Wednesday, March 6, 2019

हिंदू राष्ट्रवादाची नव्याने चिकित्सा







प्रा. ज्ञानेश्वर कांबळे 
-लेखक, मराठी साहित्याचे समीक्षक आहेत.

डाॅ. ह. नि. सोनकांबळे यांनी लिहलेला "हिंदू राष्ट्रवाद: परिवर्तनशील भारतीय समाजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका" हा ग्रंथ जनमानसात चिंतन करायला भाग पाडून भविश्यातली चिंता दाखवून देणारा आहे आणि हिंदू राष्ट्रवादाची नव्याने चिकित्सा करणारा ग्रंथ आहे. 


हा ग्रंथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आहे, हे वेगळे सांगण्याची गरजच नाही. खरे तर संघावर अनेक लेखकांनी अनेक ग्रंथ लिहिलेली आहेत. त्यात रावसाहेब कसबे यांनी ‘झोत’ लिहून संघावर प्रकाश टाकला आणि पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उर्जा पुरविण्याचे काम या पुस्तकाने केले. त्यानंतर बाबा आढाव, जयदेव डोळे यांनीही संघावर पुस्तके लिहिली आहेत. इंग्रजी भाषेतही काही लेखकांनी संघावर लिहिले आहे. संघावर लिहिलेली उपरोक्त पुस्तके संघाच्या कार्यप्रणालीची प्रसंगोपात्त मिमांसा करणारी आहेत. जयदेव डोळे यांचे आरेएसएस हे पुस्तक संघाची दुगली भूमिका स्पष्ट करीत, संघाच्या कटकारस्थनाचा आंतरभाग उजागर करताना दिसतो. पण संघाचा व्याप, संघाचा अंतबाह्रया चेहरा त्याची पाळेमुळे शोधण्यासाठी एवढे लिखन अपुरे होते हे या ग्रंथाच्या वाचनानंतर लक्षात येते. डाॅ. ह. नि. सोनकांबळे यांचे पुस्तक आशयाच्या व्यापकतेनुसार संघाचे पाळेमूळे शोधून संघाच्या तत्त्व आणि कार्यप्रणालीची मिमांसा करीत संघाच्या दुटप्पी प्रणालीचे पितळ उघडे पाडणारे व पुरोगामी चळवळीतल्या संवेदनशील कार्यकर्त्याची झोप उडवणारे आहे. या पुस्तकाच्या शीर्षकापासून ते मलपृष्ठापर्यंत येणारा प्रत्येक शब्द देशात आलेल्या आणि येउ घातलेल्या अरिष्ठाच सूचन करणारा आहे. याकडे जर दुर्लक्ष झाले तर? ......तर... याचेही उत्तर या पुस्तकातून मिळते. 


या ग्रंथाची प्रस्तावणा मुळातून वाचण्यासारखी आहे. एखाद्या संघीय व्यक्तीने ही प्रस्तावना नजरेखालून घातली तर आपण जे काही कार्य करीत आहोत ते कोणत्याही ‘मानुष’तेला धरुन नसल्यामुळे आपला फक्त उपदव्याप आहे, हे त्याला कळून चूकल्याशिवाय राहणार नाही. पण .... संघात अशी माणसे आहेत कुठे? बुध्दी चालवणाऱ्या , विचार करणाऱ्या माणसाला संघात प्रवेश नाही. ‘एकचालकानुवर्ती’ वृत्ती ही संघाची कार्यप्रणाली आहे. बालपणापासून व्यक्तीवर तसे संस्कार केले जातात, त्याला तसे घडवले जाते, अगदी साच्यासारखे. संघ एक साच्या आहे. त्यातला कोणताही व्यक्ती बोलत नसतो. तो काम करीत असतो. म्हणून लेखकाने संघाची तुलना ‘फॅसिझम’शी केलेली आहे. या देशातला कितीही मोठा बुध्दीवादी व्यक्ती, संघाची ही विचारधारा मानत असेल तरच तो मोठा, तरच तो राष्ट्रवादी अन्यथा तो क्षुद्र आणि राष्ट्रद्वेष्टा असतो. हे अगदी स़द्यकाळातील भारतीय पर्यावरण लक्षात घेतले तर लक्षात यईल. 


जगतीक पातळीवर वंश आणि वर्णाच्या संरक्षणातून, अहंकारातून ज्या फॅसिझम, ईखवानुल मुसलमीन या वृत्तीची निर्मिती झाली अगदी त्याच वृत्तीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाली. भारतीय पुरातन परंपरा, संस्कृती, भाषा आणि कायदा जतन करणे हे संघाचे उद्दिष्टे आहे. शाखेत शिक्षण पूर्ण झाालेल्या व्यक्तिंनाच संघात सहभागी करुन घेतले जाते. संघात सहभागी करुन घेताना त्याला जी शपथ दिली जाते. ती आज चिंता करायला लावणारी बाब आहे. ‘सर्वात बलिष्ठ परमेश्वर आणि माझे पुर्वज यांना स्मरुन मी अशी शपथ घेतो की, पवित्र हिंदू धर्म, हिंदू समाज व हिंदू संस्कृती यांच्या विकासाला उत्तेजन देउन भारतवर्षाची सर्वांगीन उन्नती साधण्यासाठी मी...... मी माझी शपथ जन्मभर पाळेन. जय बजरंग बली, बली बलभीम की जय. ही शपथ देशाच्या मंत्रीमंडळात सहभागी करुन घेताना प्रत्येक मंत्र्याला दिली जात नसावी असे कोण म्हणेल? कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हीच भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था आहे. संघ लोकशाही, राज्यघटना, तिरंगा, कायदा, निवडणूक प्रक्रिया मुळातून मानीतच नाही. म्हणून प्रत्येक मंत्र्याला उजागर दिली जाणारी शपथ वेगळी आणि संघकार्यालयात दिली जाणारी गुप्त शपथ वेगळी, असे नसेल कशावरुन. केंद्रीय मंत्रीमंडळातील काही मंत्र्याच्या तोंडून निघालेली वक्तव्ये ऐकली की, या मंत्र्याना उपरोक्त शपथ दिली जाते, या विधानाला पुष्टी मिळते. 


या देशात धर्म आणि धर्मग्रंथांनी लादलेल्या गुलामगिरीत, दमणकारी व्यवस्थेत, शतकानुशतकापासून शोषण झालेला कर्मकवषाकसिंध्दांताने बटीक केलेल्या संस्कृतीत पिचत पडलेला, बहुजन वर्ग स्वातंत्र भारताच्या राज्यघटनेने थोडाफार श्वास घेतोय ती राज्यघटनाच नाकारायची म्हणजे? पुन्हा मनुस्मृती लागू करायची! माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणतात मनुस्मृती सारखा चांगला कायदा असताना राज्यघटनेची आवष्यकताच काय? हे कसे सहन करायचे? हा प्रश्नच आहे. संघ हा हिंदू धर्माला धर्म मानतच नाही. तर हिंदू धर्म हा धर्म नसून ते राष्ट्र आहे असे मानतो. आणि हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था हे अर्थव्यवस्थेचे विकेंद्रिकरण आहे म्हणून जातीव्यवस्था मजबूत झाली तरच राष्ट्राची उन्नती होते ही भाबडी मनोधारणा, भाबडया लोकमानसात रुजवण्याचा प्रयत्न करताना हिंदू धर्म आणि धर्मग्रंथांनी निर्माण केलेल्या मिथकांना, प्रतिकांना मातृत्वाच्या ठिकाणी ठेवून त्यांना राष्ट्रीयत्वाच्या मुख्य प्रवाहात आनतात, त्या दृष्टीने ‘गाय’ या प्राण्याचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. ज्या सावरकरांना संघ पुज्यस्थानी मानतो ते वि. दा. सावरकर गायीला प्राणी समजतात देवता मानत नाहीत. ‘गाय ही गाढवाची देवता होउ शकते परंतु गाईला देव म्हणायचा गाढवपणा माणसाने करु नये.’ असे सांगतात, त्या गाईला संघ मातृत्व बहाल करतो आणि तिच्या हिंसेबददल जाहीर मानवी कत्तली केल्या जातात. संघाच्या कृतीचे सखोल चिंतन लेखक ह. नि. सोनकांबळे यांनी या पुस्तकातून मांडले आहे. या सनातनी वृत्तीला विरोध करणारा जो कोणी असेल तो राष्ट्रद्रोही आहे आणि तो संघाचा शत्रू आहे. मग संघाचे शत्रू कोण? ख्रिश्चन, मुस्लीम आणि कम्युनिष्ट. खरेतर संघाचे शत्रू डाॅ. बाबासाहेब आंबेडकर असायला पाहिजे होते, पण नाहीत, म्हणजे हिंदू धर्मव्यवस्थेला विरोध करुन ज्यांनी बौध्दधम्म स्विकारला, हिंदू धर्माची चिकित्सा करुन चिरफाड केली तरीही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे संघाचे शत्रू नाहीत ही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. याची सखोल मिमांसा या पुस्तकातून आलेली आहे. 


या ग्रंथात चार प्रकरणे आहेत, दुसऱ्या प्रकरणात लेखकाने स्थापनेपासून ते आजपर्यंत विस्तारलेल्या संघाचा आढावा घेतला आहे. संघाचा हा विस्तिर्णपट पाहिल्यानंतर वाचक स्थगीत झाल्याशिवाय राहणार नाही. एवढेच नाही तर एखादा संघीय सुध्दा भांबावून जाईल कारण संघाची कार्यप्रणाली कामालीची गुप्त असते. म्हणून संघाचे बाह्रयरुप आगदी लोभस, निरागस तेवढेच आपणाला माहीत आहे. त्यांचे लपून असलेले विस्तीर्ण अंतरंग लेखकाने उजागर केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मातृसंस्था आणि या मातेला जन्मलेली आपत्य कोणत्या स्तरावर कसले उपदव्याप करते आणि तिचे जाळे किती सर्वदूर पसरले आहे याची साद्यंत आणि सखोल मांडणी या प्रकरणात आहे. त्याबरोबरच या ग्रंथाच्या तिसऱ्या आणि चैथ्या प्रकरणात भारतीय परिप्रेक्षातील नामवंत म्हणवल्या जाणाऱ्या राष्ट्रानेत्यांकडून संघाला कशी मदत झाली आणि संघाच्या कार्यप्रणालीवर कोणकोणत्या संरसंघचालकाचा ठसा आहे? संघाने आपल्या धोरणात कसा कसा बदल केला? आपले मुख्य सनातन उद्दिष्टये साकार करण्यासाठी संघाने कोणती निती वापरली? भारतीय जनता पार्टीचे सरकार बहुमताने कसे आले? भविष्यात जर पुरोगामी संघटना सजग झाल्या नाहीत तर काय होईल? या प्रश्नांची उत्तरे हा ग्रंथ मुळातून वाचल्याशिवाय कळणार नाहीत. अतिशय चिकाटीने संशोधन करुन हा ग्रंथ लिहिल्यामूळे लेखकाचे आणि या अराजकतेच्या वातावरणात प्रकाशकाने छापले या दोघांचे त्यांच्या धाडसाबदल अभिनंदन करावे तेवढे कमी आहे. 


शेवटी परंपरापोशित संरजामी मूल्यावस्था आणि वर्णव्यवस्था राबवणाऱ्या यंत्रणा पेशवाई आपल्या हातात ठेवत असते नव्हे, ती अशी यंत्रणाच बनवते. पेशवाई ही यंत्रणाच घातक आहे. दमनकारी आहे, हे इतिहासाने सिध्द केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातून पेशवाई कधी आणि कशी निर्माण केली हे जसे इतिहासातील लोकांना कळू दिले नाही. 1818 ला कोरेगावच्या लढाईत पेशवाई नष्ट झाल्यानंतर आगदी पुण्यातील सर्वच स्त्रियांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला असे लोकहितवादी सांगतात यावरुन पेशवाई किती धूर्त, दमनकारी होती याची प्रचिती येते. तशीच आजही नव्यानं दूसरी पेशवाई कशी निर्माण झाली ही आपणाला कल्पनाच नाही, पण त्याच पेशवाईची ही पूनरावृत्ती झाली हे सद्यकालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृृतीक या सर्वच क्षेत्रातील वातावरणातील गढूळतेमूळे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. हे मूळातून समजून घ्यायचे असेल आणि सजग व्हायचे असेल तर वाचक मूळातून हा ग्रंथ वाचतील असा विश्वास व्यक्त करतो. 


हिंदू राष्ट्रवाद: परिवर्तनशील भारतीय समाजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका 
लेखक: डाॅ. ह. नि. सोनकांबळे 
प्रकाशक : भाष्य प्रकाशन मुंबई 
एकुण पृष्ठे: 272, किंमत: 350रु.


1 comment: