कसं काय सरकार बरं हाय का? (विडंबन काव्य)
या कवितेतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही. असलाच तर तो योगायोग समजावा.
सध्या राजकारणात जे काही चालू आहे ते भयानक आहे. कोणाचं काय चाललंय हे कोणाला काहीच जरी कळायला मार्ग नसला तरी हे सारं भयानक आहे हे मात्र नक्की. आजच्या सरकारकडे बघितल्यावर ‘कसं काय पाटील बरं हाय का?’ हे गाणं मात्र आपल्याला नक्कीच आठवत असेल. ‘सवाल माझा ऐका’ या चित्रपटातलं हे गाणं ब्लॅक अॅन्ड व्हाईट च्या जमान्यातलं असलं तरी ते आजच्या ब्लॅक कारभारावरती भाष्य करणारं आहे. आजही हे गांणं अनेकांच्या तोंडात नेहमी असतं. परंतु ते आजच्या सरकारवर चित्रीत केल्याचा भास होतो. या गाण्याचे मूळ गीतकार जगदीश खेबुडकर यांची माफी मागून या गाण्याचं विडंबन केल्यास तुम्हाला लोकशाहीतल्या सराकरला ‘सवाल माझा ऐका’ असेच म्हणावे वाटेल. बेकारी, बेराजगोरी, शिक्षण, अर्थव्यवस्था, महागाई असे गंभीर प्रश्न असताना सरकार नेमकं काय करत आहे. यावर या विडंबनातून काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला आहे.
कसं काय सरकार बरं हाय का?
राज्यात जे चाललंय ते खरं हाय का?
काल म्हणं अधिकारी वसुलीला गेले
वसुलीचे पुरावे इसरुन आले,
इसरल्या ठायी गावलंय का काही,
कोर्टाला काही दावलंय का?
राज्यात जे चाललंय ते खरं हाय का?
काल म्हणं मंत्र्यावर आरोप झाले
कमरंचा ऐवज हरवून आले
केली वाटमारी सांज्यापारी,
राजीनाम्यावर एकमत व्हायलंय का?
राज्यात जे चाललंय ते खरं हाय का?
आज काल मंत्री /आमदार इथं तिथं जातात,
बघता बघता घोटाळे करुन येतात,
काय होईल पुढं सांगा तरी थोडं
खाली नका बघू आता लाजताय का?
राज्यात जे चाललंय ते खरं हाय का?
आहो राव तुम्ही
ते नाही तुम्ही
झोंडेवाले तुम्ही
फेटेवाले तुम्ही
आहो सारेच तुम्ही
खरं खरं सांगा हे बरं हाय का?
राज्यात जे चाललंय ते खरं हाय का?
टीप: यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही नेत्यावर टीका करण्याचा उददेश नाही. केवळ लोकशाहीत सरकारला ‘सवाल माझा ऐका’ असे म्हणण्याचा अधिकार असल्याने त्या अधिकाराचा पुरेपूर उपभोग घेण्याचा प्रयत्न केला आहे. भक्तांनी उगीच ताण घेवू नये. ही विनंती.
विनंती :
आपल्याला माझे लेख / ब्लॉग आवडत असल्यास वर उजव्या बाजूला असलेल्या Follow या बटनावर click करायला विसरू नका.
टीप: लेखातील कोणताही मजकूर कोठेही कॉपी पेस्ट करू नये. शेअर करावासा वाटल्यास केवळ लिंक शेअर करावी.
No comments:
Post a Comment