सरकारची बतावणी - तमाशाहून चांगलीच
डॉ. ह. नि. सोनकांबळे
प्रेक्षकांना हसवत खेळवत ‘तमाशा’ला पुढे सरकावणे या प्रकाराला ‘बतावणी’ असे म्हटले जाते. हाच प्रकार सध्या राजकारणात सुरु झाला आहे. प्रेक्षकांना हसवत खेळवत, त्यांचे मनारंजन करत पाच वर्ष राज्य करणे याला ‘सरकार’ असे म्हणतात. तमाशात बतावणी ऐकताना जसे प्रेक्षक आपलं सगळं दुःख विसरुन जातात. तोच प्रकार सध्या आपल्यासोबत केला जातो आहे. सरकारमधले लोक रोज असा एक विषय आणतात आणि आपण आपले सर्व प्रश्न विसरुन जातो.
केंद्रात सत्तेत असलेले लोक राज्याच्या सरकारवर सोबत बतावणी करतात तर राज्यात सत्तेत असलेले लोक केंद्रासोबत बतावणी करतात. तमाशाच्या बतावणीत एखा जोरदार पंच आलाच तर लोक टाळया आणि शिटया वाजवतात. तर केंद्र राज्य यांच्यातल्या बतावणीत पंच आलाच तर लोक सोशल मिडीयावर ‘दात’ काढतात.
आपल्याला हसायला मिळालंय एवढयातच सध्या लोक समाधानी आहेत. काही दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर-अमोल मिटकरींनी मंच गाजवला, त्यानंतर नारायण राणे केंद्रात मंत्रीपद मिळवून महाराष्ट्रात आले आणि त्यांनी महाराष्ट्रात येवून जोरदार ‘बतावणी’ला सुरुवात केली. त्यांनी दरेकारांना ‘तु गप रे मध्ये बोलू नको’ असे म्हटले आणि पोटयांचे आठ दिवस आनंदात गेले. त्यात पुढे लगेच अनिल परबांचा फोन मिडीयासमोर सुरु झाला आणि नारायण राणेंना अटक झाली की नाही हे बघण्यात पुन्हा पोटयांचे तीन दिवस गेले. यात लगेच काल ‘किलीट सोमया’ ने उडी घेतली. आणि ‘लवकलच मुख्यमंत्ल्याच्या मागे ‘ईली’ लावू’ असे सांगून पुन्हा पोटयांच्या फेसबुकला रंग भरवला. आज पुन्हा ते झेड सुरक्षा घेउन अॅक्षन मध्ये आले आहेत. त्यांच्या सुरक्षेवर 60 लाख रुपये खर्च होणार आहे.
परवा करुणा ने परळीत येवून ‘कारुण्य’ दाखवले. पोट्टे तिच्या गाडीच्या मागे पळून पळून थकले. मध्येच अॅट्राॅसिटी चा गुन्हा दाखल झाला. आज पोलीस करुणा शर्माच्या मुबईतल्या घरी गेलेत. तिकडे मोहन भागवतांनी ‘सर्व मुस्लिम हे हिंदू आहेत’ असे म्हटले तर दुसरीकडे शरद पवारांनी ‘त्यांच्या मुळे माझया ज्ञानात भर पडली’ असे सांगून रान हाणले. तर तिसरीकडे गुणवरत्न सदावर्तेंनी ‘दिलीप वळसे आणि शरद पवारांना अटक करा’ असी मागणी करुन चर्चेला नवे वळण दिले.
दुसरीकडे आधुमधून कार्यक्रमात जाहीरात आल्यासारखे 12 अमदारांचा प्रश्न येतोच. परावा त्यातून राजू शेट्टीचे नाव वगळल्याच्या बातम्या आल्या तर त्यावर सदाभाउ खोत, राजू शेट्टीला म्हणाले, ‘कशीला चालत जा आणि माझी काशि झाली म्हणून सांगण.’
हा सर्व प्रकार बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की, तमाशातल्या बतावणीत आणि सरकारच्या बतवाणीत काहीच फरक नाही. तिथेही लोक आपले दुःख, प्रश्न विसरुन जातात आणि शिटया वाजवतात टोप्या उडवतात. इथेही लोक गॅस दरवाढ, पेट्रोल दरवाढ, बेकारीत होणारी वाढ, भरतीप्रक्रियेचा प्रश्न हे सर्व दुःख, प्रश्न विसरुन चालले आहेत. गेली एक महिन्यापासून उच्च शिक्षीत मुले नोकर भरती प्रक्रिया सुरु करा म्हणून पुण्यात उपोषणाला बसलेत. तिकडे कोणीच फिरकत नाही. मात्र 12 आमदारांची निवड प्रक्रिया रखडली म्हणून डझनावर नेते राज्यपालांना भेटायला जातात. तरीही आम्हाला आनंद आहे की, आम्ही लोकशाहीत आहोत.
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. भाजप चे सरकार देशात आहे. आनंदच आनंद आहे. कोरानामूळे नाटयगृह, तमाशे बंद असले म्हणून काय झालं. तुमच्या मनोरंजनात तीळमात्र कमतरता आलेली नाही. दोन्ही सरकारे खूप चांगली आहेत. फक्त आनंद घेता आला पाहिजे. ज्यांना या सर्व गोष्टींचा आनंद घेता येत नाही ते सर्व देशद्रोही आहेत आणि ज्यांना घेता येतो ते सर्व लोकशाहीवर प्रेम करणारे आहेत.
ज्यांना यातलं काहीच कळत नाही किंवा देणंघेणं नाही. त्यांच्यासाठी सरकारची नवी स्किम ‘लाईक, काॅमेंट, शेअर आणि सब्सक्राईब’ उपलब्धच आहे. कोणतेही चार्जेस नाहीत. त्यामूळे ‘बतावणी’ला जनतेचा जोरदार प्रतिसाद तर मिळणारच आहे. कारण ही सरकारची बतावणी आहे, जी तमाशाहून चांगली आहे.