गीता वाटपाचे कर्म
डाॅ. ह. नि. सोनकांबळे
dr.hanisonkamble@gmail.com
कार्ल मार्क्स ने समाजाची विभागणी जरी दोन वर्गात केली असली तरी बहुरंगी संसकृती असलेल्या भारतात मात्र प्रमुख्याने तीन वर्ग आहेत. श्रीमंत, मध्यम आणि गरीब यातल्या पहिल्या आणि तिसऱ्या वर्गाला धर्माशी, दैववादाशी काही एक देणे घेणे नसते. तो त्याचे पालन सोईनुसार करत असतो. कारण या वर्गाचे भाकरीचे प्रश्न मिटलेले असतात आणि आम्ही जे काही ऐश्वर्य प्राप्त केले आहे ते स्वकष्टाचे आहे यात कोणत्याही धर्मीक अथवा दैवी शक्तीचा हस्तक्षेप नाही याची जाणीव या वर्गाला झालेली असते. यातल्या तिसऱ्या वर्गाचे भाकरीचे प्रश्न मिटलेले नसतात त्यामूळे या वर्गाला जो आज आपल्याला भाकर देतो तोच आपला धर्म आहे असे वाटत असते. प्रश्न आहे तो मध्यम वर्गाचा त्याला कधीच खालच्या वर्गात यावे वाटत नाही आणि वरच्या वर्गात जाण्याची धडपड जरी त्यांची असली तरी त्याला दैवी शक्ती प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला जाता येत नाही असे वाटत असते. म्हणून तो नेहमी या दैवी शक्तीला जागृत करण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि धर्माच्या प्रचार प्रसाराने आणि आचरणाने ईश्वर खुश होत असतो असे त्याला वाटत असते. त्यामूळे तो ‘स्वकर्मणा तमभ्यच्र्य सिध्दि विन्दत मानवः!’ असे म्हणून चालत असतो. म्हणूनच की काय जाॅन ब्रेमन हा हिटलरकालीन विचारवंत ‘द हिंदू राईट’ या लेखात असे म्हणतो की, मध्यम वर्गच खऱ्या अर्थाने धार्मिक विचाराला खतपाणी घालत असतो. याच वर्गाने भारतात हिंदूत्ववाद आणि जर्मनीत फॅसिझमचा प्रभाव वाढविण्यासाठी हातभार लावला आहे. असा दावाही त्याने आहे रो कदाचित खरंच असावा. म्हणून भारतात सध्या महावि़द्यालयामध्ये सुरु असलेला गीता वाटपाचा कार्यक्रम बहुरंगी संस्कृती असलेल्या भारताला काही नवीन आहे अशातला भाग नाही. परंतु या सर्वच धर्म ग्रंथाला हिंदू धर्मातच दोन बाजू आहेत.
पहिली बाजू मांडताना सावरकर असे म्हणता की, हिंदू धर्मात जे प्राचिन आणि हिंदू धर्माला मार्गदर्शक ठरले ते सर्व धर्मग्रंथ कालबाहय ठरले असून ते नष्ट करावेत अथवा कोपऱ्यात टाकून द्यावेत. आणि दुसरी बाजू मांडताना गोळवलकर असे म्हणतात की, भगवतगीता आणि वेद हे हिंदुत्वाचे आधार आणि प्रमाण आहेत. म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आता प्रश्न असा आहे की, जर सावरकरांचे म्हणने न ऐकता गोळवलकरांच्या म्हणण्याप्रमाणे या धर्म ग्रंथांना प्रमाण माणले तर समाजातल पहिला वर्ग जो अर्थातच प्रचंड श्रीमंत आहे तो याचे पालन करेल का? कारण गोळवलकरांची अशी अपेक्षा आहे की, मनूने सांगितल्याप्रमाणे ‘यावत भ्रियेत जठरं तावत स्वत्वं हि देहिनाम’ अधिक योद्यभिमन्येत स स्तेनो दण्डमर्हति’ याचा अर्थ देहधारणेला जेवढे आवश्यक असेल तेवढेच ग्रहण करा, त्याहून जो अधिक ग्रहण करतो तो चोर आहे आणि म्हणूनच तो दंडणीय आहे. याचा अर्थ पहिला वर्ग या शिक्षेस पात्र आहे असेच म्हणावे लागेल. पण धर्म ग्रंथाचे वाटप करणारे सरकार या धर्म ग्रंथाचा आधार घेवून यांना शिक्षा करेल का? म्हणून धर्म ग्रंथ वाटणे आणि त्याचे पालन करणे या दोन वेगवेगळया गोष्टी आहेत. आपण कितीही जबरदस्तीने या धर्म ग्रंथाचे वाटप केले तरी ते घरात ठेवायचे की सावरकरांकडे द्यायचे याचा विचार सुज्ञ लोकांनी करायचा असतो.
तसा हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असून तो फार जूना आहे. 1982 ला दत्तोपंत ठेंगडी यांनी स्थापन केलेल्या ‘भारतीय विचार केंद्रम’ या संस्थेने गीता या ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘भारतीय विचार केंद्रम रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट’ या नावाने विविध विद्यापीठात शाखा सुरु केल्या आणि 1998 हे वर्ष ‘गीता वर्ष’ म्हणून साजरे केले. त्या निमित्ताने केरळ या राज्यात 400 गीता शिबीराचे आयोजन करण्यात आले. इतकेच नाही तर ‘द भगवत गीता अॅन्ड माॅडर्न प्राॅब्लेम’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र देखिल भरविण्यात आले. परंतु तुर्तास तरी या सर्व कार्यक्रमाचा केरळ मध्ये काही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. कारण आता लोक प्रत्येक वस्तूची उपयुक्तता बघून ठरवतात की, एखाद्याने आपल्याला फुकटात काही दिले तर ते घ्यायचे की नाही?
म्हणून एखाद्याने फुकटात गीता वाटली, दुसर्याने कुराण वाटले, तिसऱ्याने बायबल वाटले आणि चैथ्याने जर संविधान वाटले तर वाचणारा व्यक्ती काही अडाणी नाही तो वाचेल आणि आपल्या घरात आणि डोक्यात काय ठेवायचे याचा विचार करेल. कारण हजारो वर्षापासूनच्या गुलामीतून ज्या ग्रंथाने आम्हाला मुक्त केले तो ग्रंथ प्रमाण मानायचा की ज्या ग्रंथांनी गुलाम ठेवले ते ग्रंथ प्रमाण मानायचे हे लोकच ठरवतील. कारण या ग्रंथांना जर लोकांनी प्रमाण मानले असते तर आज हे ग्रंथ लोकांच्या घरात असते आज असे मोफत वाटण्याची वेळ सरकारवर किंवा कोणत्याही धार्मिक संस्थेवर आली नसती. आणखी एक गोष्ट हे ग्रंथ वाटणाऱ्यानी लक्षात ठेवली पाहिजे की, आपल्या या कृतीमूळे धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा जनतेषी संघर्ष निर्माण होता कामा नये. आणि असा संघर्ष भविष्यात निर्माण झालाच तर फिलिपिन्स च्या राष्ट्राध्याक्षाप्रमाणे ईश्वराचे अस्तित्व सिध्द करुन दाखवा असा प्रश्न जनताच या दोन्ही सत्तेला विचारेल आणि हे जर सिध्द नाही करता आले तर आपल्याला ठावूकच आहे फुकटच्या वस्तूची किंमत ही नेहमी शून्यच असते. तरी परंतु या ग्रंथाला पुन्हा एकदा किंमत प्राप्त व्हावी हा हेतू जर गीता वाटपाच्या कर्मामागे असेल तर त्यांनी उद्या निर्माण होणाऱ्या प्रश्नाच्या उत्तरासह सज्ज रहावे. अन्यथा धर्म आणि धर्मग्रंथ दोन्ही खोटे ठरण्याची शक्यता आहे.
डाॅ. ह. नि. सोनकांबळे
लेखक: राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत.
महाराष्ट्र टाइम्स प्रकाशित लेख १५ जुलै २०१८
No comments:
Post a Comment