Tuesday, May 25, 2021

विरोधकांच्या हृदयावर राज्य करणारा नेता



विरोधकांच्या हृदयावर राज्य करणारा नेता


डॉ. ह. नि. सोनकांबळे


म्हणतात ना ‘स्वदेश पुज्यते राजा, विव्दान सर्वत्र पूज्यते’ अभ्यासू माणसांला जगात कुठेही किंमत असते. असेच काही विलासरावांचे होते. विलासराव देशमुख आणि इतर नेत्यांत एक फरक एवढाच होता की, ते अभ्यासपूर्ण उत्तरे द्यायचे. याचा अर्थ असा नाही की, ते सतत अभ्यासच करत बसायचे. त्यांनाही अभ्यासाला जास्त वेळ मिळायचा नाही. परंतु ते मिळेल तेवढा वेळ अभ्यासू माणसांत घलवत असत. अभ्यासू व्यक्तींना भेटणे, विविध विषयावर चर्चा करणे, नवीन पुस्तकांवर लक्ष ठेवुन राहणे. यात त्यांना वेगळी रुची होती. म्हणूनच त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सभागृहात ते कुठे तरी कमी पडले? त्यांचा कुठेतरी आपमाण झाला? कोणाच्या तरी प्रश्नाला उत्तर देता आले नाही, फजीती झाली. असे कधीच घडले नाही. उलट प्रसंग कोणताही असो सभागृह जिंकूणच ते बाहेर पडायचे. 

कुठे काय बोलावे, कसे चिमटे घ्यावे, कशा फिरक्या घ्याव्यात यात त्यांचा हातकंडा होता. म्हणूनच ते सभागृहात असले की, सभागृहात हास्यकल्लोळ असायचा. त्यांच्या कार्यकाळात गोपीनाथराव मुंडे आणि नारायण राणे असे पटटीचे विरोधी पक्ष नेते त्यांना लाभले. परंतु विरोध कितीही टोकाचा झाला तरी आपमाण कोणाचाही होणार नाही. याची ते सातत्याने काळजी घेत असत. नारायण राणे यांचा स्वभाव फटकळ असल्याची जाणीव त्यांना होती. परंतु त्यांनाही मिश्किलपणे चिमटे काढत शांत करणारी शैली विलासारावांकडे होती. सभागृहात एकमेकांच्या विरोधात कितीही बालले तरी शेवटी घरुन आणलेला डब्बा एकत्र बसून खाणारे हे नेते होते. सभागृहात लोकशाहीचा धर्म आणि सभागृहाबाहेर मैत्रीचा धर्म विलासारावांनी कधीच सोडला नाही. नारायण राणे विरोधी पक्ष नेते असल्याने विलासारावांचा ते कडवा विरोध करायचे, सभागृह तहकूब करायचे. याचा राग विलासारावांना कधीच आला नाही. कारण त्यांना लोकशाहीचा धर्म माहित होता. विरोधकांचे काम विरोध करणे असते, त्यांनी जर विरोध केला नाही तर लोकशाही टिकणार नाही. याची जाणीव त्यांना होती. त्यांच्यात अनेक वेळा खडाजंगी व्हायची. सभागृहाचे कामकाज थांबवावे लागायचे. परंतु दुपारच्या जेवणाच्या वेळी हे दोघे एकमेकांना फोन करायचे आणि घरुन डब्बा आला आहे चला जेवण करु म्हणायचे आणि एकाच डब्यात जेवून पुन्हा सभागृहात भांडायला तयार व्हायचे. 

लोक याला तडजोडीचे राजकारण असे जरी म्हणत असले तरी एका अर्थाने याला लोकशाही म्हणावे लागते. कारण विरोधक कोणीही असो तो सरकारच्या चुका दाखवून देणारा असावा लागतो. इंग्लंड सारख्या देशात जेव्हा लोकशाहीचा पाया घतला गेला तेव्हा विरोधकाला पगार देवून टीका करायला लावली जायची. याचे कारणच असे होते की, सरकार कुठे चुकते आहे हे दाखवून देण्याचे काम त्याने योग्य पद्धतीने केले पाहीजे. तीच प्रथा विलासारावांनी महाराष्ट्रात जिवंत ठेवली. विरोधक कसा असावा याचाही त्यांचा चांगलाच अभ्यास होता. म्हणूनच त्यांना गोपीनाथराव मुंडे विरोधक म्हणून रहावेत असे वाटायचे. कारण त्यात दुहेरी भूमिका होती. एक तर सभागृहात ते आपल्या चुका सांगतच असतात परंतु सभागृहाच्या बाहेरही मित्र म्हणून ते मित्रत्वाचे सल्ले द्यायचे. कधी कधी मिश्किलपणे बोलताना महाराष्ट्राला अशाच विरोधी पक्षनेत्याची गरज आहे असे बोलून दाखवायचे. एक प्रसंग तर सभागृहातच घडला होता. गोपीनाथराव मंुडे विरोधी पक्ष नेते असताना ते सभागृहात आमचे सरकार आले आणि मी जर मुख्यमंत्री झालो तर कसे काम करेण हे सांगत होते. त्यावर विलासारव त्यांना उत्तर देताना म्हणाले की, ‘गोपीनाथरावांनी मुख्यमंत्री होण्याच्या भानगडीत पडू नये. कारण ते विरोधी पक्ष नेते म्हणूनच शोभून दिसतात. अशाच विरोधी पक्ष नेत्याची सध्या महाराष्ट्राला गरज आहे.’ विलासारावांचा हाच स्वभाव सभागृहातील नेत्यांना काम करण्यासाठी उत्साह देवून जायचा. 

त्यांच्या या स्वाभावानेच विरोधकांच्या मनावर देखी अधिराज्य गाजवले. माजी केंद्रिय मंत्री राजीव शुक्ला यांनी असाच एक प्रसंग विलासारावांच्या बाबतीतला सांगीतला होता. प्रसंग दिल्लीतला होता. जेव्हा मनमोहनसिंग पंतप्रधान होते. तेव्हा अण्णा हाजारे यांनी दिल्लीत लोकपालच्या अनुषंगाने मोठे आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाला धरुन संसदेत विरोधकांची आणि सरकारची प्रचंड खडाजंगी होत होती. विरोधक संसदेचे कामकाज तहकुब करत होते, सरकार पाडण्याची भाषा करत होते. काॅंग्रेसचे अनेक नेते अण्णा हजारे यांना आंदोलन मागे घेण्याचे प्रस्ताव देत होते. पण अण्णा हजारे काही आंदोलन मागे घ्यायला तयार नव्हते. तेव्हा विलासाराव नुकतेच महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर पडून केंद्राच्या राजकारणात सक्रिय झाले होते. विलासारावच हे आंदोलन शांत करु शकतात अशी काॅंग्रेसच्या गटात एक चर्चा होती. त्यांची भेट मनमोहन सिंग आणि प्रणव मुखर्जी यांच्यासोबत झाली आणि दुसऱ्याच दिवशी विलासाराव अण्णा हजारे यांच्या भेटीला रामलिला मैदानावर गेले. त्यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली आणि आंदोलन शांत केले. या आंदोलनाचे स्वरुप इतके भयंकर होते की, जागतीक स्तरावरच्या प्रसारमाध्यमांनी देखील याची दखल घेतली होती. हे आंदोलन कदाचित विलासराव नसते तर अनेक दिवस पुढे चालू राहिले असते. परंतु विलासरावांचा स्वभाव हा विरोधकांनाही शात करणारा होता. त्यामूळे अण्णा हजारे यांना देखील त्यांची भेट भावली असावी. त्यामूळेच हे आंदोलन संपुष्टात आले. राजीव शुक्ला त्यांची आठवण सांगताना म्हणतात की, ‘हे आंदोलन विलासारावांनीच शंात केले, ते नसते तर आंदोलन आणखी जास्त चिघळले असते.’ परंतु त्यांच्यात असलेल्या बंधुभावाने तसे होवू दिले नाही. 

बंधुता हे लोकशाहीचे प्रमुख मूल्य आहे. त्यामूळे लोकशाहीत कोणीच कोणाचा शत्रू नसतो. तो फक्त विरोधक असतो. परंतु ही बंधुता आता महाराष्ट्राच्याही राजकारणातून हददपार होत चालली आहे. सद्याच्या राजकारणात विरोधक नाही तर केवळ शत्रू समजून राजकारण केले जावू लागले आहे. ‘आमची सत्ता आली की तुमचा कार्यक्रमच लावू’ अशी भाषा सातत्याने ऐकण्यात येत आहे. सत्ता हे विकासाचं साधन असतं ते साध्य नाही. हे म. गांधी यांचे तत्व आणि सत्ता हे जनतेच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्यूशन असतं हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्व विलासारावांना चांगलेच माहित होते. म्हणूनच त्यांनी सत्तेचा उपयोग विरोधकांना संपवण्यासाठी नाही तर विरोधकांना सोबत घेवून ‘विकासाचं राजकारण’ करण्यासाठी केला. ते विरोधकांचे सल्लेही काळजीपूर्वक ऐकत असत आणि चांगल्या गोष्टींची अमलबजावणी करण्यासाठी त्यांची मतदही घेत असत. 

खरे तर नाटकातले पात्र, पुस्तकातले चित्र आणि राजकारणी मित्र हे कधीच खरे मानायचे नसतात. पण काही मानसे अशी असतात की, ते अशा परंपरांना देखील बाजूला सारुन नवा इतिहास निर्माण करतात. विलासाराव देशमुखांनी तो इतिहास निर्माण केला. आजकाल स्वपक्षातील लोकांशीही मैत्री होत नसताना त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांशी मैत्री निर्माण केली आणि ती शेवटपर्यंत जपली. मैत्रीत राजकारण करायचं नाही परंतु राजकीय मैत्री करत राहायचं. हेच त्यांचं तत्व होतं. त्यामूळेच ते विरोधकांच्या मनावर देखिल कायमच अधिराज्य गाजवत राहिले.


(पॉलिटिकल आयडॉल या आगामी पुस्तकातून)


ब्लॉग ला Follow आणि Share करायला विसरू नका. 

4 comments:

  1. Replies
    1. ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
      येणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
      धन्यवाद

      Delete
  2. विलासरावांचा अभ्यास लेखातून लक्षात आला नाही!कृपया तो सविस्तर लिहिला तर बरे होईल. उदा. आर्थिक अभ्यास, सामाजिक अभ्यास,इत्यादी.
    त्यांचे काही अभ्यासपूर्ण लेखन अथवा भाषण किंवा एखादया विषयावरील अभ्यासपूर्ण मत असं काही आपल्याला आपल्या आगामी पुस्तकात मांडता आले तर चांगले होईल!

    ReplyDelete