२० मार्च : सामाजिक स्वातंत्र्य दिन
डॉ. ह. नि. सोनकांबळे
19 व 20 मार्च 1927 रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळयाचा सत्यागृह ‘करुन समता, स्वातंत्रय बंधुता’ या लोकशाहीप्रणित तत्वांची घोषणा केली. तेव्हापासून आपण महाड चवदार तळयाच्या सत्याग्रहाचा वर्धापण दिन साजरा करत आलो आहोत. परंतु डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या ऐतिहसिक प्रसंगाचे महत्व सागंत असताना या दिवसाला ते ‘अस्पृश्य जनतेचा स्वातंत्र्य दिन’ म्हणून सांगत असत. 19 मार्च 1940 मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली असाच एक स्वातंत्र्य दिन महाड येथे आयोजीत करण्यात आला होता.
हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना अस्पृश्यांनी या दिनी नेमके काय करावे याची रुपरेषा संयोजकांनी ठारविली होती. त्यात खालील प्रमाणे कार्यक्रम आयोजीत करण्याचे आवहान केले होते.
1. सकाळी घरोघरी स्वातंत्र्य मजूर पक्षाचा झेंडा उभारावा.
2. मिरवणूक काढावी व महारवाडयात मंडप शृंगारून झेंडावंदन करावा.
3. झेडावंदनानंतर सर्व स्त्री-पुुरुषांनी व मुलाबळांनी स्वातंत्र्याची प्रतिज्ञा करावी.
4. सभा, भाषणे वगैरे कार्यक्रम करावा.
शिवाय या निमित्ताने संयोजकांनी एक ‘स्वातंत्र्य दिनाची प्रतिज्ञा’ देखिल तयार केली होती. ती प्रतिज्ञा या ठिकाणी जशीच्या तशी देत आहे.
स्वातंत्र्य दिनाची प्रतिज्ञा
‘आम्ही माणूसकीचे हक्क मिळविणार अशी आमची प्रतिज्ञा आहे. स्पृश्य समाजाने आम्हास बहिष्कृत करुन वाळीत टाकले असून तो समाज आम्हास अन्नपाणी व इतर जीवनात आवश्यक असणारी सुखसाधनेही मिळवू देत नाही. त्याने आम्हास महारवाडयात डांबून टाकिले आहे. आम्हास उद्योगधंदा करणे व आमच्या लायकीप्रमाणे चाकरी मिळणे या गोष्टीही स्पृश्यांनी दुरापास्त केल्या आहेत. आमच्या या दुःस्थितीची सर्व जबाबदारी स्पृश्य वर्गावरच आहे. आमचे मानवी हक्क हिरावून घेणाऱ्या या लोकांच्या हाती सर्व राजसत्ता देणे म्हणजे माकडाचे हातात कोलीत दिल्याप्रमाणेच होणार आहे.
काॅंग्रेस सरकारने महार वतनदार कामगारांना विनावेतन राबवून पन्नास हजार अस्पृश्य कामगारांवर लादण्यात आलेली सनातनी बिगारी नाहीशी करण्यासाठी काहीही केलेले नाही. यावरुन काॅंग्रेस सराकरचे ‘हरिजन प्रेम’ उत्तम व्यक्त होत नाही काय? आपल्या समाजाची, काॅंग्रेस सरकारच्या राज्यात देखील पूर्वापार पद्धतीप्रमाणे शारीरिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतीक व अध्यात्मिक पिळवणूक चालू होतीच. म्हणून आमचे असे ठाम मत आहे की, आमच्या शत्रूच्या हाती राजसत्ता सर्वस्वी देणे हे आमच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचे आहे.
आपणास माणुसकीचे अधिकार मिळण्याचा मार्ग म्हटला म्हणजे देशाच्या राज्यकारभारात आपला वाटा मिळवणे हाच होय. म्हणून अस्पृश्यांना राजकीय सत्तेचा वाटा मिळवून देवून मानवी हक्क मिळवून देण्याची पुनरपी आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत.
जातीभेद मोडून जाती, धर्म व वर्ण हे ऐहिक व्यवहाराच्या आड येणार नाहीत अशी घटना करणे हे आमचे ध्येय आहे असे आम्ही समजतो.
डाॅ. आंबेडकरांनी आपल्या समाजास राजकीय सत्ता मिळवून देण्यासाठी जो लढा चालू केला आहे तो आम्हास पूर्णपणे मान्य असून डाॅ. बाबासाहेबांच्या आज्ञेनुसार आम्ही या लढयात भाग घेण्यास सदैव सज्ज राहू अशी आमची प्रतिज्ञा आहे.’
ही प्रतिज्ञा गोवोगावी वाचण्याचे आवाहन संयोजकांनी केले होते. महाड येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आलेला हा स्वातंत्र्य दिन याच प्रतिज्ञेने सुरुवात करण्यात आला होता.
हे ही बघा : बोधिधर्मन आणि कोरोना : हा चित्रपट एकदा नक्की बघा
गेली अनेक वर्षापासून आपण महाड चवदार तळयाच्या सत्याग्रहाचे वर्धापण दिन साजरे करत आलो आहोत. पुढील अनेक वर्ष साजरेही करणार आहोत. पण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने हा खरा अस्पृश्यांचा स्वातंत्र्य दिन होता. आपणही हा दिवस केवळ वर्धापण दिन म्हणून साजरा न करता. याचे ऐतिहासिक महत्व ओळखून अशा दिनाचे खऱ्या अर्थाने उत्सव साजरे करणे आवश्यक आहे.
खरे तर महापुरुषांचे विचार समाजात रुजवायचे असतील तर त्यांच्या जयंत्याबरोबरच त्यांच्या कर्तुत्वाचे देखील उत्सव साजरे करणे आवश्यक असते. कारण त्यातूनच खरी प्रेरणा येणाऱ्या पिढयांना मिळत असते. म्हणूनच ‘महाड महोत्सव किंवा अस्पृश्यांचा स्वातंत्र्य दिन’ अशा अशयाने हा दिन देखील साजरा होणे आवश्यक आहे.
हे ही वाचा : आता हंगेरीत ‘जय भीम’
विनंती :
आपल्याला माझे लेख आवडत असल्यास वर उजव्या बाजूला असलेल्या Follow या बटनावर click करायला विसरू नका.
टीप: लेखातील कोणताही मजकूर कोठेही कॉपी पेस्ट करू नये. शेअर करावासा वाटल्यास केवळ लिंक शेअर करावी.
No comments:
Post a Comment