भारतीय संविधानाच्या बाबतील अपप्रचार करणाऱ्या अनेक टोळया आहेत. ज्या की अर्धवट माहितीच्या आधारावर आपलं अर्धवट ज्ञान लोकांना पाजळत सुटतात. आपल्याला तर माहितच आहे की, चुकिच्या पोस्ट आजकाल सोशल मिडियावर झपाटयाने व्हायरल होत असतात. याचाच फायदा घेवून ही व्हाटसप युनिव्हर्सिटीत रममान असणारी मंडळी चुकिची माहिती पसरविण्यात माहिर आहे.
भारतीय संविधानाच्या बाबतीत अशीच एक चुकिची पोस्ट काही दिवसापासून फिरते आहे. त्या पोस्ट मध्ये असे म्हटले आहे की, प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना) हेच खरे भारतीय संविधानाचे मूळ लेखक आहेत. याचाच फायदा घेऊन काही मंडळींनी याचा अर्थ भारतीय संविधानाचे खरे शिल्पकार तेच असल्याचे सांगत सुटले आहेत. ही बाब अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने लिहण्यात आल्याने अनेकांचा यावर विश्वासही बसतो. या अनुषंगाने आपण ही भानगड काय आहे? याचा खुलासा करणे आवश्यक आहे.
ही व्यक्ती कोण?
भारताचे मूळ संविधान हस्तलिखित असून ते लिहित असताना इटालीक शैलीचा उपयोग करण्यात आलेला आहे. अशा प्रकारच्या कैलिओग्राफी मध्ये तत्कालीन परिस्थितीत एक नाव चर्चेत होते ते म्हणजे प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना). प्रेम बिहारी यांच्या कुटुंबातच कैलिओग्राफीची परंपरा होती. त्यांनी त्यांचे आजोबा मास्टर रामप्रसादजी सक्सेना यांच्याकडून याचे शिक्षण घेतले होते.
हे ही वाचा- स्वातंत्र्यपूर्वीच भारतात संविधानाचे 7 मसुदे तयार होते
नेहरुंच्या विनंतीवरुन:
प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांना तत्कालीन प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरु यांनी संविधान स्व:हस्ताक्षरात लिहण्याची विनंती केली. या विनंतीला मान देवून प्रेम बिहारी यांनी विनामोबदला संविधान आपल्या हस्ताक्षरात लिहले होते.
त्यामुळे संविधानाच्या मूळ प्रतीत PREM असे प्रत्येक पानावर आढळते.
लिहण्यासाठी सामग्रीः
या कार्यासाठी प्रेमबिहारी यांना सहा महिन्याचा वेळ देण्यात आला होता. शिवाय संसदेमध्ये त्यांच्यासाठी एक स्वतंत्र खोलीही देण्यात आली होती. या लेखनासाठी त्यांनी 432 पेनाच्या निब वापरल्याचे म्हटले जाते. (काही ठिकाणी 303 निब असा उल्लेख आढळतो)
पाने आणि वजनः
या मूळ हस्तलिखित संविधानात एकूण 251 पृष्ठे असून त्याचे वजन 3.75 किलो आहे. संविधानाची लांबी 22 इंच व रुंदी 16 इंच इतकी आहे.
हे ही वाचा- भारतीय संविधान: गांधीजी, काँग्रेस आणि डॉ. आंबेडकर
आता आपल्या असे लक्षात आले असेल की, भारताचे मूळ संविधान हस्ताक्षरात लिहणारी (लेखनिक) व्यक्ती म्हणजे प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना) हे होत. याचा अर्थ असा होत नाही की, ते संविधानाचे शिल्पकार किंवा मूळ लेखक आहेत. प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना) हे संविधान सभेचे सदस्य नसल्याने त्यांचा प्रत्यक्ष संविधान निर्मिती प्रक्रियेशी कसलाही सबंध नाही. केवळ त्यांचे हस्ताक्षर संुदर असल्याने नेहरुंनी त्यांच्या हस्ताक्षरात संविधानाची मांडणी करण्याची विनंती त्यांना केली होती. त्यावरुन त्यांनी हे कार्य केले होते.
डॉ. ह. नि. सोनकांबळे
टीप: कोणताही लेख शेअर करत असताना केवळ लिंक शेअर करावी. लेख कॉपी पेस्ट करू नये. ही विनंती.