Sunday, December 11, 2022

...त्यांनी नामांतराचे आव्हान सामाजिक आणि राजकीय आशा दोन्ही पातळीवर पेलले





...त्यांनी नामांतराचे आव्हान सामाजिक आणि राजकीय आशा दोन्ही  पातळीवर पेलले

डाॅ. ह. नि. सोनकांबळे


साहित्यिक म्हणून यशवंतराव चव्हाण यांची एक इच्छा अपूर्णच राहीली. एकदा ते बोलतना म्हणाले होते की, ‘मला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र लिहायचे आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे  असामान्या बुध्दिमत्तेचे व्यक्ती होते. शाहूराजांनी, सयाजीरावांनी त्यांना पोटाशी धरले आणि त्यांनी देशाला घटना दिली. जाती, धर्म, पंथ भेदाभेद यापलिकडे विव्दान माणूस उभा असतो. मी हल्ली त्यांच्या जीवनचरित्रांचा अभ्यास नव्याने करतोय. त्यांचे चरित्र लिहून त्यांच्या कामाला, कार्यकर्तुत्वाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. बऱ्याच साधनांची जमवाजमव देखील झाली आहे.’  पण त्यांची ही इच्छा पूर्ण होउ शकली नाही. पण यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेले बौध्दांच्या शिष्यवृत्ती आणि सवलतीचे किंवा दिक्षा भूमिचे निर्णय हे ऐतिहासिक ठरले.



सामाजिक धारणा पक्की असली की राजकीय परिणामांची पर्वा करायची नसते. हीच भूमिका यशवंतराव चव्हाणांची होती आणि याच भूमिकेतून शरद पवारांनी आपल्या राजकीय कायरकिर्दीत इतिहासात नोंद होईल असे अनेक मोठे निर्णय घेतले. त्यातलाच एक मोठा आणि अग्निदिव्य पेलणारा निर्णय म्हणजे मराठवाडा विद्यापीठाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा.


                खरे तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे मराठाडयाच्या शैक्षणिक विकासात मोठे योगदान राहिले आहे. एकीकडे अलीगढ मुस्लिम विद्यापीठ आणि हिंदू बनारस विद्यापीठाची स्थापना होत असताना महाराष्ट्रात दोन व्यक्ती असे होते ज्यांना भारतीय जनतेच्या शिक्षणाचं काय? असा प्रश्न भेडसावत होता. त्यातलं एक नाव म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरं म्हणजे कर्मविर भाउराव पाटील. या दोघांच्या चिंतेतुन महाराष्ट्रात दोन शिक्षण संस्था उभ्या राहिल्या एका संस्थेचे नाव ‘पिपल्स एज्युकेशन’ तर दुसऱ्या संस्थेचे नाव ‘रयत शिक्षण’. या दोघांनी या दोन्ही संस्था कोणत्याही धर्माच्या नावावर उभ्या न करता थेट जनेतेच्या नावाने उभ्या केल्या. याच जाणीवेतून त्यांच्या योगदानाला जिवंत ठेवण्यासाठी जनतेनेच त्यांच्या नावाने विद्यापीठे उभी करणे गरजेचे होते. पण जनता मात्र त्यांच्या विरोधात उभी राहिली.



                कर्मविर भाउराव पाटील यांच्या नावाने एखादं विद्यापीठ असावं असा विचार अजूनही कोणाच्या डोक्यात आला नाही. मराठवाडयातल्या जनतेने मात्र डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हा इतिहास जिवंत रहावा आणि पुढच्या पीढीला त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात येवे अशी मागणी केली.


मराठाडयातील जनतेला उच्च शिक्षण मिळाले पाहिजे याचा विचार पहिल्यांदा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला. जेव्हा ते मिलींद महाविद्यालयाची स्थापना करण्यासाठी औरंगाबादला आले तेव्हा, माणीकचंद पहाडे यांनी त्यांना प्रश्न विचारला की, इथे महाविद्यालय चालेल असे तुम्हाला वाटते का? यावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की,  खरे तर मराठवाडयात केवळ महाविद्यालयाचीच नाही तर एका विद्यापीठाची देखील गरज आहे. पुढे मराठवाडा शिक्षण समिती स्थापन झाल्यानंतर या समितीने मराठाडयासाठी एखादे विद्यापीठ असावे अशी मागणी केली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरही या समितीचे सदस्य होते. स्वतः त्यांनी पं. जवाहरलाल नेहरु यांच्याशी  देखील विद्यापीठाच्या अनुशंगाने चर्चा केली होती. याचाच परिणाम म्हणून 1958 मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. ही पार्श्वभूमी आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे मराठाडयाच्या शिल्लक शिक्षणक्षेत्रातील योगदान याची जाणीव ठेवून मराठवाडयातल्या जनतेने त्यांचे नाव विद्यापीठाला देण्याची मागणी केली. मात्र त्यांच्या नावाला अनेकांनी विरोध केला. परिणामी मराठवाडयाला मोठया संघर्षातून पुढे जावे लागले.        महत्वाचे म्हणजे तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट ने विद्यापीठाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे असा ठराव बहुमताने पास करुन शासनाकडे पाठवला होता. विषय एवढाच होता की या निर्णयाला मान्यता देउन विद्यापीठाची पाटी बदलण्यात यावी. परंतु वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना, ‘इथून पुढे कोणत्याही संस्थेचे नाव बदलले जाणार नाही.’ असा निर्णय घेतला. या निर्णयाचे विपरीत परिणाम झाले इतर अनेक विद्यापीठांची नावे बदलले गेले परंतु डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावालाच विरोध का? असा प्रश्न मराठवाडयाच्या जनतेच्या मनात निर्माण झाला आणि संघर्ष तिव्र झाला.


                जेव्हा सामाजिक प्रश्न निर्माण होतात तेव्हा गरज असते एका प्रचंड इच्छाशक्ती असलेल्या नेतृत्वाची. नामांतराचा प्रश्न चिघळला तर आपली सत्ता जाईल याची भिती बाळगून असलेले वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले तर ‘नामांतराच्या निर्णयामुळे सत्ता गेली तरी बेहत्तर’ अशी भूमिका घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वसमावेशक धोरण ठरविणारी समिती स्थापन केली त्या समितीने जो बारा कलमी कार्यक्रम आखला त्यात विद्यापीठाला डाॅ. बाबसाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा देखील निर्णय होता. याचाच एक भाग म्हणून त्यांच्या मंत्रीमंडळाने हा ठराव पास केला. या निर्णयाने मराठवाडयात एका बाजूला दिवाळी साजरी झाली तर दुसऱ्या बाजूला उद्रेक आणि हिंसाचार झाला. जाळपोळ, हिंसा, हत्यांचे सत्र सुरु झाले.


                हा निर्णय राजकीय दृष्टीकोणातून सोडवला जाणार नाही याची जाणीव शरद पवारांना झाली. त्यासाठी आपल्याला सामाजिक पृष्ठभूमी तयार करावी लागेल याचा विचार करुन त्या पध्दतीचे समाजमन तयार करण्याची भूमिका शरद पवारांनी घेतली. याचाच एक भाग म्हणून त्यांनी अनेक गावच्या सरपंचांना व्यक्तीगत पत्रे लिहली, अनेक गावच्या पोलीस पाटलांशी आणि महाविद्यालयात जाउन विद्याथ्र्यांशी संवाद साधला. त्यांच्या या भूमिकेचे अनेकांनी स्वागत तर केलेच पण बापूसाहेब काळदाते, कवी बापूराव जगताप, जवाहर राठोड, फ. मु. शिंदे अशा अनेकांनी यात महत्वाची भूमिका पार पाडली. शिवाय कवी कुसुमाग्रज, वि. वा. शिवरवाडकरांसांरख्या अनेकांनी आकाशवाणीवरुन नामविस्ताराची आवश्यकता आणि सामाजिक ऐक्याची गरज अधोरेखीत केली. बी. जी. जावळे यांनी गोवोगाव फिरुन जळालेल्या वस्त्या, घरे, जाळपोळ, हिंसा याचे पेंटींग करुन अनेक गावांत प्रदर्शने भरवली आणि समजात ऐक्याची आणि सहानुभुतीची भावना निर्माण करण्याचे काम केले.


                दुसरीकडे भारतीय दलीत पॅंथरचे रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, गंगाधर गाडे, अॅड. प्रितमकुमार शेगावकर, दौलत खरात, रमेशभाई खंडागळे, मिलींद शेळके प्रकाश जावळे ही मंडळी आक्रमक आंदोलने करत होती. त्यांनाही सोबत घेउन हा प्रश्न सोडवावा असे शरद पवार यांना वाटत होते म्हणूनच राजीव गांधी औरंगाबादला आल्यावर त्यांच्यासोबत या सर्व नेत्यांची भेट घालून दिली. विद्यापीठात सामाजिक सलोखा टिकून रहावा या अनुशंगाने शरद पवारांच्याच काळात डाॅ. शंकरराव खरांतांच्या साहित्यातील योगदानाची दखल घेउन त्यांची कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली.


                सामाजिक आणि राजकीय अशा दोन्ही बाजूने शरद पवार नामांतराचे आव्हान पेलत राहीले. याचाच परिणाम म्हणून नामांतराऐवजी मराठवाडा विद्यापीठाचा ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार झाला. नामविस्तारानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विदवत्तेची उंची गाठणारी कामगिरी विद्यापीठाने करावी असे सर्वांना वाटत होते. विद्यापीठाने ते करुनही दाखवले. आज राष्ट्रीय पातळीवर साडेसातशे विद्यापीठात या विद्यापीठाचा 76 वा क्रमांक असून नॅकचे अ मूल्यांकन मिळाले आहे. याच विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाला अध्यक्षही दिले.


डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव विद्यापीठाला दिल्याने झोपडीतल्या अनेकांना उच्च शिक्षणाची दारे खुली झाल्यासारखी वाटू लागली आणि त्यांनी विद्यापीठाकडे धाव घेतली. नामांतराने झोपडीतल्या गुणवत्तेला संधी आणि संरक्षण दिले. आपलीही मुलं डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांसारखी उच्च शिक्षीत झाली पाहिजेत ही आस जागी झाली. याच मराठवाडयातल्या तरुंणाविषयी  शरद पवार आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्रात लिहताना म्हणतात, ‘महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही भागातल्या माणसांपेक्षा मराठवाडयातला युवक विकासाच्या मुददयावर भूमिका घेणाऱ्याशी जोडला जातो. आंदोलने आणि चळवळींमध्ये देखील हा युवावर्ग महाराष्ट्रातल्या इतर तरुणांपेक्षा अधिक सक्रिय असलेला दिसतो.’ आजही जेव्हा आपण या विद्यापीठाकडे पाहतो तेव्हा या विद्यापीठाच्या तरुणांनीच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जागृतीची मशाल तेवत ठेवल्याचे दिसते. याचे श्रेय या विद्यापीठाच्या बदललेल्या पाटीला जाते. म्हणूनच विद्यापीठाच्या नामांतरानंतर महाकवी वामन दादा कर्डकांनी नी लिहीले, ‘टीव्ही वरी रोडीओ वरी बोले शरदराव, विद्यापीठाला दिले बाबाचे नाव’ या नावात बरंच काही दडलं आहे. त्यांच्या नावासाठी 17 वर्ष चाललेला संघर्ष ज्यांनी संपवला अशा शरद पवारांना नुकतीच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘डी. लीट.’ या मानद पदवीने सन्मानित केले आहे. 


आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना भरभरून शुभेच्छा! 


 


*लेखक: एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद येथे राज्यशास्त्र व शासन विभागाचे सहायक प्राध्यापक व विभाग प्रमुख आहेत.