काय होता? डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा निवडणूक जाहीरनामा
डाॅ. ह. नि. सोनकांबळे
लोकशाहीत लोक आपल्या हक्काच्या बाबतीत जागरुक, कर्तव्याच्या बाबतीत उत्साही आणि आपल्या देशाच्या राज्यकारभारावर प्रत्यक्ष लक्ष ठेवणारे असावेत असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते. परंतु आजही लोक या सर्व बाबतीत उदासिन असल्याचे चित्र आहे. पाच वर्षातून एक बटन दाबायला मिळणे म्हणजे मतदान करणे आणि लोकशाहीत सहभागी होणे असा अर्थ रुढ होत चालला आहे. मतदार जागृतीच्या बाबतीत केवळ जाहीराती करुन मदतान करा इतकेच सांगण्यात येत आहे. परंतु जो पक्ष या देशाचे दारिद्रय दूर करुन देशाला सक्षम करेल त्या पक्षाला मतदान करा असे कोणीही सांगत नाही. म्हणूनच लोकशाहीतला सार्वभौम नागरीक आपल्या दारिद्रयापासून मुक्त होत नाही. कधी काळी निवडणूका या पक्षाच्या जाहिरनाम्यावर लढवल्या जायच्या, मात्र आज ती परिस्थिती राहिली नाही. निवडूकीतले जाहिरनामे हारवले आहेत. आजच्या विविध पक्षाचे जाहीरनामे आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा जाहीरनामा याची तुलना केली तर पुन्हा एकदा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जाहीरनाम्याची गरज भासल्याशिवाय राहणार नाही.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणाला व्यक्ती, समाज आणि राष्ट्रविकासाचे साधन मानून निवडणूका लढवल्या. आजही त्यांच्या 1951 च्या निवडणूक जाहीरनाम्यावर नजर टाकली तरी तो जाहीरनामा किती प्रासंगिक आहे हे पटकन लक्षात येईल. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही चतुसुत्री त्यांच्या प्रत्येक कार्यात जशी जाणवते तशीच ती पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यातही प्रकर्शाने जाणवताना दिसते.
ते आपल्या जाहिरनाम्यात म्हणतात, ‘आपला पक्ष स्वातंत्र्य, समता व आपुलकीचा संपुर्ण स्विकार करेल, माणसामाणसामधील, वर्गावर्गामधील व राष्ट्राराष्ट्रातील असलेले हेवेदावे व होणारा अमानुष छळ याचा बिमोड करण्याचा आटोकाट प्रयत्न करील. शेती, शिक्षण, बॅंका आणि इन्शुरन्स हे व्यक्तीच्या जिव्हाळयाचे विषय असल्याने या सर्वांचे राष्ट्रीयकरण झाले पाहिजे असे त्यांना वाटत होते. कदाचीत या सर्व गोष्टीकडे भारत सरकारने लक्ष दिले असते तर आज भारतातील शेती, शिक्षण, बॅंका आणि विमा या सर्व गोष्टीचे चित्र वेगळे असते. यातील केवळ एका गोष्टीचे उदाहरण आपण घेतले तरी आपल्या ते लक्षात येण्यासारखे आहे. अमेरिकेत काही वर्षापुर्वी आलेली मंदिची लाट अमेरिकेला भेडसावत होती तेथील एकोणीस बॅंका बंद पडल्या त्याचे विपरीत परिणाम संपुर्ण जगावर होत होते. परंतु याची झळ भारताला मात्र लागली नाही त्याचे महत्वाचे कारण म्हणजे भारतातील बॅंकाचे राष्ट्रीयकरण हेच होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांची जाणीव कदाचित इंदिरा गांधी यांना झाली असावी आणि म्हणून त्यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात देशातील चैदा बॅंकाचे राष्ट्रीयकरण केले आणि म्हणूनच देशाला मंदिची झळ बसली नाही.
इन्शुरन्सचे राष्ट्रीयकरण करुन व्यक्तीला आणि राश्ट्राला सुरक्षा कवच देण्याचा विचारही डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला होता. 1949 साली अस्तित्वात असलेल्या 339 विमा कंपन्या व त्यांच्याकडे असलेल्या इन्शुरन्स पाॅलीसी, त्यांची रक्कम, प्रिमियम वरील वार्षिक रक्कम, गंुतवलेली रक्कम आणि अशा कंपन्यांचा वार्षिक खर्च या सर्वांचा अभ्यास डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि त्यातून सरकरला होणारे उत्पन्न आणि इन्शुरन्सधारकाला होणारा फायदा लक्षात घेवून त्याचे राष्ट्रीयकरण होणे किती गरजेचे आहे याचा विचार त्यांनी मांडला होता. इन्शुरन्स कंपनी विम्याच्या रकमेतील बरीचशी रक्कम स्वतःच्या पदरात टाकत असते ती टाळण्यासाठी व सरकारचे वार्षीक उत्पन्न वाढविण्यासाठी इन्शुरन्सचे राष्ट्रीयकरण अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांचे मत होते. आज 70 वर्षानंतर हजारो विमा कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. परंतु त्या लोकांना फसवताना दिसून येतात. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी याचा विचार 1949 सालीच केला होता. राष्ट्रीयकरणामुळे लोकांमध्ये सुरक्षेविषयी एक विश्वास निर्माण होतो आणि त्याचा फायदा सरकारच्या तिजोरीला आणि सामान्य जनतेला होतो. याचा विचार त्यांनी निवडणूक जाहीरनाम्यामधून पुढे आणला होता.
भारत सरकारला मिळणारे कर स्वरुपातील वार्षिक उत्पन्न आणि त्याचा वापर कुठे व कसा करायचा याचा आढावाही त्यांनी जाहीरनाम्याच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवला होता. ते म्हणतात, भारत सरकरचे कराचे वार्षिक उत्पन्न 450 कोटी असून 50 टक्यापेक्षा जास्त रक्कम देशाच्या संरक्षणार्थ उभ्या असलेल्या लष्करावर केली जाते. एकीकडे देशांतर्गत लोक भूकेने मरत आहेत तर दुसरीकडे कारोडो रुपये संरक्षणार्थ घालवले जात आहेत. हा मुद्दा उपस्थित करुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर एकाच वेळेस देषाची अंतर्गत सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सबंध या विषयावर भाष्य करतात.
ते म्हणतात की, आपल्याला आज आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च करावे लागत आहेत याचे एकमेव कारण म्हणजे आपले शेजारी राष्ट्रासोबत व युनोतील सदस्य राष्ट्रासोबत असलेले सबंध आहे. स्वातंत्र्यापुर्वी आपल्याला अनेक मित्र राश्ट्रे होती परंतु स्वातंत्र्यानंतर हे सर्व मित्र आपल्यापासून दूर गेले आहेत. याचे कारण म्हणजे आपले परराष्ट्र धोरण हे पळकुटे व धरसोड वृत्तीचे आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर याविशयी स्पश्टपणे म्हणतात की, भारताचे काष्मीरबद्दल धोरण, युनोमध्ये कम्युनिस्ट चायनाच्या प्रवेशाबद्दल केलेली घाई आणि कोरियन युद्धाबद्दल अनास्था याबद्दलच्या गेल्या तीन वर्षातील पोरकट धोरणामुळे इतर राश्ट्रांनी भारताकडे पाठ फिरवली आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आतरराष्ट्रीय सबंधाच्या बाबतीत ठाम भूमिका घेतना दिसतात. भारताने आपली आतरराष्ट्रीय राजकारणातील भूमिका मजबूत करावी असे मत व्यक्त करताना ते म्हणतात, भारताचे पहिले कर्तव्य म्हणजे स्वतःचा उत्कर्ष होय, कम्युनिस्ट चायनाला युनोमध्ये प्रवेश मिळण्याची भारताने धडपड करण्यापूर्वी स्वतःचे स्थान युनोचा कायम सभासद म्हणून निश्चित करण्याच्या प्रयत्नास लागणे आगत्याचे आहे. माओचा पक्ष घेवून चांग कै शेकला डावलण्याचा नाद भारताने सोडावा असा इशारा ते देतात. यावरुन एक गोष्ट लक्षात येते की, डाॅ. बाबाासहेब आंबेडकरांनी कोणत्याच धार्मिक मुद्यावरुन अथवा मंदिर प्रश्न, मशीद प्रश्न किंवा इतर कोणतेच धार्मिक मुद्दे घेवून लोकांना भावनिक करुन निवडणूक लढवली नाही तर ते थेट व्यक्तीची, समाजाची आणि राष्ट्राची सुरक्षा आणि विकास या मुद्याला घेवूनच निवडणूक मैदानात उतरल्याचे दिसते.
देश चालवायचा असेल तर देशांतर्गत होणारे उत्पन्न आणि त्यांचे नियोजन या दोन बाबी महत्वाच्या असतात असे डाॅ. बाबासाहेब आंबेडरकांना वाटायचे म्हणूनच त्यांनी इन्शुरन्स चे राष्ट्रीयकरण करुन होणारे उत्पन्न सरकारच्या तिजोरीत आणण्याचा प्रयत्न केला मात्र आज अनेक इन्शुरन्य कंपन्या मोकाट सुटल्या असून त्यांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे एकीकडे दारुच्या मध्यमातून सरकार कर जमा करते तर दुसरीकडे त्यापेक्षा जास्त रक्कम दारुबंदीच्या नावावर खर्च करते हा ढोंगी कार्यक्रम बंद केला पाहिजे असे ठाम मत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्त करतात. भावनिक होवून मिठावरील कर सरकारने कमी केला त्यामुळे सरकारचे मोठे नुकसान होत असून त्याचे भाव कमी होण्यापेक्षा ते जास्त झाले आहेत याचा फटका जनतेला तर बसतोच आहे परंतु त्याचे परिणाम सरकारच्या तिजोरीवरही होत आहेत म्हणून भावनिक न होता मिठावर परत कर बसवले पाहिजेत असे त्यांना वाटत होते.
राहिला मुद्दा शेतीच्या राष्ट्रीयकरणाचा, या विषयी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका महत्वाची होती. शेती ही भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असली तरी सर्वच लोक शेतीवर अवलंबून राहिले तर त्याचा विपरीत परिणाम होवून देशाची म्हणावी तशी आर्थीक प्रगती होणार नाही. वाढती लोकसंख्या लक्षात घेवून आपण अपले व्यवसाय बदलले पाहिजेत असा इशारा त्यानी दिला होता त्याची परिचिती आज आपल्याला येते. परंतु सध्या अस्तित्वात असलेल्या शेतीचे राष्ट्रीयकरण होणे गरजेचे आहे असे त्यांना वाटत होते. त्यांच्या मते, शेतीचे राष्ट्रीयकरण करुन सामुदायीक लागवड करावी आणि उत्पादनाचे लोकशाही पद्धतीने जातीभेद न करता वाटप करावे म्हणजेच गरिबांना न्याय देता येईल. ही भूमिका त्यांनी जनहितासाठी आणि राष्ट्रहीतासाठी घेतली होती.
शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करुन शिक्षणाचा बाजार बंद करण्याचे अव्हानही त्यांनी केले होते. सर्वांना समान व दर्जेदार शिक्षण मिळावे हीच भूमिका त्यांच्या पक्षाची होती. कोणत्याही देशाची प्रगती ही त्या त्या देशातील शिक्षणाच्या प्रमाणावर ठरलेली असते असे त्यांना वाटत होते. म्हणूनच त्यांनी ही भूमिका घेतली होती परंतु आजचे शिक्षणाचे बदललेले स्वरुप बघितले तर शिक्षणाचे मुल्य हरवून गेले असून शिक्षणाचा लिलाव चैका चैकात होताना दिसतो आहे. यावरुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज किती प्रासंगिक आहेत हे लक्षात येण्यासारखे आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा जाहीरनामा घेवून आज पुन्हा एकदा निवडणूकीच्या मैदानात उतरणे गरजेचे आहे. त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा तात्कालीन काळात बहुसंख्य असलेल्या अशिक्षीत समाजाच्या लक्षात आला नसला तरी आज त्यांचे बहुसंख्य अनुयायी उच्च शिक्षित झाले आहेत त्यांनी तरी हा विचार, हा जाहीरनामा समजून घेतला पाहिजे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा असल्याचा दावा करणारे जवळजवळ 100 पेक्षा जास्त पक्ष आज अस्तितवात आहेत. देशाच्या संसदेत आरक्षण घेवून 79 अनुसुचित जातीचे तर 41 अनुसुचित जमातीचे खासदार जावून बसले आहेत. अशा अनेकांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा जाहीरनामा समजून घेवून कामाला लागणे गरजेचे आहे. शेवटी देश आमचा आहे आम्हीच देशाला मजबूत करु शकतो. यासाठी फक्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा 70 वर्षापूर्वीचा निवडणूक जाहीरनामा डोळयासमोर ठेवून आणि जागरुक होवून काम करणे गरजेचे आहे.
आपल्याला माझे लेख आवडत असल्यास उर उजव्या बाजूला असलेल्या Follow या बटनावर click करायला विसरू नका.
टीप: लेखातील कोणताही मजकूर कोठेही कॉपी पेस्ट करू नये. शेअर करावासा वाटल्यास केवळ लिंक शेअर करावी.




No comments:
Post a Comment