Saturday, March 6, 2021

ग्रॅज्युएट खिचडी आणि निर्लज्ज व्यवस्था

 


ग्रॅज्युएट खिचडी आणि निर्लज्ज व्यवस्था

एम. ए., बी. एड. आणि विद्यापीठ अनुदान आयोगाची सेट पास असलेल्या अहमदपूरच्या वसंत लामतूरे या तरुणाने आपल्या हाॅटेल ला ‘ग्रॅज्युएट खिचडी सेंटर’ असे नाव दिले आहे. या सेंटरच्या समोर उभं राहिल्यास प्रत्येकाला हा अनुभव येतोच की, खरोखरच आम्ही त्या भारतात उभे आहोत का? ज्या भारतात उच्च शिक्षणाची अशी खिचडी झाली आहे. 


हेही वाचा : विधान परिषद रद्द करा, त्याच पैशातून रोजगार द्या.

अनेक आजी, माजी आमदार, नेते, अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी या खिचडीचा रोज यथ्थेच्च लाभ घेतात. प्रश्न फक्त एवढाच आहे की, आजपर्यंत कोणत्याच आमदाराने वसंतला, तु इतका उच्च शिक्षीत आहेस, तु चांगले विद्यार्थी घडवून देशाला दिले पाहीजेत, तु अशा खिचडी शिजवण्याच्या भानगडीत का पडला आहेस? असा प्रश्न विचारला नाही. 


Click Here: MPSC, भारतीय राज्यघटना Online test

विशेष म्हणजे या सेंटरपासून 10 किलोमिटरच्या अंतरावर दोन माजी आमदार व एका विद्यामान आमदारांचे घर आहे.  हे सर्व आमदार ग्रॅज्युएट खिचडी सेंटरच्या अवघ्या 50 फुट अंतरावर असलेल्या शेळके मामाच्या हाॅटेलवर कार्यकर्त्यांना घेवून तासनतास गप्पा मारत असतात. महत्वाचे म्हणजे तिथून 100 फुट अंतरावर असलल्या शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळयाचे उदघाटन करायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस देखिल येवून गेलेले आहेत. 



शिवाय या पुतळयाला अभिवादन करण्यासाठी लातूर जिल्हयातील जवळपास सर्वच आमदार व मंत्री आतापर्यंत येवून गेलेले आहेत. यांतल्या अनेकांनी ग्रॅज्युएट खिचडीच्या मालकाचे तोंडभरुन कौतुकही केले आहे. पण यातल्या कोणालाच असा प्रश्न पडला नाही की, ज्या राज्यातील जनतेचे आपण नेतृत्व करत आहोत त्या राज्यातील उच्च शिक्षीत तरुणांवर अशी वेळ का येत आहे? 



वसंत ने व्यवसाय सुरु केला आहे, यात वाईट वाटण्यासारखे काही नाही व याचे आम्हालाही वाईट वाटत नाही. पण उच्च शिक्षण घेतलेल्या वसंतला आपल्या आई वडिलांनी घामाने शिकवलेल्या सर्व डिग्य्रा या खिचडीच्या पातेल्यात टाकाव्या लागल्या आणि खालून जाळ लावावा लागला. आपला पोरगा शिकावा आणि त्यांने पुढच्या पिढयाही शिकवाव्या हे स्वप्न वसंतच्या आई वडिलांनी बघितले नसेल का? जर बघितले असेल तर त्यांच्या स्वप्नांना कोणी आग लावली? याच्यावरही विचार करावा लागणार आहे. 



शिक्षणाचा लातूर पॅटर्न निर्माण करणाऱ्या या जिल्हयात अनेक संस्थाचालक आहेत. बहुतांश हे सर्व राज्याच्या विधिमंडळात आहेत. विशेष म्हणजे सध्या वसंत ज्या विधानसभा मतदारसंघात आहे त्याचे प्रतिनिधीत्व देखिल एक संस्थाचालकच करत आहेत. या सर्वांना वसंतच्या डिग्य्रा माहित आहेत. कारण वसंत ने त्या आपल्या सेंटरच्या पाटीवरच लिहून ठेवल्या आहेत. आजपर्यंत अनेकांनी या सेंटरला भेट दिली. त्या सेंटरसमोरुन भरधाव गाडया निघूनही गेल्या. त्यांनी वसंतची पाटी वाचली नाही असं होवूच शकत नाही. पण यातल्या कोणालाही वसंतच्या उच्च शिक्षणाची अशी खिचडी का झाली? हा प्रश्न पडला नाही आणि तो पडणारही नाही. 

गेली 10 वर्षापासून महाराष्ट्र सरकार नोकर भरतीच्या बाबतीत उदासिन आहे. याउलट बिहार आणि उत्तरप्रदेश या राज्यांच्या नोकरभरतीत थोडीफार गती आहे. पण महाराष्ट्र सरकारला अजूनही काही सूचत नाही.  विधिमंडळाचे अधिवेशन अंतीम टप्यावर आहे. पण पूजा चव्हाण, संजय राठोड या प्रश्नाशिवाय दुसरा कोणताच प्रश्न सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांनाही महत्वाचा वाटत नाही व त्यावर चर्चाही होत नाही. 

ज्या दिवशी वसंत ने ‘ग्रज्युएट खिचडी’ हे सेंटर सुरु केले त्याच दिवशी विधानसभेत यावर चर्चा होणे अपेक्षित होते की, महाराष्ट्रातल्या तरुणांवर अशी वेळ का येत आहे? पण ती झाली नाही? आणि ती होणारही नाही? कारण येणारं प्रत्येक सरकार आणि त्यांची व्यवस्था अशा अनेक वंसत सोबत ‘पब्जी’ खेळत आहे? कोणत्या दिवशी यांना बंदुकीसमोर आणेल हे सांगता येत नाही आणि ते ग्रॅज्युएट तरुणांना तोपर्यंत समजणार नाही जोपर्यंत त्यांच्या कानाला बंदुक लागणार नाही. 

यातले अनेक तरुण आपाल्या नेत्यांच्या ताफयामागे फिरत आहेत. आपल्या विदवत्तेचा उपयोग करुन आपल्या नेत्यांचा सोशल मिडीयार प्रचार करत आहेत. असो त्यासाठी का होईना आपल्या शिक्षणाचा उपयोग होतो आहे हे महत्वाचं आहे. पण आपेक्षा एवढीच आहे की, एकेदिवशी आपल्या सर्व डिग्य्रा एखाद्या पातेल्यात टाकून, त्यात आपल्या आई वडिलांच्या मेहनतीचे पाणी टाकून, संयमाच्या गॅस चा भडका देवून खिचडी शिजवली जावू नये. 

सध्या वसंतचं चांगलं चाललं आहे. त्याला कोणाच्या सहानुभूतीची गरज नाही. तो यासाठी आनंदी आहे की, तो सरकारी नोकरीच्या जाहीरातीची वाट बघत बसत नाही. पण दुःख एवढंच आहे की, आपण मिळवलेल्या डिग्य्रांचं काय करायचं? याचं उत्तर वसंतलाही सापडत नाही. 



तुर्तास आपण कधी गेलात तर या ‘ग्रॅज्युएट खिचडी सेंटर’ ला नक्की भेट द्या. खिचडीचा आनंद घ्या आणि स्वतःला काही प्रश्न पडले तर थोडासा विचार करा. प्रश्न पडतीलच यात शंकाच नाही आणि नाही पडले तर समजून घ्या आपल्या ग्रॅज्युएशनचीही कुठेतरी ही निर्लज्य व्यवस्था ‘ग्रॅज्युएट खिचडी’ शिजवत आहे.


डॉ. ह. नि. सोनकांबळे


ब्लॉग पेजला follow करायला विसरू नका. 

टीप: लेखातील कोणताही मजकूर कोठेही कॉपी पेस्ट करू नये. शेअर करावासा वाटल्यास केवळ लिंक शेअर करावी. 

7 comments:

  1. विचार करायला लावणारी गोष्ट आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
      येणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
      धन्यवाद

      Delete
  2. खूप graduate आहेत या महाराष्ट्रात. प्रत्येकाला job मिळेलच असे नाही. उलट job पेक्षा जास्त पैसे आहेत business मध्ये. त्या संस्था चालकाचे लाड पुरवण्यापेक्षा सेल्फ business केलेला बरा.

    ReplyDelete
    Replies
    1. ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
      येणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
      धन्यवाद

      Delete
  3. व्यवसाय करणे आणि जोखीम स्वीकारणे कधीही योग्य..पण प्राध्यापक सारख्या व्यक्तींनी असा व्यवसाय करणे शोभानिय नाही..परंतु ही अशी वेळ येत आहे त्याला.जबाबदार पूर्णपणे सरकार आहे...आणि ज्या काही भरतीच्या संघटना आहेत त्या आक्रमक नाहीत..कोणीही कोणाच्या भल्यासाठी लढत नाही .फक्त आपले स्वार्थ सर्वजण पाहतात..हीच मोठी खंत आहे..नाहीतर सर्व संघटना राज्यातून पेटून उठल्या तर न्याय एक दिवस मिळणारच

    ReplyDelete
    Replies
    1. ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
      येणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
      धन्यवाद

      Delete
  4. सर, प्राध्यापक, शिक्षक भरतीला अनुसरून खूप छान लेख आहे.. तिकडे बिहार सरकार दुसरा टप्पा 96 हजार शिक्षक भरती काढली आहे.. आणि महाराष्ट्र सरकारला सरकारला शिक्षक भरती साठी मुहूर्त सापडत नाही.. तीन तिगडा आणि काम बिगडा सरकार आहे ..

    ReplyDelete