमंडळाचा विचार केला तर अनेक नेते अभ्यासू आणि प्रभावी होते. तत्कालीन परिस्थितीत म्हणावे तसे शिक्षणाचे वारे नसल्यामूळे जनता म्हणावी तेवढी सुशिक्षीत नव्हती. तरीही जनतेने सुशिक्षीत आणि आभ्यासू नेतृत्वाला कायदेमंडळात बसविले होते. परंतु पुढे दिवसेंदिवस हे चित्र बदलत गेले. जनता सुशिक्षीत होत गेली आणि अशा सुक्षित जनतेचे नेतृत्व अशिक्षीतांच्या हाती आले. म्हणूनच आज उच्च शिक्षीत मुलगा देखिल आडाणी नेत्याच्या मागे झंेडा घेवून फिरताना दिसतो आहे. अशी वेळ तरुणांवर येवू नये म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ट्रेंनिंग स्कूलची स्थापना केली होती. त्याची गरज राजकारणात प्रवेश करणाÚया तरुणांना वाटत नाही. खरे तर राजकारणाचा आभ्यासक्रम खूप मोठा असतो. तो केवळ राज्यशास्त्र या एका विषयावर आधारीत नसतो. तो देशाच्या भूगोलावर, इतिहासावर, अर्थशास्त्रावर आणि विज्ञान तंत्रज्ञानावर आधारलेला असतो. परंतु या सर्वच शांखांचा आभ्यास असणारा व्यक्ती एक तर राजकारणात येत नाही. किंवा राजकारणात आलेला व्यक्ती या सर्वच शांखांचा आभ्यास करत नाही. म्हणून सक्षम नेतृत्वाचा उदय होत नाही. 

आज जरी भारतात कला शाखेतील राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व इतिहास या विषयाला गौण स्थान मिळत असले तरी महासत्ता असलेल्या राष्ट्रात या तीन विषयाच्या आभ्यासावर व संशोधनावर मोठया प्रमाणात खर्च केलेला दिसून येतो. ब्रिटीशांनी पहिल्यांदा भारतात आल्यावर देखिल तेच केले. त्यांनी भारताचा भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राजकारण या सर्वच गोष्टींचा आभ्यास केला म्हणूनच ते दिडशे वर्ष भारतावर राज्य करु शकले. ज्यांना राजकारणात आपला प्रभाव निर्माण करायचा असतो आणि खरोखरच लोकशाहीतला प्रभावी नेता व्हायचे असते त्यांना या सर्व गोष्टींचा आभ्यास करणे गरजेचे आहे. रोज उठसूट सोशल मिडीयावर पोष्ट टाकल्याने राजकारणाला नवे दिवस येतील असे सध्या तरी वाटत नाही. म्हणूनच आज खरी गरज आहे ती डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या ट्रेनिंग स्कूलची. त्याशिवाय भारतीय लोकशाहीला प्रभावी नेतृत्व मिळणार नाही. आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेले सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची संकल्पना पूर्णत्वास जाणार नाही. जर मागील साठ वर्षाप्रमाणेच पुढेही या देशाच्या राजकारणाची दिशा राहिली तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत केलेले शेवटचे भाषण खरे ठरण्याची भिती आहे. ज्या लोकांना इथे सामाजिक आणि आर्थिक समता मिळाली नाही तेच लोक हा लोकशाहीचा डोलारा उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणूनच सद्या गरज आहे अशा हाजोरो स्कूलची ज्यातून उद्याच्या भारताला एक सक्षम नेतृत्व मिळेल.

या सर्व कार्यासाठी देशभरातील विविध विद्यापीठांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आणि प्रत्येक विद्यापीठात अशा स्कूल स्थापन करणे गरजेचे आहे. आता या विद्यापीठाला प्रश्न असा पडू शकतो की, राज्यशास्त्रासारखा विषय सर्वच विद्यापीठ स्तरावर असताना या नव्या स्कूलची काय गरज. राज्यशास्त्र या विषयाचे विकसित रुप म्हणून इतके दिवस राज्यशास्त्राच्या आभ्यासक्रमाणे हे पावूल उचलणे गरजेचे होते परंतु ब्रिटीश काळात सुरु झालेल्या या विषयाने आजूनही कात टाकली नाही. म्हणूनच संसदीय कार्यप्रणाली काय असते, संसदेत प्रश्न कसे लावले जातात, तारांकीत प्रश्न म्हणजे काय, अतारांकीत प्रश्न म्हणजे काय, शून्य काल म्हणजे काय अशा विविध प्रश्नावरचा आभ्यासक्रम आजूनही राज्यशास्त्रात आला नाही. म्हणूनच आज नव्याने या सर्व आभ्यासक्रमाची मांडणी होणे गरजेचे आहे. हवे तर राज्यशास्त्र व लोकप्रशासन सारख्या विषयाला सलग्नीत करुन या नव्या स्कूल स्थापन करता येवू शकतात. तशा प्रकारची मागणी देशातील तरुणांनी, जनतेने सरकारकडे करणे गरजेचे आहे. केवळ लोकप्रियतेवर निवडूण येणारे लोक अनेक आहेत जे कायदेमंडळात कधीच दिसत नाहीत. अशा लोकांच्या हातात जर सत्ता राहिली तर लोकशाहीला यापेक्षाही वाईट दिवस येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची ‘ट्रेनिंग स्कूल फाॅर एन्ट्रन्स टू पाॅलिटिक्स’ आजही प्रासंगिकच आहे.