जागतिक चर्चाविश्वात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
डाॅ. दैवत सावंत
‘वैश्विक विचारनायक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर’ हा ह. नि. सोनकांबळे यांचा डाॅ. आंबेडकरांच्या परदेशातील घटना आणि घडामोडीवर प्रकाश टाकणारा एकमेव ग्रंथ, परदेशातील लोक डाॅ. आंबेडकरांना का स्विकारतात याचा शोध घेणारा आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय राजकारणात अनेक चढ उतार आले. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समतेचे उदिष्ट गाठत असताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची कास धरणे क्रमप्राप्त होतेय मात्र तसे झालेले दिसत नाही. त्यामूळेच भारताला महासत्ता होता आले नाही. देशाला महासत्ता होण्यासाठी डाॅ. आंबेडकरांच्या वैचारिक अधिष्ठानाची नितांत आवश्यकता आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठाच्या परिसरामध्ये शिक्षण घेवून जगाला समता प्रस्थापित करण्याचा अनमोल संदेश दिला. देशात असलेल्या जातीपातीच्या व्देषाने आपली, समाजाची आणि देशाची कशी अधोगती होते हे सर्वश्रुत आहे, याला छेद देण्याचे यथोचीत कार्य डाॅ. आंबेडकरांनी केले. त्यांनी देशाला मजबूत, कणखर आणि सर्वस्पर्शी अशी राज्यघटना दिली. त्यानुसार आज सर्व कार्य आणि वाटचाल सुरु आहे. राष्ट्र उध्दारासाठी सर्वांनीच सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. ही भूमिका त्यांनी मांडली. भारता व्यतिरिक्त इतर देशात डाॅ. आंबेडकरांच्या विचारंाचा गौरव होताना दिसतो. मात्र भारतील काही लोक त्यांचा व्देष का करतात, हेच खऱ्या अर्थाने कळत नाही. खरे तर या देशाचे सदभाग्य आहे की, बाबासाहेबांसारखा रत्न या देशात जन्माला आला त्यांनी सबंध समाजव्यवस्थेचे परिवर्तन व्हावे ही धारणा, विचार घेवून सामाजिक दरी संपूष्टात आणण्याचा प्रयत्न केला. याची चर्चा या ग्रंथाचे मुख्य आकर्षन आहे.
माणूस म्हणून जीवन जगत असताना समानतेने जगता यावे हेच खरे मूल्य आहे. परंतु हे मूल्य विस्कळीत झालेले असताना तिला सुधारण्याचे अनमोल कार्य बाबासाहेबांनी केले. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांचे कार्य, कर्तुत्व वाखणण्याजोगे आहे हेच आपण विसरुन गेलो आहोत. देशाची प्रगती करण्याकरीता त्यांच्या विचारांशिवाय पर्याय नाही. राष्ट्राच्या, मानवाच्या उध्दाराचे अनेक मार्ग त्यांनी प्रतिपादित केले म्हणूनच त्यांच्या विचारांना तोड नाही. भारताच्या प्रगतीत जातीभेद हा प्रचंड मोठा अडथळा आहे. जोपर्यंत जातीभेद नष्ट होणार नाही. तोपर्यंत भारताची प्रगती अशक्य आहे हे सांगत असताना ब्रिटीश पार्लमेंट मध्ये डाॅ. आंबेडकरांच्या विचारांवर झालेल्या चर्चा विस्तृतपणे या ग्रंथात आल्या आहेत.
‘भारताला एकसंघ राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न संविधानाच्या माध्यमातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता मात्र भारतातील लोकांची मानसिकता बदलण्यास तयार होत नाही’ या मानसिकतेत परिवर्तन होणे अभिप्रेत आहे जो पर्यंत जात, धर्म, पंथ, लिंग आणि सामाजिक उध्दवस्तीकरण थांबणार नाही तोपर्यंत देशाचा शाश्वत विकास अशक्य आहे. सर्वच प्रकारच्या विषमता नष्ट होवून समता प्रस्थापित होणे अत्यावश्यक आहे. आज मराठा समाजाचे मोर्चे सर्वांना सर्वश्रुत आहेत. या समाजाला आरक्षणाची गरज तत्कालीन कालखंडामध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तविली होती मात्र त्याकडे या व्यवस्थेने दुर्लक्ष केलेले दिसते. त्या करीता डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि लेखनसंपदा वाचने अगत्याचे आहे. त्याशिवाय हे सर्व उलगडणार नाही. बाबासाहेबांच्या विचारंाना विशिष्ट समाजामध्ये बंदिस्त करणे योग्य नाही. त्यांनी सर्वप्रथम ओबीसी वर्गाच्या कल्याणासाठी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला, तरीही ओबीसी वर्ग त्यांच्याकडे वेगळया नजरेने बघतो. ही या देशाची शोकांतीकाच म्हणावी लागेल. या देशातील व्यवस्थेने डाॅ. आंबेडकरांना केवळ दलितापुरतेच सिमित केले. परंतु त्यांना परदेशातील लोक का स्विकारतात याचा आढावा या ग्रंथाचा केंद्रबिंदू आहे. केवळ पुतळे उभारुन चालणार नाही तर त्यांचे विचार, कार्य, कर्तुत्व सर्वतोपरी रुजविणे अत्यावश्यक आहे.
‘तुम्ही माझा विरोध करु शकता, तुम्ही माझा तिरस्कार करु शकता पण तुम्ही मला नाकारु शकत नाही’ हे स्वतः बाबासाहेबांनी प्रतिपादित केले आहे. या त्यांच्या मताचा विचार करणे भारतीयासमोर मोठे आव्हान आहे. कारण आता डाॅ. आंबेडकरांचे विचार पाकिस्तानमध्येही रुजविले जात आहेत. जागतीक स्तरावर अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, हंगेरी, जपान, आॅस्ट्रेलिया आदि देशातील विद्यापीठात व संसदेत चर्चासत्रे, परिसंवादाच्या माध्यमातून, डाॅ. आंबेडकरांचे विचार का रुजविले जात आहेत. याची चर्चा विस्ताराने या ग्रंथात केली आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे परदेशात पुतळे बसविले जात आहेत ही गोष्ट आजपर्यंत केवळ ऐकीव होती परंतु त्याचे वास्तव उद्देशून या ग्रंथात वाचायला मिळते. शिवाय परदेंशातील विद्यापीठात उभारले जाणारे पुतळे आणि चर्चासत्रे व त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रामाची छायाचित्रे या ग्रंथाची वाचनीयता वाढविणारे आहे.
ग्रंथाचे नाव: वैश्विक विचारनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लेखक : डॉ. ह. नि. सोनकांबळे
प्रकाशक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद, औरंगाबाद
पृष्ठ : 142
मूल्य : 140 (ग्रंथ भेट देण्यासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध)
(लेखक. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागातुन पोस्ट डाॅक्टरल आहेत.)
Very nice
ReplyDelete