धर्म असो कि खेळ
राजकारण त्यांना पायदळी तुडवते
डॉ. ह. नि. सोनकांबळे
लोकांनी धर्म डोक्यावर घेतला आणि धर्माच्या राजकारणाला सुरूवात झाली, लोकांनी क्रिकेटसारखा खेळ डोक्यावर घेतला आणि खेळाचे राजकारण सुरु झाले. जेव्हा एखाद्या चांगल्या गोष्टीचे राजकारण होते तेव्हा त्या गोष्टी सातत्याने पायदळी तुडविल्या जातात. मग तो धर्म असो की खेळ. कदाचित म्हणूनच आस्ट्रेलियाच्या कप्तानने ट्रॉफि पायाखाली ठेवली असावी.
भारतीय लोकशाही नवीन होती तेव्हा लोक म्हणायचे धर्म आणि राजकारणाची फरकत असली पाहिजे पण हळू हळू दोघांचे (नैतिक म्हणा किंवा अनैतिक म्हणा) चांगले सबंध जुळले. सुरुवातीला दोघांचे छुपे संबंध असले तरी पुढे ते उघड होत गेले आणि आज लोक कितीही नावं ठेवत असले तरी दोघे हातात हात घालून बाजारात सहज फिरताना दिसू लागले. नंतर लोक सहज बोलताना म्हणू लागले की, मैत्रीत राजकारण करायचं नाही. मैत्रीला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. पण युत्या झाल्या, आघाड्या झाल्या आणि राजकीय संसार थाटले जाऊ लागले. आज कोण कोणाची बायको आणि कोण कोणाचा नवरा हेच कळत नाही. पुढे लोक म्हणू लागले की, कुटुंब कुटुंबासारखं असलं पाहिजे कुटुंबात राजकारण नसलं पाहिजे. आज अनेकांचे परिवार हे राजकारणाचे आखाडे झाले आहेत. कोणाची कुस्ती कोणासोबत आहे हेच समजत नाही. पुढे लोक खेळाकडे आले आणि राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असावं खेळात राजकारण करू नयेे असं म्हणून लागले. पण काल याचा शेवटचा टप्पा पार पडला आणि याचाच परिणाम म्हणून मॅक्सवेल शेवटचा फटका मारून दुसरी धाव पुर्ण करत नाही तोवर लोक क्रिकेटच्या सामन्याचा स्क्रिन बंद करून सोशल मिडीयाच्या स्क्रिनवर आले आणि सुरु झाली ट्रोलिंगची तुफान बॅटींग.
कारण होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची स्टेडीयमवरची उपस्थिती. खरे तर वर्ल्ड कपचा अंतीम सामना बघायला या दोघांकडे अजिबात वेळ नव्हता कारण उत्तराखंडच्या बोगद्यात अडकलेल्या 41 लोकांना बाहेर काढण्यासाठी त्यांना जायचे होते. पण मैदानावरच्या एक लाख तीस हजार लोकांच्या आर्त हाकेचा आणि भावनेचा विचार करून ते अहमदाबादच्या स्वनामित स्टेडीयमवर येऊन बसले होते. एक लाख तीस हजार लोकांच्या भावनेचा बळी देऊन 41 लोकांना कसे वाचवायचे असा अवघड प्रश्न त्यांच्या समोर होता. बोगद्यात एखादा मोठा उद्योगपती अडकला असता तर गोष्ट निराळी होती. रिझर्व बँकेचा राखीव निधी वापरून एखादे राज्य विकुन त्याला बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागले असते आणि अशा परिस्थितीत त्यांना सामना बाघायला वेळ मिळाला नसता. पण एवढी अवघड परिस्थिती नसल्याने ते सहज मैदानावर येऊ शकले आणि समाना पुर्ण होईपर्यंत आणि स्वत:च्या हाताने वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाच्या हाती देईपर्यंत स्टेडीयमवर उपस्थित राहू शकले.
महत्वाचे म्हणजे या सामन्याचे आयोजक भारत सरकार किंवा कोणत्याही एखाद्या राज्याचा क्रिडा विभाग अथवा युवक मंत्रालय नसताना किंवा एखादी घटनात्मक संस्था नसताना देखील त्यांनी राष्ट्रीय नसलेल्या खेळासाठी इतका वेळ देणे म्हणजे भारतीय जनतेच्या भावनेशी खेळ न होऊ देणे असेच म्हणावे लागेल.
खरे तर भारताने सामना जिंकला असता तर एक लाख तीस हजार लोकांच्या पाठींब्याने स्टेडीयमवर एक भव्य यात्रा निघणार होती जय श्रीरामच्या घोषणा, हनुमान चालीसा आणि नरेंद्र मोदी की जय च्या जयजयकाराने स्टेडीयम दणाणून जाणार होते. संपूर्ण भारत भर लाखो लिटर दुधाचे, तुपाचे आणि तेलाचे अभिषेक केले जाणार होते. पण नियतीलाच चिंता याची होती की, या जयजयकाराच्या घोषणांत उत्तराखंडच्या बोगद्यात अडकलेल्या लोकांचा छोड्याशा छिद्रातून वाचवा म्हणून बाहेर येणारा आवाज दबला जाईल का? शेवटी भारताचा पराभव झाला आणि स्टेडियमवरच्या जयजयकाराचा आवाज शांत झाला.
पण याचा अर्थ खेळाची आणि राजकारणाची फारकत झाली असे कोणीही समजू नये. येणाया काळात कबड्डी, खो-खो किंवा हॉकी काहीतरी हाती लागेल आणि खेळाचे आणि राजकारणाचे सुत पन्हा जुळवले जाईल. इतके मोठ-मोठे धर्म जर राजकारणाने मुठीत घेतले असतील तर हा खेळ काय चीज आहे. धर्माचे नियम धर्मग्रंथात असले तरी त्याला मोडण्याची ताकद मूळातच राजकीय मनगटात असते. ते सर्व नियम मोडीत काढून धर्माला राजकारणाच्या कवेत घेतले गेले आहे. खेळाचे नियम तर शेवटी तुम्ही आम्ही तयार केलेले आहेत.
आता धर्म-धर्मासारखा वाटत नाही, मैत्री-मैत्रीसारखी वाटत नाही, परिवार-परिवारासारखा वाटत नाही. इथून पुढे खेळ-खेळासारखा वाटणार नाही. जास्तीत जास्त काय होईल तर राजकारणाच्या नादात लोक आपला मूळ धर्म विसरून गेले इथून पुढे खेळाडू खेळचा मूळ धर्म विसरून जातील.
काल ट्रॉफिला एकाचा हात लागला तर एकाचा पाय लागला. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्रॉफी ऑस्ट्रीलियन खेळाडूंच्या हाती दिली खरी परंतु त्या खेळाडूंनी ही ट्रॉफी चक्क आपल्या पायाखाली ठेवली. आमचे प्रधानमंत्री ज्या ट्रॉफीला डोक्यावर घेऊन मिरवणार होते त्या ट्रॉफीला पायाखाली ठेवले गेले. जेव्हा कोणत्याही गोष्टीला राजकारण गिळंकृत करते तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीची किंमत अशीच मोजली जाते. मग तो धर्म असो की खेळ. राजकारण त्यांना पायदळी तुडवते कारण राजकरण शेवटी स्वार्थाचा खेळ आहे.
लेखक: एमजीएम विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.