Friday, May 20, 2022

प्रिय केतकी,

 



प्रिय केतकी, 

सध्या मी भारतीय लोकशाहीच्या बाबतीत अतीशय चिंतेत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, सद्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विचारमंच्यावर असताना त्यांच्यातल्या महिला पदाधिकाऱ्याने एक भाषण केले. आणि देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल बोलताना ‘फडणविस वटाना असेल, नाही तर तो नरेंद्र मोदी फुटाना असेल’ असे भाष्य केले. इतक्या खालच्या पातळीवर जाउन मा. शरद पवार किंवा मा. अजीत पवार कधीही बोलल्याचे माझ्या ऐकण्यात नाही. परंतु त्यांच्या पुढे जाउन देशाच्या प्रधानमंत्रयाबद्दल या पातळीवर जाउन बोलणारी पिढी निर्माण होत असेल तर लोकशाहीच्या वाद संवादाच्या आदर्श परंपरेचं काय? हा प्रश्न मला सातत्याने भेडसावतो आहे. देशाचे प्रधानमंत्री कोणत्याही विचारधारेचे असले, त्यांचे माझे विचार जरी जुळत नसले तरी टीका करत असताना इतक्या खालच्या पातळीवर जाणे हे भारतीय लोकशाहीला अशोभनिय आहे. भेलेही त्यांचा आणि आपला छत्तीसचा आकडा असला तरी ते देशाचे प्रधानमंत्री आहेत याचे भान विरोध करत असताना विरोधकांना असणे गरजेचे असते. याचा विचार सातत्याने मनात येत होता.   


अशातच पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ट नेते आणि सर्वेसर्वा असलेल्या मा. शरद पवार यांच्याबद्दल काही दिवसापूर्वी तु केलेले ट्विट  वाचण्यात आले. कोणी तरी त्रयस्त व्यक्तीने लिहीलेल्या चार ओळी तुझ्याकडून व्टिट केल्या गेल्या आणि वादंग उठले, तुझ्यावर गुन्हेही दाखल झाले आणि मला शाळेत सातत्याने दहा वर्ष शिकवलेल्या प्रतिज्ञेतील ‘मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशि सौजन्याने वागेन.’ या ओळी आठवल्या. सातत्याने दहा वर्ष आपण शाळेत रोज सकाळी ही प्रतिज्ञा करत आलो. मग ही प्रतिज्ञा आजची पिढी का मोडतेय? असा प्रश्न माझ्यासमारे उभा राहिला. आपण लोकशाही स्विकारली आणि प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं. पण हीच अभिव्यक्ती आपल्या लोकशाहीला अभिप्रेत होती का याचा आता नव्याने विचार आपल्याला करावा लागणार आहे. 

खरे तर भारताच्या लोकशाहीला वाद-संवदाची आदर्श परंपरा (होती) आहे. आपण आज जरी इग्लंड ही लोकशाहीची जननी आहे असे म्हणत असलो तरी खऱ्या अर्थाने भारतानेच जगाला लोकशाही ही शासनव्यवस्था दिलेली आहे. तथागत बुद्धाच्या काळात या लोकशाहीने जन्म घेतला. तत्कालीन परिस्थितीमध्ये संघाच्या ज्या सभा होत होत्या त्या सभांचे स्वरुप बघितले तर आपल्या लक्षात येईल की भारत हा लोकशाहीचा निर्माता आहे. पुढे हेच माॅडेल सम्राट अशोकाने नव्या नियमांसह आपल्या राज्यात लागू केले आणि विरोधकांनाही मान-सन्मान दिला. आज आपण ज्या लोकशाहीत जगतो आहोत त्या लोकशाहीत देखील हीच परंपरा कायम आहे. सत्ताधाऱ्यांना सत्ता गाजविण्याचा जेवढा अधिकार आहे त्याहून अधिक विरोधकांना विरोध करण्याचा आधिकार संविधानाने दिला आहे. असे जरी असले तरी, त्या विरोधाची भाषाही संवैधानिक आणि संसदीय संकेतांना धरुन असली पाहिजे हा आदर्श देखील आपण लक्षात घेतला पाहिजे. 

परंतु काही वाचाळ विरांनी या आदर्श संसदीय परंपरेला छेद देत अतिशय खालची पातळी गाठली आहे. ही खालच्या पातळीची संस्कृती काही मोजके पक्ष सोडले तर सर्वच पक्षांनी सध्या स्विकारलेली दिसते. म्हणून काही काही पक्षांची ओळख तर वाचाळ विरांचा पक्ष म्हणून व्हायला लागली आहे. अशा आवस्थेत आता आपल्यासारख्या तरुणांसमारे तीन पर्याय आहेत. एक तर या वाचाळ विरांसोबत आपण सहभागी होणे आणि त्यांना या परंपरेची जी मोठी रेष ओढायची आहे त्यात त्यांना सहकार्य करणे दुसरा त्यांनी ओढलेली रेष ही खोडून काढणे आणि तिसरा चांगला पर्याय म्हणून त्यांच्या बाजूला संसदीय संकेतांच्या चांगल्या परंपरेची मोठी रेष ओढणे. 


खरे तर यातला तिसरा पर्याय आपल्या सारख्या तरुणांनी आणि विषेशतः लेखक, साहित्यिक आणि कलाकारांनी स्विकारायला हवा. कारण आपण समाजाचे रोल माॅडेल असतो आणि आपला आदर्श घेउन नंतरची पिढी घडत असते. पण हा पर्याय अतिशय कठीण आणि संकटांचा असल्याने यात सहभागी होण्याची हिम्मतही कोणी दाखवत नाही. या पेक्षा सत्तेशी जुळवून घेतलेले बरे असेच अनेकांना वाटते. तुही तेच केलेस, तु हिम्मत हारलीस आणि वाचळ विरांच्या रांगेत जाउन उभी राहिलीस. तुझ्या पाठीशी उभे राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल. ही संख्या जरी तुझे सहकारी म्हणून वाढत जाणार असली तरी ते इतिहासात संसदीय लोकशाहीच्या आदर्श परंपरेचे शत्रू म्हणूनच ओळखले जातील यात शंकाच नाही. 


खरे तर हा देश इथल्या वाचाळ विरांना (तुझ्यासारख्या) समजलाच नाही आणि पुढेही समजणार नाही. तुला माहित आहे का? जेव्हा देशाचे पहिले मंत्रीमंडळ तयार झाले तेव्हा या मंत्रीमंडळात एकमेकांचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जाणारे नेते एकत्र आले आणि त्यांनी देशाची पायाभरणी केली.  यात ‘गांधी, नेहरु, आंबेडकर, मुखर्जी, आझाद’ अशा लोकांचा समावेश होता. त्यांनी देशाला एक आदर्श परंपरा घालून दिली आणि खरा भारत कसा असेल याची जाणीवही करुन दिली. म्हणून ग्रॅनिव्हल आॅस्टिन यांनी खरा भारत सांगत असताना एक प्रसंग सांगितला आहे. ते म्हणतात, ‘27 मे 1964 च्या दुपारी नेहरुंच्या मृत्युची बातमी मला समजली. मी तेव्हा दिल्लीत भारतीय संविधानावर एक शोधनिबंध लिहण्यासाठी गेलो होतो. परंतु नेहरु ज्या मुल्यांना घेउन जगले याचाही शोध मी घेत होतो. त्या दिवशी मी ‘तीनमूर्ती भवन’ येथे पोहचलो. जिथे नेहरुंच्या अंतीम दर्शनासाठी गर्दी जमली होती. तिथे येणाऱ्या अनेकांपैकी मी जेष्ट स्वातंत्रय सैनिक डाॅ. सैयद महमूद यांना येताना पाहिले. ते नेहरुंसोबत अनेक वर्ष कैम्ब्रीज विद्यापीठात आणि पुढे जेलमध्येही सोबत होते. डाॅ. सैयद महमूद आपला मित्र गेल्याचे दुःख व्यक्त करत होते, त्यांच्या डोळयातून आश्रू वाहत होते. आणि अस्पृश्य समुदायातून पुढे आलेले काॅंग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री बाबू जगजीवन राम त्यांना आधार देत होते. आॅस्टिन म्हणतात, ‘एक अछूत व्यक्ती एक मुसलमान समुदाय के व्यक्ति को ढांढस बंधाता हुआ एक सवर्ण हिंदू के आवास की तरफ ले जा रहा था। वाकई यह नेहरु की कल्पना का भारत था।’


हा प्रसंग आपल्याला खरा भारत सांगून जोतो. आपण तरुणांनी कुठलेही वाचाळ वक्तव्य करण्या ओगोदर हा भारत समजून घेतला पाहिजे. 1920 पासून एकमेकांच्या विरोधात (वैचारिकदृष्ट्य) असणारे सर्व नेते हे राष्ट्र घडवण्यासाठी एकत्र आले. लोकशाहीच्या संकेतानुसार एकमेकांना आदर, मान, सन्मान दिला. एकमेकावर टीकाही केली पण कोणाच्या व्यंगावर, दुःखावर त्यांनी बोट ठेवले नाही. ही परंपरा जपण्याची जबाबदारी आपल्यासारख्या लेखक, साहित्यिक आणि कलाकारांवर येते. म्हणून आपण जास्त जबाबदारीने वागले पाहिजे. लेखक, साहित्यिक आणि कलाकार म्हणून आपल्याला टीका करण्याचा अधिकार नक्कीच आहे ती सातत्याने केलीही पाहिजे. कारण लोकशाही जेव्हा जेव्हा धोक्यात आली तेव्हा तेव्हा तीला लेखक, साहित्यिक आणि कलाकारांनीच वाचवले आहे. 


तेव्हा सोड हे वाचाळ बोलणे आणि चल लोकशाहीच्या आदर्श परंपरेसोबत. कारण ‘‘तुला अभिव्यक्त होण्यासाठी जशी लोकशाहीची गरज आहे तशीच लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुझ्यासारख्या कलाकारांचीही लोकशाहीला गरज आहे.’’


डाॅ. ह. नि. सोनकांबळे

तुझा लोकशाहीतला मित्र

आणि

शाळेच्या रांगेत थांबून

All Indians are my brothers and sisters

म्हणणारा एक भारतीय