Monday, November 27, 2023

भारतीय संविधान आणि राष्ट्रनिर्मितीचा प्रवास

 भारतीय संविधान आणि राष्ट्रनिर्मितीचा प्रवास



डॉ. ह. नि. सोनकांबळे


25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत केलेले भाषण या वर्षी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पन करत आहे. या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या भविष्याबाबत वेगवेळ्या अंगाने चिंता व्यक्त केलेली दिसते. त्यातली एक महत्वाची चिंता म्हणजे भारताला देश म्हणायचे की, राष्ट्र. संविधान सभेतील अनेक सदस्यांना असे वाटत होते की, आपण भारताला राष्ट्र म्हणावे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते की, भारताला आपल्याला राष्ट्र म्हणता येणार नाही. कारण भारत राष्ट्र नावाच्या व्याख्येतच बसत नाही. परंतु हे संविधान भारताला राष्ट्रनिर्मितीकडे घेऊन जाईल असा विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना होता. परंतु त्यांना याचीही चिंता होती की, या संविधानाला राबविणारे लोक जर चांगले नसतील तर भारत कधीच राष्ट्र होऊ शकणार नाही.

मगाच्या साधारण नव्वद वर्षात भारतात भारतीय राष्ट्रवाद आणि हिंदू राष्ट्रवाद अशीही चर्चा ऐकायला मिळते परंतु या दोन्ही अंगोन चर्चा करणा­या लोकांनी आपण खरोखरच राष्ट्र आहोत का हे समजून घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाकिस्तान अथवा भारताची फाळणी, अॅन्हिलेशन ऑफ कास्ट आणि 25 नोव्हेंबर 1949 चे संविधान सभेतील शेवटचे भाषण मूळातून वाचणे गरजेचे आहे. म्हणजे राष्ट्रवाद या विषयावर चर्चा करणा­ऱ्या लोकांच्या हे लक्षात येईल की आपण अस्तित्वात नसेलेल्या राष्ट्राच्या राष्ट्रवादावर चर्चा करत आहोत.

स्वातंत्र्यापूर्वी हिंदू राष्ट्रवाद आणि मुस्लिम राष्ट्रवाद यावर जोरदार चर्चा होती. परंतु भारत हे राष्ट्र आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की, हिंदू समाज राष्ट्र नाही. मुस्लिम समाज राष्ट्र नाही. हिंदु-मुस्लिम समाज हेही राष्ट्र नव्हें. राष्ट्र अजून बनायचेच आहे. हिंदू समाजाला पाहिजे असेल तर निराळे राष्ट्र बनविता येईल. मुसलमान लोकांना स्वत:चे राष्ट्र बनवायचे असेल तर त्यांनाही निराळे राष्ट्र बनविता येईल. दोघांचं मिळून जर एक राष्ट्र करावयाचं असेल तर तसेही एक राष्ट्र करता येईल. राष्ट्र ही काही उपजत वस्तू नव्हे. ही घडीव आहे. घडवणा­याची इच्छा असेल तर घडवितां येईल. नुसत्या एकत्र मतदार संघानी एवढं होणार नाही. पाच वर्षांच्या अवधीत जे लोक एकमेकांचा तिरस्कार करतात, एकमेकांशी फटकून वागतात त्यांनी एक दिवस निवडणुकीकरिता एके ठिकाणी येऊन एकत्र मतदान केल्याने हिंदू-मुसलमानांचं एक राष्ट्र होईल असं म्हणारे लोक शतमूर्ख आहेत असे माझे म्हणणें आहे. म्हणूनच आपल्याला भारताला राष्ट्र म्हणता येणार नाही देशच म्हणावे लागेल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणने होते.

मग राष्ट्र म्हणजे काय? तर एकमय लोकांचा समूह म्हणजे राष्ट्र ही महात्मा फुलेंची व्याख्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्विकारलेली होती. म्हणूनच त्यांचे म्हणने असे होते की, जिथे एकमय लोकांचा समूह आहे तिथेच राष्ट्र अस्तित्वात येते. भारत हा एकमय लोकांचा समूह नाही. तो जाती-जातीत विभागलेला भूप्रदेश आहे. इथे लोक केवळ आपल्या जातीपुरते एकमय होतात. इथली प्रत्येक एक जात ही स्वत:ला राष्ट्र समजते आणि म्हणून भारत हा अशा हजारो राष्ट्रांचा समूह आहे असे त्यांचे म्हणने होते. जोपर्यंत इथली जातीव्यवस्था संपुष्टात येणार नाही तोपर्यंत आपल्याला स्वत:ला राष्ट्र म्हणून घेता येणार नाही याच विचाराने त्यांनी भारतीय संविधानाची रचना तयार केली. मूळात ही संकल्पना त्यांनी 1936 च्या लाहोरच्या भाषणात मांडली होती. परंतु भारताला राष्ट्रर्मितीकडे घेऊन जाण्यासाठी त्यांनी या संकल्पनेला संविधानाच्या तरतुदीत बसवले.

संविधानाच्या उद्देशिकेत असलेल्या सामाजिक आणि आर्थिक समतेशिवाय आपल्याला राष्ट्र म्हणून घेता येणार नाही याची जाणीव आणि चिंता त्यांना होती. परंतु संविधान सभेतील काही सदस्यांना असे वाटत होते की, आपण स्वत:ला राष्ट्र म्हणून घेण्यास काय हरकत आहे. परंतु आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते. याचे स्पष्टीकरण देत असताना त्यांनी अमेरिकेतला एक प्रसंग सांगितला आहे. अमेरिकेच्या प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च ने जेव्हा प्रार्थनेत दुरूस्ती करूण राष्ट्र या शब्दाचा वापर केला तेव्हा धर्मोपदेशकांनी हे मान्य केले, परंतु दुस­ऱ्या दिवशी मोठे वादंग उठले आणि आम्ही राष्ट्र कसे काय होऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित केला आणि लागलीच यात दुरूस्ती करून संयुक्त राज्य असा उल्लेख करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणने असे होते की, अमेरिकेसारखा काही मोजक्या संयुक्त राज्यांचा समूह जर राष्ट्र होऊ शकत नाही तर मग हजारो जातीत विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल. जोपर्यंत आपण सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या एकमय होणार नाही तोपर्यंत आपले राष्ट्र निर्माण होणार नाही.

जर असे असेल तर मग राष्ट्र निर्मितीचा मार्ग काय? याचेही उत्तर त्यांनी दिलेले आहे. भारताच्या राष्ट्रनिर्मितीचा मार्ग स्नेहभोजनातून, आंतरजातीय विवाहातून आणि शेवटी जातीअंतातून जातो. म्हणूनच त्यांनी भारतीय संविधानात समतेचा आग्रह धरला. संविधानाच्या निर्मितीमूळे कायद्याने जातीव्यवस्था संपली परंतु मानसिक बदल अजून होणे बाकी आहे. जोपर्यंत संधिानिक नितितत्वांचे पालन आपण करणार नाही तापर्यंत आपले राष्ट्र निर्माण होणार नाही आणि आपल्याला राष्ट्र म्हणून घेण्याचा अधिकार प्राप्त होणार नाही.  हे जेवढे लवकर आपल्या लक्षात येईल तेवढ्या लवकर आपण राष्ट्र होऊ असे त्यांना वाटत होते.

गेल्या पंच्याहत्तर वर्षात आपण स्नेहभोजनाचा आणि अंतरजातीय विवाहाचा टप्पा पार पाडला असला तरी जातीअंताच्या जाणीवाही काही प्रमाणात निर्माण होताना दिसत आहेत. परंतु या प्रवासाला गतीमान करायचे असेल तर गरज आहे आम्ही भारताचे लोक म्हणून प्रत्येकाने भारतीय संविधानाला अंगिकृत करून स्वत:प्रत अर्पण करण्याची.  

लेखक : एमजीएम विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.