छत्रपती शिवाजी महाराज : द मॅनेजमेंट गुरु
डाॅ. ह. नि. सोनकांबळे
देशाची बदलती परिस्थिती पाहून आपल्याला शिवरायांच्या शस्त्राबरोबरच त्यांचे शास्त्र देखील समजून घ्यावे लागतील. कारण शस्त्र हे प्रेरणा देतात आणि शास्त्र हे सकारात्मक कृती करण्यासाठी चालना देतात. देशाच्या विकासासाठी आणि धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी देशातील तरुणांना आणि राज्यकर्त्यांना प्रेरणेची आणि सकारात्मक कृती करण्याची नितांत आवश्यकता आहे.
भारताच्या इतिहासातील कोणताही महापुरुष वर्तमानात समजून घ्यायचा असेल आणि तो पुढच्या पीढीला सांगायचा असेल तर त्यांच्या शस्त्राबरोबरच त्या महापुरुषांचे शास्त्र देखिल सांगावे लागते. जर आपण केवळ शस्त्र सागू लागलो तर संपुर्ण पिढी बरबाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर त्यासोबतच आपण त्यांचे शास्त्र सांगीतले तर राष्ट्राच्या विकासाला हातभार लागल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराजंाच्या बाबतीत देखिल आपल्याला हाच सावध पवित्रा घेणे गरजेचे आहे. कारण त्यांनी युध्दात वापरलेले शस्त्र जेवढे आपल्याला प्रेरणादायी आहेत तेवढेच त्यांचे विचार आजच्या देशाला देखिल विकासाकडे घेवून जाणारे आहेत. पण त्या सर्व विचारांची सैध्दांतीक मांडणी आपण न केल्यामूळे राजकारण, समाजकारण, शिक्षण, धर्मकारण, युध्दशास्त्र अशा अनेक विषयाच्या अभ्यासक्रमात आपण त्यांचे कोणतेही सैध्दांतीक विश्लेशण आणू शकलो नाही. म्हणूनच शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवह शालेय अभ्यासक्रमापुरता आणि इतिहासाच्या अभ्यासापुरता मर्यादित राहिलेला आपल्याला दिसतो. पण त्यांच्या राजकारण आणि युध्दशास्त्राची सैध्दांतीक मांडणी करुन त्यांना पाॅलिसी मध्ये परिवर्तीत करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. म्हणून जर आपल्याला त्यांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवायचा असेल तर त्यांचे शास्त्र आपल्याला वर्तमान परिस्थितीत समजून घ्यावे लागतील. देशाची अंतर्गत आणि बाहय सुरक्षा दिवसेंदिवस धोक्यात येत असताना आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थापनशास्त्र देखिल समजून घेतले पाहिजे.
शेतकरी, स्त्रीया, जल, पर्यावरण, अन्न, आरोग्य आदि समस्यांचे त्यांनी केलेल्या व्यवस्थापनाची प्रासंगीकता आपल्याला आजही जाणवताना दिसते. आज शासन स्तरावर सुरु असलेल्या शौचालय अभियानाला शिवरायांनी त्यांच्या काळातच सुरुवात केलेली दिसते म्हणून विविध गडावर अनेक शौचकूप आपल्याला पहायला मिळतात. आज देशभरात कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो आहे. त्याचे व्यवस्थापन आजूनही आपल्याला जमले नाही. शिवरायांनी त्याचेही व्यवस्थापन केलेले पहावयास मिळते. विविध ठिकाणी कचरा जमा करुन त्यापासून सेंद्रय खत निर्माण करणे व ज्या कचऱ्यापासून खत निर्माण होवू शकत नाही असा कचरा जाळून त्याची राख झाडाच्या बुडाला टाकून तिचा खत म्हणून उपयोग करण्याचा प्रयोग त्यांनी केला. युध्दासाठी लागणारा व इंधन म्हणून वापरला जाणारा लाकूड फाटा कोणता असावा याचा विचार त्यांनी पर्यावरणाचा आणि शेतकऱ्यांचा विचार करुन केलेला दिसतो. हिरवी झाडे, फळ देणारी झाडे व पर्यावरणाला पूरक असलेली इतर झाडे तोडू नयेत असा कायदाच त्यांनी केलेला होता. ‘रयतेने झाडे लावून लेकुराप्रमाणे बहुत काळ जतन करुन वाढविले, त्यासी तोडिल्यावरी त्यांचया दुःखास पारावर तो काय?’ याचा विचार करणारा हा पहिलाच राजा होता. पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीतही त्यांच्या धोरणाचा विशेष अभ्यास करणे आजही क्रमप्राप्त आहे. आज शेतकर्यानाच नव्हे तर पिण्याच्या पाण्यासाठी देखिल शेततळयांची आवश्यकता भासत आहे. शेततळे तयार करण्यासाठी प्लॅस्टिकचे अस्तरिकरण केले जात आहे. शिवरायांनी देखिल अशा प्रकारे पावसाच्या पाण्याचे नियोजन केले होते पण ते दीर्घकाळ कसे राहिल याचा विचार करत असताना त्यांना कोणत्या दगडात पाणी जास्त काळ साठवून ठेवण्याची क्षमता असते याचा शोध घेवून अशा प्रकारचे व्यवस्थापन केलेले दिसते. आज तिनशे फुटाहून अधिक खोदकाम केले तरी पाणी लागत नसताना गडावर मात्र पाणी आढळते. हे त्यांच्या व्यवस्थापनाचे यश म्हणावे लागेल.
त्यांच्या गुप्तचर खात्याचे व्यवस्थापन देखील अभ्यासण्यासारखे आहे. पुलवामा येथे झालेला हल्ला आपण सर्वांनी अनुभवला आहे. इतका मोठा हल्ला होत असताना देशाच्या गुप्तचर यंत्रणेकडे आपण दुर्लक्ष का करत आहोत असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडला असेल. शिवरायांच्या काळातही अशा प्रकारची गुप्तचर यंत्रणा होती. बहुरुप्याची सोंगे करणारे, नकला करणारे, फकिर, वासुदेव, भिकारी असे अनेक लोक शिवरायांसाठी गुप्तचर म्हणून काम करायचे परंतु शिवरायांनी अशा गुप्तचरांकडून आलेल्या माहितीकडे कधीही दुर्लक्ष केलेले दिसत नाही. या सर्व कामात पटाईत असलेले बहिर्जी नाईक हे या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख होते. बहिर्जी नाईकांनी दिल्ली, विजापूर, कर्नाटक, पुणे अशा विविध ठिकाणी आपल्या गुप्तचर यंत्रणेचे जाळे पसरवले होते. जवळपास तीन हजाराहून अधिक लोक त्यांच्या या गुप्तचर यंत्रणेत काम करायचे त्यांची एक वेगळी सांकेतिक भाषा देखिल होती ती फक्त त्यांनाच समजायची आणि चुकीची माहिती दिली तर कडेलोटाची शिक्षा देखिल व्हायची. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कार्यात या गुप्तचर यंत्रणेचे मोठे सहकार्य असल्याचे सांगितले जाते. सैन्याने युध्दाला निघाल्यावर कुठे थांबावे, त्यांच्या व घोडयाच्या अन्न पाण्याची सोय काय असेल याचे व्यवस्थापन शिवरांयांनी केले. सैन्यासाठी आवश्यक असलेली युध्द सामुग्री तयार करण्याचे कारखाने देखिल त्यांनी उभे केल्याचे दिसते. विजयदुर्ग, सिंधूदुर्ग, आणि रत्नागीरीच्या बंदराच्या जवळ शिवरायांनी जाहाज बांधीणीचे कारखाने व गोदामे उभी केली. यातून त्यांचा सागरी सुरक्षेचा विचार देखिल लक्षात घेण्यासारखा आहे.
आज शेतकऱ्यांची आवस्था अतिश य दयनीय अशी आहे. अशा परिस्थितीत शिवरायांचे शेतीप्रतिचे व्यवस्थापन देखिल सरकारने लक्षात घेणे गरजेचे आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देताना शिवरायांनी त्यांचा कर कमी करुन परकीय व्यापाऱ्याचे कर वाढवले आणि त्यातून शेतकऱ्यांना, शेतीची अवजारे आणि बी बीयानांचा पुरवठा केला. सैन्यासाठी लागणारे अन्न, भाजीपाला शेतकऱ्यांकडून विकत घ्यावा असा आदेशच त्यांनी सैन्याला दिला होता. दुभत्या जनावरांची काळजी घेण्याचे फर्मान काढून दुष्काळाच्या परिस्थितीत छावण्या देखिल त्यांनी उभ्या केल्या आणि शेतकऱ्यांना मोठा आधार दिला. म्हणूनच त्यांच्या राज्यात कधीच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे दिसत नाही.
शेतकरी, स्त्रीया, तरुणांसह सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेवून त्यांनी आपला राज्यकारभार केला. खुर्ची टिकविण्यासाठी त्यांनी कधीच कुठल्या जातीचा आणि धर्माचा आधार घेतला नाही. धर्मनिरपेक्षाता हे शिवरायांच्या राज्यकारभाराचे सुत्र होते. वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्थेला त्यांनी कधीच थारा दिला नाही. म्हणूनच ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य आणि शुद्र असा कुठलाच भेदभाव न करता त्यांनी प्रत्येकाच्या कलेचा आणि गुणवत्तेचा विचार करुन स्वराज्यात त्यांना महत्वाची पदे दिली. न्यायनिवाडा करत असताना त्यांनी कधीच स्वजात आणि परकी जात असा विचार केला नाही. बलात्काराच्या प्रकरणात हात पाय छाटत असताना त्यांनी कोणाच्याच धर्माचा आणि जातीचा विचार केला नाही. जातीनिरपेक्ष आणि धर्मनिरपेक्ष न्यायाचे सुत्र त्यांनी कायम अमलात आणले ज्याची आजही आपल्या देशाला गरज भासते.
शिवरायांच्या व्यवस्थापन शास्त्रात असे अनेक विषय आहेत ज्यांची आवश्यकता आपल्याला आजही भासते परंतु या देशातील तरुण आणि राज्यकर्ते यांना शिवरायांच्या शास्त्रापेक्षा त्यांचे शस्त्रच प्रिय वाटत आहेत म्हणूनच शिवरायांच्या विचारांची शास्त्रीय मांडणी आपण करत नाही. म्हणूनच या देशाच्या अंतर्गत आणि बाहय सुरक्षेचे मॅनेजमेंट अर्थात व्यवस्थापन आपल्याल करता येत नाही. म्हणून आपण शिवरायांना समजून घेत असताना तलवारीने लढाया जिंकणारा राजा म्हणून समजून घेण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेंजमेंट गुरु म्हणून देखिल समजून घेणे गरजेचे वाटते.
लेखक: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात अध्यापणाचे कार्य करतात.