Tuesday, April 13, 2021

यशवंतराव चव्हाण : लक्ष्मण माने यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांना लिहलेल्या पत्रातून

 


यशवंतराव चव्हाण : लक्ष्मण माने यांनी  खा. सुप्रियाताई सुळे यांना लिहलेल्या पत्रातून 

डॉ. ह. नि. सोनकांबळे



महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकारणी म्हणून तर परिचित होतेच शिवाय ते एक साहित्यिक म्हणूनही परिचीत होते. असे म्हणतात की, त्यांची एक इच्छा राहून गेली आहे. ते जेव्हा दिल्लीच्या राजकारणात रमले तेव्हा त्यांच्याकडे बराचसा वेळ होता. त्या वेळेचा सदुपयोग करुन ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र लिहण्याच्या तयारीत होते. बऱ्याच साधनांची त्यांनी जमवाजमव देखील केली होती. पण ते काम त्यांना पूर्णत्वास नेता आले नाही. या सबंधीची चर्चा जेष्ट साहित्यिक ‘उपराकार’ लक्ष्मण माने यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांना लिहलेल्या पत्रात आली आहे. लक्ष्मण माने यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेचा वृत्तांत या पत्रातून खा. सुप्रियाताई सुळे यांना कळवला आहे. 

लक्ष्मण माने यांच्याशी झालेल्या चर्चेत यशवंतराव चव्हाण म्हणतात, ‘लक्ष्मण, माझ्या मनात आहे. बाबासाहेबांचे चरित्र लिहावे. त्या निमित्ताने त्यांचे सारे ग्रंथही वाचून होतील. सलगपणे. साधनांची जमवाजमव करतो आहे.’ 

दुसऱ्या एका चर्चेत ते म्हणतात, ‘आपण सारे स्वातंत्र्य सैनिक देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अविरत प्रयत्न केले. ते मिळवले. पण अखंड स्वातंत्र्य मिळाले नाही. देशाचे दोन तुकडे झाले. त्यावेळी बाबासाहेबांचे कितीतरी मित्र अनुयायी त्यांना म्हणत होते. जिनांनी लढून पाकिस्तान घेतले, तुम्ही दलितस्थान का घेत नाही? या मित्रांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाला ते बळी पडले असते तर देशचे दोन ऐवजी तीन तुकडे झाले असते. पण बाबासाहेबांनी आयुष्यात कधी असला विचार केला नाही. हे देशावर केवढे उपकार आहेत त्यांचे. तेही मोठे राष्ट्रभक्त होते. आपण त्यांना समजून घेतले नाही.. असामान्या बुद्धिमत्तेच्या पुरुषाची ओळख शाहूराजांनी, सयाजीरावांनी ठेवली, त्यांना पोटाशी धरले आणि त्यांनी देशाला घटना दिली. जाती, धर्म, पंथ भेदाभेद यापलिकडे विव्दान माणूस उभा असतो. मी हल्ली त्यांच्या जीवनचरित्रांचा अभ्यास नव्याने करतोय. त्यांचे चरित्र लिहून त्यांच्या कामाला, कार्यकर्तुत्वाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.’ 

या कामाला गती मिळावी यासाठी यशवंतराव वेळ काढून जाणीवपूर्वक प्रयत्न करत होते. अनेक लोकांसोबत चर्चा करत होते. प्रा. अरुण कांबळे यांच्याशीही त्यांनी या विषयावर चर्चा केली होती. या अनुषंगाने अशाच एका पत्रात लक्ष्मण माने यांनी उल्लेख केला आहे. 

‘प्रा. अरुण कांबळे आणि मी (लक्ष्मण माने). एकदा साहेबांना (यशवंतराव चव्हाण) भेटायला गेलो होतो. नामांतराच्या प्रश्नावरुन चर्चा निघाली होती. साहेब म्हणाले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एखादे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ मुंबईत उभा करु. बाबासाहेब मुंबईला राहिले. चैत्यभूमी येथे आहे. आयुष्यातला मोठा काळ त्यांनी या शहरात काढला. नावलौकिक मिळवला. देशाचे नेतृत्व केले. त्यांच्या इतमामाला शेभेल असे संस्थांत्मक काम करायचे राहून गेले. तुम्हा तरुण मित्रांनी आता हे काम हाती घेतले पाहिजेल आहे असे मला वाटते. अशी मोठी संस्था उभी करावी. ज्ञानार्जनाचे, ज्ञानदानाचे काम ज्या शहरात बाबासाहेबांनी केले. तेथे त्यांचे स्मारक ज्ञानमेरिटनेच होवू शकते. त्यांचे देशावर फार महान उपकार आहेत. अरुण, मला बाबा वलणकरांची सारी लिखित साधने हवी आहेत. सुरवा नाना टिपणीसांशी मी बोललो आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र मला लिहायचे आहे. साधनांची जुळवाजुळव मी करतो आहे. त्याचे असे झाले, की. डाॅ. सविता जाजोदिया आणि डाॅ. सय्यद असद अली हे दोघे नॅशनल बुक ट्रस्टच्या राष्टीय चरित्रमालेसाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक संक्षिप्त चरित्र लिहण्याची गळ घालीत होते. माझ्या मनात अनेकदा हा विचार येवून गेला होता. पण तो आज उद्या करीत हे काम रेंगाळले आहे. ते मला करायचे आहे. मी त्यांना तसा शब्द दिला आहे. अरुण, तुम्ही म्हणाल राजकारणातल्या माणसाचा शब्द, तो दिला काय नि नाही दिला काय. लोक समजून घेतात. पण हे दोघे माझ्या मागेच लागले आहेत. मी शब्दांचा फार पक्का आहे. आपल्या शब्दाची प्रतिष्ठा आपण राखली नाही तर कोण राखील? शब्द काही नुसते सुटे शब्द नसतात. त्या पाठीमागे भावना असते. शब्दांना अर्थ असतात. ते वाऱ्यावर उडून गेले तर बोलण्यात कोणता अर्थ राहील. शब्द नुसते शब्द नसतात. ते दुधारी शस्त्रासारखे आहेत. त्यामुळे शस्त्रापेक्षा मला शब्द श्रेष्ठ वाटतात. ते एकमेकाला जोडतात आणि तोडतातहीः म्हणून ते फार जपून वापरले पाहिजेत. शब्दांनी जखमा होतात. त्या विसरता येत नाही. ते शस्त्र आहे, जपूनच वापरले पाहिजे. मी डाॅ. जाजोदियांना शब्द दिलाय. तुम्ही मला मदत करायची. बाबासाहेबांच्या चरित्राचा फार गंभीरपणे अभ्यास करतो आहे. त्यांचे सारे अंक मी मिळवतो आहे. काही जुनी चरित्रे हवी आहेत. त्यांत वलणकरांचे चरित्र हवे आहे. ते तुम्ही मला मिळवून द्या.’ 

या सर्व पत्राच्या संदर्भातून ही बाब स्पष्ट होताना दिसते की, खरोखरच यशवंतराव चव्हाण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र लिहू पाहत होते. लक्ष्मण माने, प्रा. अरुण कांबळे यांच्या सहकार्याने ते संदर्भाची जुळवाजुळव करत होते. शिवाय नॅशनल बुक ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्याना त्यांनी शब्दही दिला होता. यशवंतराव चव्हाण यांच्या या बाबीवर जास्त चर्चा ऐकीवात नाही. मात्र लक्ष्मण माने यांनी ही बाब भावी पीढीच्या लक्षात आणूण देण्याचा प्रयत्न केला आहे. केळुस्कर गुरुजींनी जसे बुद्ध चरित्र लिहले कदाचित त्याच पद्धतीने यशवंतराव चव्हाण देखील बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र लिहू पाहत होते. परंतु अचानक झालेल्या त्यांच्या निधनाने त्यांचे हे कार्य राहून गेले. असेही लक्ष्मण माने यांनी लिहलेल्या पत्रातून जाणवते.


यशवंतराव चव्हाण आठवणी-आख्यायिका या पुस्तकातून साभार


कृपया ब्लॉग पेज ला FOLLOW करायला विसरू नका. 

ब्लॉग ची केवळ लिंक शेअर करावी ही विनंती. 

3 comments: