Monday, June 15, 2020

बेबी को "जात" पसंद है।



कोणताही व्हायरस, कोणतंही महायुद्ध किंवा कोणतंही नैसर्गिक संकट भारत या देशाचे काहीही बिघडवू शकत नाही. पण आम्ही स्वतः या देशाला, देशाच्या एकतेला संपवणारा शत्रू हजारो वर्षापासून आमच्या सडक्या मेंदूत आणि आमच्या खानदानी परंपरेनुसार घरातच पाळून ठेवलाय. यात सुशिक्षित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जात हिच आता त्यांची प्रेरणा बनत चालली आहे. अशा लोकांच्या मेंदूत हा शत्रू 24 तास कार्यरत असतो तर काहींच्या गरजेनुसार जागा होतो. पण काही लोक असेही आहेत की त्यांनी हा शत्रू कायमचा तर काहींनी वेळेनुसार संपवण्याचा प्रयत्नही केला आहे. 


भारत हि खरी तर संतांची आणि महंतांची भूमी आहे. पण त्यांची परंपरा चालू राहिली नाही आज त्यांच्याऐवजी सोशल मीडियावर "संता- बंता" च्या जोड्या जन्माला आल्या आणि समाज सुधारणेचे अखंड, काव्य, गाथा निर्माण करण्याऐवजी सामाजिक तेढ निर्माण करणारे पांचट जोक निर्माण करू लागल्या. काही काही लोकांनी तर पायात पैंजण बांधून टिक टॉक वर छम छम करायला सुरुवात केली. (यावरून असंच वाटतं की TiK-Tok ला मराठीत "छम-छम म्हणायला हरकत नाही.) आणि हेच संता- बंता "नाचे" झाले आणि जात नावाचा शत्रू घेऊन सोशल मीडियावर नाचू लागले. याना बघणारे लोक, लाईक करणारे लोक इतके हुशार असतात की, ते दिवसभर त्यावरच असतात आणि स्वतःला राजदरबारात बसल्याचा फील आणून या सर्वांना नाचताना बघतात. याना असं वाटतं की, हे सर्व "नाचे" आपण ठेवलेलेच आहेत. ते त्यांना दिवसभर एक बोटाने डिवचू डिवचू नाचवतात. आवडला नसला कि त्याच बोटाने टच करून पुढे सरकवतात. इतकं एक बरं आहे की, ते त्यांच्या दरबारात फेटे उडवू शकत नाहीत, शिट्या वाजवू शकत नाहीत आणि पैसे उधळू शकत नाहीत. पण हा प्रकार असाच राहिला तर आपल्या "जातीच्या" "नाच्यावर" ते नक्की हे सर्व करतील. कारण जातीचा अभिमान बाळगून "छम-छम" केलं की तो त्या जातीचा "छम-छम स्टार" होतो आणि त्या जातीच्या ग्रुप मध्ये तो इतका व्हायरल होतो की, ज्यांचा जाताभिमान झोपला होता तो लगेच जागा होतो. हा जागा झालेला जाताभिमान समाजात सुसाट तेढ निर्माण करत सुटतो. सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की हा स्टार   "बेबी को बेस पसंद है" या गाण्यावर नाचत आहे पण पुढे ती "बेबी को "जात" पसंद है! या गाण्यावर नाचताना दिसतो.


मग याला आवरता आवरता शासन, प्रशासन, प्रबोधनकार, सामाजिक चळवळीतील लोक आणि कितीतरी चांगले लोक कामाला लागतात. पण या "छम-छम स्टार" ने एवढी घाण करून ठेवलेली असते आणि ती इतक्या लोकांनी खाल्लेली असते की लोक मानसिकसंतुलन गमावून बसलेले असतात. याना आवरता आवरता आपली अनेक वर्षे निघून गेली आहेत. पण यातून बरे होण्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे कारण त्या त्या समाजात अनेक डॉकटर निर्माण होत आहेत आणि समाजाला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काही लोक इंजेक्शन च्या भीतीने त्यांच्या जवळ येत नाहीत तर काहीजण गोळ्या खिडकीतून फेकुन देत आहेत. त्यामुळे या आजारातून बरे होण्याच्या प्रमाणात अतिशय मंद गतीने प्रगती होत आहे. 


पण यातूंन लोक नक्कीच बरे होतील असा आशावाद डॉ. बसवेश्वर महाराज, डॉ. संत तुकाराम महाराज, डॉ. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. राजर्षी शाहू महाराज, डॉ. प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक तज्ञ डॉकटरांनी व्यक्त केला होता. त्यांच्या या आशवादास त्यांच्या विचारांवर आणि मार्गदर्शनावर काम करणाऱ्या अनेकांनी हे काम चालू ठेवले आहे. पण देशाची लोकसंख्या ज्यास्त असल्यामुळे त्यांना शोधून काढून त्यांच्यावर विलाज करणे इतके दिवस अवघड जात होते पण आता tik tok अर्थात छम छम मुळे थोडे  सोप्पे झाले आहे. त्यांचा विलाज करण्यासाठी त्यांना आगोदर विजेचे शॉक द्यावे लागतील का याच्यावर शासन आणि पोलीस यंत्रणा येणाऱ्या काळात नक्कीच विचार करेल. पण प्रश्न असा आहे की शासन आणि पोलीस यंत्रणेतील असे मानसिक आजाराने ग्रस्त असणारे आगोदर शोधून बाहेर काढावे लागतील. त्यांचा आगोदर बंदोबस्त करावा लागेल. त्यामुळे सरकार समोर हे एक मोठे आव्हान आहे. पण अशा लोकांना शोधणं आता काही अवघड काम नाही. एखादा व्यक्ती आरोपी आहे असे सर्वाना माहित असताना जर त्याची बाजू घेऊन तुमच्या एरियातला खासदार, आमदार, मंत्री, नगरसेवक,  इतर राजकारणी किंवा शासन आणि प्रशासनातील एखादा कर्मचारी अधिकारी  पुढे आला तर त्याची नोंद यात करायची आणि त्याला सुरुवातीला उपरोक्त डॉकटरांनी सांगितलेले प्राथमिक औषधे द्यायची.सहा महिन्यात तो बरा नाही झाला तर त्याच्या घरच्यांना सांगून घरीच निगराणीखाली ठेवण्याचा सल्ला द्यायचा. 


हे असे रोगी जोपर्यंत निट होत नाहीत तो पर्यंत आपल्याला 24 तास काम करावे लागेल. तेव्हाच कुठे आपला देश भविष्यात एक राष्ट्र म्हणून पुढे येईल. तेव्हा मित्रहो आजपासून सुरुवात करा आपल्या शेजारी,  परिवारात, मित्र परिवारात असा कोणी "छम-छम स्टार" असेल तर त्याला डॉ. बसवेश्वर महाराज, डॉ. संत तुकाराम महाराज, डॉ. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. राजर्षी शाहू महाराज, डॉ. प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आणि अशा तज्ञ डॉक्टरांच्या पुस्तकाची रोज एक एक पाने सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशी तीन वेळ चघळायला द्या. यातून त्यांच्या मेंदूला पोषक तत्वे भेटतील आणि रोगी लवकर बरा होईल. पालकांना आणि कुटुंब प्रमुखांना विनंती करा की, त्यांच्या कुटुंबात जर कोणी असा "छम-छम स्टार" असेल तर त्याच्या पायातले पैंजण काढून फेकून द्या. या पैंजनाच्या ओझ्याने मुलांच्या टाचा दुखतात आणि त्याच्या वेदना चेतापेशी द्वारे मेंदूपर्यंत जातात आणि मेंदू खराब होतो. तेव्हा आजच आपल्या मुलावर लक्ष ठेवा त्याच्या मोबाईल मध्ये असलेले Tik-tok अर्थात छम-छम चे ऍप डिलीट करा. याने तुमचं लेकरू बिघडत चाललं आहे आणि ते देशाला बिघडवत आहे. लक्षात ठेवा मोबाईल बिघडला तर दुसरा घेता येईल किंवा त्याला दुरुस्त करता येईल. पण लेकरू बिघडलं तर....! आणि देशच बिघडला तर....दुसरा देश?


ज्यांना जात पसंद नाही त्यांनी शेअर करा, कमेंट करा. आपल्या एका शेअर ने कोणाचे तरी प्राण वाचू शकतात, कुटुंब सुधारू शकते. चला तर उपरोक्त डॉक्टरांचे हे  अभियान राबवू या जातीच्या मानसिक रुग्णांना बरे करूया. 

#माझा भारत - जातमुक्त भारत 

डॉ. ह. नि. सोनकांबळे

टीप: जे खरोखरच आपली कला सादर करतात तेच खरे स्टार आहेत. बाकी सर्व छम छम आहे. 

#tiktok #Castefreeindia #castefreemaharashtra #annihilationofcaste #mahatmabhaveshwar #chatrapatishivajimaharaj #mahatmaphule #rajarsgishaumaharaj #drbabasahebambedkar 

2 comments:

  1. सर, अतिशय छान विश्लेषण तुम्ही या लेखात केलेला आहे. खरोखरच आज टिक टोक वर जो वैचारिक दिवाळखोरीचा तमाशा चालू आहे तो पाहिल्यानंतर अक्षरशः तरुणाईची कीव करावी वाटते.

    ReplyDelete
  2. एकदम बरोबर आहे सर तुमचे

    ReplyDelete