Wednesday, December 19, 2018

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रविकासाची ब्लू (निळी) प्रिंट




डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रविकासाची ब्लू प्रिंट 
 
डॉ. ह. नि. सोनकांबळे
dr.hanisonkamble@gmail.com


विनंती :  कृपया बाजूला असलेल्या Follow या बटनावर क्लिक करा.


डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्यावर अतिषय समर्पक भाष्य अत्रे यांच्या लेखणीतून बाहेर आल्याचे दिसते. आचार्य प्र. के. अत्रे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘नवभारताचे निर्माते’ असे संबोधले आणि यातच सर्व काही आले असे म्हणावयास हरकत नाही. पण त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वाला समजून घेण्यास आमचे व्यक्तीमत्व मात्र नंतरच्या काळात खुजे पडले हे मान्यच करावे लागेल. आजही त्यांच्यावर होणारी टीका हे त्याचेच द्योतक आहे. परंतु दिवसेंदिवस भारतीय राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हा विषय महत्वाचा आणि गांभीर्याचा बनत चालला आहे. एके काळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘दलित’ या शब्दात बंदीस्त करण्यासाठी अनेकांनी टोकाचे प्रयत्न केले परंतु त्यात त्यांना अपयश आल्याचे दिसते. कारण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे नंतरच्या काळात केवळ भारतापुरते मर्यादित राहिल्याचे दिसत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष थाबो एम्बकी यांनी जानेवारी 2008 मध्ये त्यांच्या संसदेत दिलेले भाषण, ब्रिटीश पार्लमंेटचे सदस्य जेरमी कार्बीन यांनी अनेक वेळा ब्रिटीश संसदेमध्ये दिलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संदर्भ आणि त्याच संसदेचे सदस्य जेफ्री हून यांनी भारताची केलेली आधुनिक व्याख्या याशिवाय, शिक्षणक्षेत्रात केलंबिया विद्यापीठ, सायमन फ्रेजर विद्यापीठ, याॅर्क विद्यापीठ, आणि लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स मध्ये वेळो वेळी होणारी चर्चा आणि हंगेरी मध्ये त्यांच्या नावाने उभरण्यात आलेल्या शाळा, या जागतीक स्तरावरच्या घटना त्यांच्या विचारांची प्रासंगीकता आणि महत्व सिध्द करतात. 


भारतात मात्र आजूनही त्यांची ओळख ‘दलीत’ या शब्दाअंतर्गत करण्याचा प्रयत्न अनेक लोक करत आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व काही दलितांसाठी केले आम्हा हिंदूसाठी काहीच केले नाही. ही भावना इथल्या काही हिंदूमध्ये आजही आहे. याचे उत्तर इथल्या हिंदू धर्मातील लोकांना समजावून सांगत असताना आणि सावरकर ते भाजप या ग्रंथाचा शेवट करत असताना स. ह. देशपांडे यांनी दिलेले उत्तर मला हिंदू जनतेसाठी महत्वाचे वाटते. ते म्हणतात, ‘डाॅ. आंबेडकरांनी 1927 सालीच हिंदुमात्रांच्या जन्मसिध्द हक्काचा जाहिरनामा प्रसिध्द केला होता त्यात नव्या समाजरचनेची सूत्रे सांगीतली होती. हया विषम समाजरचनेची कडू फळे चाखायचे नशिबी आलेला पण मन हिंदुत्वाएवढे मोठे केलेला एक दलित विव्दान आणि लढवयया नेता साठसत्तर वर्षांपूर्वी हिंदुसंघटनपक्षास मिळाला असता तर देशाच्या इतिहासाला कलाटणी मिळाली असती. ती संधी त्या काळच्या हिंदुत्ववाद्यांनी घालवली आहे. परंतु ती संधी आजच्या हिंदूंनी तरी घालवू नये असे मला वाटते. देशपांडे यांच्या या वाक्याचा अर्थ आजच्या हिंदू पिढीनेतरी समजून घेतला पाहिजे. कारण या देशातल्या सर्व जनतेच्या उध्दाराचा विचार डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. 


देशाची फाळणी होण्याच्या आगोदरच त्यांनी लोकसंख्येच्या आदलाबदलीचा विचार मांडला होता. कारण एकवेळेस पाकिस्तानमध्ये जर हिंदू जनता अडकून राहिली तर त्यांना भविष्यात खूप त्रास सहन करावा लागेल याची जाणीव त्यांना होती. परंतु त्याकडे तत्कालीन परिस्थितीमध्ये दुर्लक्ष केले गेले. फाळणी झाल्यानंतर देखिल पाकिस्तानात अडकून पडलेल्या हिंदूंना भारतात आणण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरु आणि पटेलांकडे आग्रह धरला आणि महार बटालियन पाठवून पाकिस्तानातल्या हिंदूंना भारतात आणले गेले. परंतु या गोष्टी आपण आजही समजून घेत नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळयात नेहमी हे राष्ट्र आणि या राष्ट्रात राहणारा व्यक्ती होता. त्यांनी या दोघांच्या विकासाचा जेवढा विचार केला होता तेवढा कदाचितच कोणत्या नेत्याने केला असावा. म्हणूनच प्र. के अत्रे असे म्हणतात की, ‘अखंड भारताचा, ऐक्याचा आणि स्वातंत्र्याचा त्यांच्याएवढा प्रचंड निष्ठावंत पुरस्कर्ता या देशात दुसरा नाही. परंतु त्यांना आपण केवळ हिंदूंचे आणि भारतीय स्वातंत्र्याचे विरोधक एवढयापुरतेच मर्यादित समजून घेतले. 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच ‘दलित’ या घटकापूरता मर्यादित आणि संकूचित विचार केला नाही. भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणीक विकासाची ‘निळी प्रिंट’ (ब्लू प्रिंट) त्यांनी आगोदरच तयार करुन ठेवली होती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तीमत्व केवळ आजचा विचार करणारे नव्हते ते आजच्यासह उद्याचाही विचार करायचे. या देषाला एका वेगळया उंचीवर नेवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये होते. म्हणूनच नवयुगच्या एका लेखात अत्रे यांनी स्पष्ट पणे असे आवाहन केले होते की, अमेरिका आणि रशिया यांच्याशी स्पर्धा करण्याइतके सामर्त्य या देशाच्या अंगी यावे असे आपल्याला जर वाटत असेल, तर आपण हया देशाच्या भवितव्याची सूत्रे नेहरु आणि आंबेडकरांसारख्या अव्दितीय बुध्दिमत्तेच्या मुत्सुद्यांच्या हाती सोपविली पोहिजेत. परंतु भविष्यात तसे झाले नाही. वेळोवेळी त्यांना हिंदू विरोधी विशेषणे लावून त्यांचा राजकीय पराभव केला गेला. यासाठी अडाणी आणि धर्मभोळया जनतेचा त्यांच्या विरोधात वापर केला गेला. 


त्यांनी जेव्हा स्त्रियांच्या उध्दारासाठी हिंदू कोड बिल मांडले तेव्हा अडाणी आणि धर्मभोळ्या स्त्रियांचा वापर त्यांच्या विरोधात केला गेला याचा स्पष्ट उल्ल्ेाख ग्रॅनव्हिल आॅस्टिन यांनी केला आहे. बाबासाहेबांच्या दिल्लीच्या निवासस्थानावर हिंदू कोड बिलाच्या विरोधात मोर्चा पाठवला गेला. आमच्या सांस्कृतीक वैभवाचे डाॅ. आंबेडकर हेच विरोधक आहेत असा भास कायम ठेवला गेला आणि त्यांच्या विकासाच्या ‘ब्लू प्रिंट’ ला सातत्याने विरोध होत गेला. पण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे रसायनच असे होते की, त्यंानी आगोदरच सांगितले होते तुम्ही माझ्या विचाराकडे दुर्लक्ष करु शकत नाही आणि ते सार्थही ठरले. ज्या हिंदू कोड बिलासाठी त्यांनी अट्टाहास धरला होता परंतु ते तत्कालीन परिस्थितीत मंजूर झाले नाही. त्याच हिंदू कोड बिलावर आधारीत स्त्रियांच्या उध्दारासाठी भविष्यात बावीस हून अधिक कायदे तयार केले गेले. पण हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर अधारीत आहेत हे इथल्या व्यवस्थेने लोकांना कळूच दिले नाही. कामगार मंत्री असताना धनाबादच्या कोळशाच्या खाणीला भेट देवून आल्यानंतर गरोदर स्त्रियांना पगारी सुट्रया मिळाव्यात यासाठी कायदा त्यांनीच तयार केला. आज त्या कायद्यातील सुटयांचे प्रमाण सहा महिने झाले आहे. परंतु याची जाणीव किती भारतीय स्त्रीयांना आहे हा प्रश्नच आहे. म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्यात आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत का? याचा शोध आम्हा भारतीयांनी घेतला पाहिजे. 


देशाला भेडसावणारे प्रश्न मग तो भारत पाकिस्तान फाळणीचा असो, काश्मीरचा असो की भारताच्या अंतर्गत आणि बाहय सुरक्षेचा असो अशा कितीतरी प्रश्नावर त्यांनी उत्तरे शोधून ठेवली आहेत. परंतु ते समजून घेवून त्याची आमलबजवाणी करण्यात आमची राजकीय शक्ती कमी पडत आहे असेच म्हणावे लागेल. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राच्या विकासाला चालणा देणारे नदी जोड प्रकल्प, उर्जा प्रकल्प,शै क्षणिक धोरणे याचा आराखडाच तयार केला होता. परंतु त्यांच्या जाण्याने अशी कितीतरी कामे आजही अपूर्णच आहेत. आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक राजकीय पक्षाच्या स्टेजवर दिसत आहेत परंतु त्यांच्या राष्ट्राच्या आणि मानवतेव्या विकासाची ब्लू प्रिंट कोणाकडेही नाही. ज्या दिवशी ही ब्लू प्रिंट घेवून एखादा राजकीय पक्ष या देशाच्या सत्तेवर येईल त्याच दिवशी आपण खऱ्या अर्थाने या महाकारुणीकाला समजून घेण्यात यशस्वी ठरणार आहोत. 

लेखक: एमजीएम विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व शासन विभागात सहाय्यक प्राद्यापक आहेत.

1 comment: