Wednesday, June 10, 2020

ये दाग अच्छे नहीं है। : मा. शरद पवार साहेबांना अनावृत्त पत्र - डॉ. ह. नि. सोनकांबळे





प्रति, 
मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब, 
अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, 
महाराष्ट्र. 


सस्नेह जय भीम,

आपला पक्ष 21 वर्षाचा झाला त्याबद्दल सुरुवातीलाच आपल्याला भरभरून शुभेच्छा देतो. या पक्षाचा आणि पक्षाच्या नेत्यांचा इतिहास येणाऱ्या काळात लिहला जाईल. मागच्या 21 वर्षात पक्षाने काय गमावले आणि काय कमावले याचे चिंतन झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थातच जे चांगलं काम आहे त्याचं कौतुक या इतिहासात नक्कीच असेल. पण जे वाईट केलं त्याची चर्चाही या इतिहासाचा दुसरा भाग असेल. कार्यकर्त्याने लोककल्याणाची कामे करावीत आणि आपल्या नेत्याला अमर करावे ही आपेक्षा सर्वच नेत्यांची असते. पण कार्यकर्त्याने गुन्हे करावेत आणि त्यातून साहेबांनी आम्हाला सोडवावे हि अपेक्षा कार्यकर्त्यांची असते. त्याशिवाय त्यांना डेरिंगबाज नेता बनता येत नाही. आणि सर्रास आजकाल सत्तेचा उपयोग आपल्या कार्यकर्त्यांना गुन्ह्यातून मुक्त  करण्यासाठी केला जातो. यातून न्यायल्याबाहेर एक "न्यायव्यवस्था" निर्माण होत चालली आहे. पोलीस स्टेशन वर दबाव, अन्यायग्रस्ताचे दमन, गरिबांची लूट, पक्षाच्या नावावर खंडणी आणि प्रचंड भ्रष्टाचार यासाठी संवैधानिक शक्तीचा वापर सर्रास चालू आहे. कोणतेही सरकार आले की, त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते मोकाट सुटतातच कारण त्यांचा कोणीतरी भाऊ, दादा, साहेब, बॉस हा या सत्तेचा भाग असतो आणि तो पोलीस पाटलापासून ते एसपी पर्यंत सर्वाना सांभाळून घेतो. एखादा अधिकारी इमानदारीने काम करत असेल आणि तो भाऊ, दादा, साहेब आणि बॉस ला जुमानत नसेल तर हे भाऊ सरळ त्या अधिकाऱ्याला "मोठ्या साहेबांना सांगू का? तुझी बदली करतो दोन दिवसात" अशा धमक्या देतात. असे कितीतरी प्रकरण साहेबांचे नाव सांगून खाली चालू असतात याची खबरही "वरच्या साहेबांना" नसते. पण इतिहास मात्र याच्या नोंदी विसरत नाही. तो कुठे ना कुठे याची नोंद ठेवत असतो. म्हणूनच येणाऱ्या काळात कोणीही नेहरू, आंबेडकर होणार नाहीत कारण त्यांची एक "ब्लॅक हिस्ट्री" लिहली जात आहे. या इतिहासाचे लेखन आपल्याला थांबता येईल का? कि दिवसेंदिवस याला कार्यकर्त्यांकडून काही पाने जोडली जातील.

      कोणाचीही नोंद इतिहासात "ब्लॅक हिस्ट्री" म्हणून होऊ नये. कारण आयुष्यात सर्व काही चांगलं केलेलं असताना नकळत अशा  गोष्टी  घडतात आणि त्यातून आपण पुरते बदनाम होतो. एका बाजूला चांगल्या कार्याचा इतिहास लिहला जात असताना दुसऱ्या बाजूला कोणीतरी काळा इतिहास देखील लिहायला बसलेलं असतं. त्यांना असे काही संदर्भ मिळत जतात कि ते प्रत्येक गोष्टीला "काळा" रंग देत जातात आणि हा इतिहास एवढा लोकप्रिय होतो की, लोक त्याला आवडीने वाचतात देखील. या ब्लॅक हिस्ट्री पुढे चांगला इतिहास कधीच प्रकाशझोतात येत नाही. आपल्याकडे महाराष्ट्रातला जनसमूह सध्या या दोन्ही बाजूनी पाहतो आहे.

महाराष्ट्राल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीला. राज्यात होणाऱ्या प्रत्येक सत्ता बदलला, इतकेच नव्हे तर, शिक्षण, समाज, अर्थ, राजकारण या किंवा अशा कोणत्याही क्षेत्रात घडणाऱ्या (चांगल्या आणि वाईट) घटनेच्या पाठीमागे नेहमीच एका व्यक्तीचा हात असतो. ती व्यक्ती म्हणजे "शरद पवार." हे सूत्र लोकांनी पाठच करून ठेवलं आहे. आपला चेहरा लोकांच्या नजरेत जितका पुरोगामी आहे तितकाच प्रतिगामी देखील बनत चालला आहे.  हा चेहरा प्रतिगामी आणि विशेषतः दलित विरोधी आहे. नामांतराच्या लढ्यापासून ते खैरलांजी प्रकरणापर्यंत, या दोन्ही चेहऱ्यांना दोन्ही गटांनी जिवंत ठेवलं आहे. अर्थातच त्यासाठी आपला पक्ष, काही नेते व काही कार्यकर्ते देखील जबादार आहेत हे विसरून चालणार नाही. (काही चांगल्या नेत्यामुळे व कार्यकर्त्यामुळे आपला पुरोगामी चेहरा टिकून आहे.) जेव्हा मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला तेव्हा आपल्यावर गाणी लिहली गेली, आपले सत्कार झाले नव्हे समाजातला एक मोठा गट आपल्याशी जोडला गेला. पण जेव्हा जेव्हा प्रतिगामी लोकांचे समर्थन आपल्या पक्षाकडून, कार्यकर्त्यांकडून केले गेले  तेव्हा तेव्हा आंबेडकरी समाज आपल्यापासून दुरही गेला. अनेक प्रकरणात आपल्यातील काही नेत्याचं आणि कार्यकर्त्यांचं प्रतिगामी लोंकाना पाठबळ देखील मिळत गेलं. जेव्हा खैरलांजी सारख्या गावाला आपल्या पक्षाच्या सत्ता काळात "तंटामुक्त गाव" पुरस्कार दिला गेला तेव्हा आणि अशा अनेक घटनांत आपल्यावर प्रतिगामीत्वाचे स्टॅम्पच मारले गेले आणि पुरोगामीत्वाच्या चेहऱ्यावर प्रतिगामीत्वाचे न मिटणारे डाग लागले. 

हे डाग नागपूरचं बनसोड  प्रकरण असो की लासुर आणि परळीत (सामाजिक न्याय मंत्र्यांच्या जिल्ह्यात) घडणाऱ्या घटना असोत अशा अनेक घटनांमध्ये ते डाग इतके घट्ट होत चाललेत कि, त्यांना कोणतेही डिटर्जेन्ट धुऊन काढू शकत नाही. त्यामुळे हे निश्चित आहे की, आपल्या  पश्चात आपले दोन इतिहास लिहले जातील एका इतिहासात आपण इतके पुरोगामी असू कि त्याचा कोणी विचारही केला नसेल पण एका इतिहासात इतके प्रतिगामी असाल कि त्या इतिहासात 100 वर्षाची आर एस एस देखील फिकी पडलेली असेल. कारण महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक दलित अत्याचाराच्या पाठीमागे आणि आरोपीला वाचविण्यात आपल्या पक्षातील लोकांचा  कसा हात होता हे लोकांना थेट वाचायला मिळेल. जे लोक पुरोगामीत्वाचा इतिहास लिहतील ते काही काळानंतर थकतील कारण त्यांच्या पुस्तकांना मिळणारा वाचक वर्ग हा अत्यंत कमी असेल. ज्यांना गुन्हेगारीतून वाचवलं, ज्यांना रस्त्यावरचं उचलून आमदार केलं ते लोक फक्त काही पुस्तके विकत घेतील. ते वाचणार देखील नाहीत. पण प्रतिगामित्वाचा इतिहास लिहणारे लोक काही थकणार नाहीत कारण त्याचा वाचक वर्ग भरपूर असेल. ते वाचतील आणि येणाऱ्या पिढ्यांना ते इतिहास समजावून देखील सांगतील. त्यामुळे इतिहासात आपली नोंद जितकी प्रतिगामी म्हणून असेल तितकी पुरोगामी असणार नाही आणि आपले कार्यकर्ते ठेवणार देखील नाहीत. कारण जवळपास नव्वद टक्के कार्यकर्ते सध्याच्या काळात असे आहेत की, ज्यांना निष्ठेशी नाही तर सत्तेशी देणे घेणे आहे. (याचा अनुभव 2019 च्या निवडणुकीत आपल्या सर्वानाच आला आहे.) 

मुळ मुद्दा असा आहे की हे सगळं का होत चाललं आहे आणि हे डाग घट्ट का होत चालले आहेत. जेव्हा नामांतराचा लढा पेटला तेव्हा तो 17 वर्ष चालला हा लढा चालू राहण्याच्या पाठीमागे आपला हात आहे, खैरलांजी ला तंटामुक्त गाव पुरस्कार देण्यात आपला हात आहे, भांडऱ्याच्या पोट निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात दिलेला उमेदवार देखील खैरलांजी प्रकरणातील आरोपीचा नातेवाईक होता, तो उमेदवार देखील आपणच दिला. अकोल्यात 2014 व 2019 या दोन्ही निवडणुकीतील पराभवाला देखील आपली रणनीती होती, बीजेपी च्या काळात जे मोर्चे एकमेकांच्या विरोधात निघाले त्यात आपला हात आहे किंवा आज चालू असलेल्या बनसोड प्रकरणावर आपणच पडदा टाकण्याचे काम करत आहात. कारण त्यात आपल्याच सत्तेत असलेल्या एका मंत्र्यांच्या नातेवाईकांचा हात आहे. असे कितीतरी आरोप आपल्यावर केले जात आहेत आणि ते लोकांना सहज पटत देखील आहेत. त्यामुळे हे डाग दिवसेंदिवस घट्ट होत चालले आहेत. ज्याला पुसने आपल्यालाच काय आपल्या पूर्ण पक्षाच्या यंत्रणेला देखील भविष्यात शक्य होणार नाही. 

आज महाराष्ट्रात आपली सत्ता आहे नव्हे मुख्यमंत्री म्हणून आपलाच अदृश्य चेहरा लोकांना दिसतो आहे. त्यामुळे सद्याच्या सर्व फेसबुक पोष्ट जरी चेक केल्या किंवा सहज सर्वे जरी केला तरी उद्धव ठाकरे यांच्यावर कोणीही आरोप करत नाही किंवा त्यांना दोष देखील देत नाही. कारण महाराष्ट्रात घडणाऱ्या सर्व अत्याचाराच्या पाठीमागे आणि त्यातील आरोपीना वाचविण्याच्या पाठीमागे आपण आणि आपलं मंत्रिमंडळ आहे. हा मुद्दा लोकांच्या मनात ठासून भरलेला आहे. लासुर, बीड आणि नागपूर प्रकरणानंतर लोक स्पष्टपणे सांगतायत कि आम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडून वेगळ्या आपेक्षा होत्या. यांच्यापेक्षा तर बीजेपी सरकार चांगलं होत. कारण यातल्या कुठल्याच प्रकरणावर कोणताच निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही आणि पोलीस यंत्रणेला घेऊ दिलेला नाही. 

या सर्व घटनांचे डाग ना उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर असतील ना गृहमत्र्याच्या. हे सर्व डाग थेट पक्ष प्रमुख म्हणून आपल्या चेहऱ्यावर असतील. कारण महाराष्ट्र आपल्यात आजही अदृश्य मुख्यमंत्री पाहतो आहे आणि घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या पाठीमागे आपलाच हात आहे असेच लोक समजत आहेत. लोकांच्या या भावनांची जेव्हा इतिहासात नोंद होईल तेव्हा प्रतिगामीत्वाचं पारडं निश्चितच जड असेल. तेव्हा माझी आपल्याला अशी विनंती राहील कि, तुमचं सरकार आहे (मला आजूनही माझं वाटलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अपवाद वगळता) किमान तोपर्यंत तरी असे डाग आपल्या पुरोगामी चेहऱ्यावर लागू नयेत याची काळजी घ्यावी. लासुर, बीड आणि नागपूर अशा घटना किमान आपण हयात आहात तोपर्यंत तरी घडणार नाहीत आणि घडल्याचं तर आपण प्रत्यक्ष लक्ष घालून आरोपीवर कार्यवाही करण्यासाठी संबंधित यंत्रणेला भाग पडावे तेव्हाच कुठे हे डाग पुसले जातील आणि आपला एक वेगळा इतिहास लिहला जाईल. कारण कोणाच्याही इतिहासासाठी हे डाग चांगले नसतात. ज्याचा संदर्भ म्हणून उपयोग केला जाईल आणि एका न घडलेल्या "ब्लॅक हिस्ट्री" चा जन्म होईल. या इतिहासात आपले नाव असणार नाही याची काळजी आतापासूनच घेतलेली बरी. 

आपल्या पक्षाचा 21 वा वर्धापन दिन, त्यानिमित्ताने पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा! आपल्या ध्येय धोरणामुळे महाराष्ट्राला सोन्याचे दिवस येवो. महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, स्त्रिया, सुशिक्षित बेरोजगार यांनाही चागले दिवस येवो आणि हा महाराष्ट्र आपल्या नेतृत्वात अन्याय आणि अत्याचारमुक्त होओ आणि याचा नवा इतिहास आपल्या नावाने लिहला जाओ. हीच अपेक्षा. 

No comments:

Post a Comment