Thursday, August 19, 2021

प्रत्येकालाच जमायला हवे "नात्यांचे सर्व्हिसिंग"

 


जिथे ‘अर्थ’ (पैसा) आहे तिथे ‘स्वार्थ’ आहे आणि जिथे ‘स्वार्थ’ आहे तिथे ‘नाते’ कधीच टिकून राहत नाहीत हा प्राचिन इतिहास आहे. म्हणूनच प्रसिद्ध राजकीय चिंतक मॅकिव्हली असे म्हणाला होता की, ‘लोक एकवेळेस आपल्या बापाचा मृत्यू विसरतील पण पैसा विसरत नाहीत.’ थाॅमस हाॅब्ज या विचारवंताने देखिल त्याच्या ‘लेवियथान’ या ग्रंथात मनुष्यस्वभाव हिंस्र, दांभाीक आणि स्वार्थी असल्याचे स्पष्टपणे सांगीतले.  जस-जसा काळ बदलला तस-तसे माणसांचे स्वभाव, नाते, संबंध सर्वच बदलत गेले पण माणूस आणि पैसा यांच्यातले संबंध म्हणावे तेवढे बदलले नाहीत. बदललेही असले तरी ते सैल स्वार्थी पणाकडून घट्ट स्वार्थी पणाकडे गेले असतील. पण यात काही अपवाद असेही आहेत की, ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आला पण स्वभाव मात्र स्वार्था कडून परमार्थाकडे गेला. यात विश्वास ठाकूर यांचे नाव आजच्या काळात अग्रक्रमाने घ्यावे लागेल. नुकताच त्यांचा ‘नात्यांचे सव्र्हिसिंग’ हा कथा संग्रह प्रकाशित झाला असून त्यांच्या या कथासंग्रहात त्यांचा हा स्वभाव पडद्यामागे असल्याचे दिसत. कारण त्यांनी एकाही कथेमध्ये  ‘मी’ किती श्रेष्ठ आहे असे दाखवून दिले नाही. 

पैसा हा आहेरे वर्गाचा धर्म आहे. ज्याचे तत्वज्ञान हे ‘भेदाभेद’ आहे. पण एका बॅंकेचे विश्वस्त (मालक) असूनही विश्वास ठाकूर या तत्वापासून कोसो दूर राहिल्याचे त्यांच्या या कथासंग्रहातून दिसून येते. कार्ल मार्क्स म्हणाला होता की, भांडवलदार आणि कामगार यांच्यात नेहमीच संघर्ष राहिला आहे. पण मार्क्सचे हे तत्वज्ञानही विश्वास ठाकूर यांनी मोडीत काढल्याचे दिसते. त्यांच्या या कथासंग्रहात जिथे-जिथे बॅंकेच्या कर्मचार्यांचे संदर्भ आले आहेत तिथे-तिथे मालक आणि कामगार असा संबंध कुठेच प्रदर्शीत होत नाही. एका बॅंकेेचे मालक असूनही त्यांनी जो कर्मचारी आणि जनतेचा जिव्हाळा जपला आहे त्यातून एक वेगळाच मनुष्यस्वभाव पुढे येताना दिसतो आहे. त्यांच्या संपर्कात  सर्वच लोक चांगले (निस्वार्थी) आले आहेत असे नाही. पण ते जरी तसे असले तरी त्यांच्या स्वभावात देखिल बदल होईल या आपेक्षेने विश्वास ठाकूर यांनी त्यांच्यातील स्वभावाचेही ‘सर्व्हिसिंग’ करुन नाते जोडण्याचे धाडस  केले आहे. 

खरे तर अनुभव कथन करणे ही तशी अवघड बाब असते. एखादे वेळी माणूस सोयरीक, लग्न, पर्यटन अशा ठिकाणचे अनुभव कथन करु शकतो. पण जिथे रोज आर्थिक व्यवहार घडत होतेे अशा ठिकाणचे अनुभव कथन करण्यासाठी मोठे धाडस लागते. हे धाडस विश्वास ठाकूर यांनी दाखवले आहे. त्यांनी कथन केलेले अनुभव हे फक्त निस्वार्थी लोक भेटले अशा अशयाचे नाही तर सर्वच प्रकारच्या लोकांचा संबंध आल्याचे वास्तव त्यांनी मांडले आहे. हे सांगत असताना अनेकांच्या ‘नात्यांचे सव्र्हिसिंग’ करता आले नाही याचे दुःखही त्यांनी मांडले आहे. 

विश्वास ठाकूर यांचा हा कथसंग्रह वाचल्यानंतर एक महत्वाची बाब लक्षात येते ती म्हणजे, त्यांना नात्याचा भागाकार आणि वजाबाकी कधीच जमली नाही. त्यांनी केवळ नात्यांची बेरीज आणि गुणाकार केला आहे. या साठी त्यांनी ‘सर्व्हीसिंग’चे जे सूत्र वापरले आहे ते वाचकांना या कथासंग्रहात भावल्याशिवाय राहत नाही. खरे तर ही मेथड आपल्या प्रत्येकालाच जमली पाहिजे. या कथा वाचल्यानंतर वाचकांचा हाच प्रयत्न राहणार आहे की, आपणही ही ‘सर्व्हिसिंग’ची मेथड आपल्या आयुष्यात वापरली तर नात्यांची कुठेच कमतरता भासणार नाही. आज तंत्रज्ञानाने जग जवळ आले असले तरी आपल्या बाजूला बसलेल्या माणसाशी आपला संवाद होत नाही. आपल्या कुटंुबात आपण एकमेकांच्या बाजूला बसून जेवण करत असलो तरी संवाद होत नाही. या काळात खरेच आपल्या प्रत्येक ‘नात्याचे सर्व्हिसिंग’ झाले पाहिजे त्यासाठी हा कथासंग्रह ‘नात्यावर’ प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. 

विश्वास ठाकूर यांचा हा पहिलाच कथासंग्रह आहे असे वाचताना कुठेच जाणवत नाही. त्यांची भाषा, संवादशैली, मांडणी एखाद्या जेष्ट लेखकाची वाटते. या कथासंग्रहात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या सर्वच कथा आल्या नसल्या तरी येणाऱ्या काळात ते पुन्हा एखादा कथासंग्रह वाचकांसाठी घेवून येतील अशी अपेक्षा आहे. त्यांच्या भावी लेखनास मनःपुर्वक शुभेच्छा!



आपला नम्र, 

डाॅ. ह. नि. सोनकांबळे

राज्यशास्त्र विभाग, 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद 

मो. नं. 9403973043 / 23