Saturday, May 29, 2021

बाबासाहेबांच्या स्पर्शाने विहिरीचे सोने झाले



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झाला अन विहीरीचे सोने झाले. विहिरीची इतिहासात नोंद झाली. 


२९ मे १९२९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा या गावी दौरा होता. या गावातील अस्पृश्य मंडळींनी दोन दिवसीय अस्पृश्य परिषद येथे भरवली होती. अतिशय दुर्गम भागात असलेले हे गाव आजही येथे पोहचण्यास अडचणी येतात. 29 मे च्या उन्हाळ्यात बाबासाहेब या गावातील जि. प. च्या शाळेत दोन दिवस मुक्कामी होते. या गावातील विहीर बाबासाहेबांनी अस्पृश्यासाठी खुली करून दिली. आजही हि विहीर जशास तशी आहे. बाबासाहेबांचा स्पर्श झालेली ही विहीर आता स्मारक म्हणून इतिहासात नोंदवली गेली आहे. 



 बाबासाहेबांची  ही पातुर्डा भेट केवळ एक घटना नव्हती तर, चळवळीतील ऐतिहासिक नोंद होती. बाबासाहेबांच्या आगमनाने जिल्ह्यातील दलित चळवळीला उभारी मिळाली. या भेटीनंतर अनेक कार्यकर्त्यांंनी चळवळीत स्वत:ला झोकून दिले. 



या दोन दिवसीय अधिवेशनासाठी त्यांच्यासोबत त्यावेळी रा.पी मटकर, रा. सोनोने, . मकेसर ,  केशवराव खंडारे , संभाजी जाधव, रायभान इंगळे इ. मंडळी हजर होती. 



मध्यप्रांत व वऱ्हाड अस्पृश्य परिषदेचे हे दोन दिवसीय अधिवेशन होते. संध्याकाळी झालेल्या या अधिवेशनाच्या सुरुवातीला एक ऐतिहासिक घटना देखील घडली. या गावातील  बथुरामजी दाभाडे यांची कन्या कु. कवतिकाबाई आणि सखाराम इंगळे यांचा विवाह सुधारलेल्या पद्धतीने व अल्प खर्चात करण्यात आला होता. यामुळे आपले विवाह कसे असावेत हे बाबसाहेबांनीच सांगितले होते असे अनेक जुनी मंडळी सांगत असतात.



ज्या काळात बाबासाहेब या खेड्यात पोहचले त्या काळात गाड्यांची इतकी काही व्यवस्था नव्हती, रस्ते चांगले नव्हते. नद्या, नाले ओलांडून बाबासाहेबांनी हे गाव गाठले होते.



दरवर्षी शासनाच्या वतीने या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श सोहळा साजरा केला जातो. मलाही व्याख्यानांसाठी या गावातील मंडळींनी या ऐतिहासिक पर्वाला निमंत्रित केले होते. आमचे मित्र पत्रकार रवी इंगळे यांच्यामुळे मला हा सोहळा आणि बाबासाहेबांचा प्रवास अनुभवता आला. गावकरी मंडळी आणि सर्व मित्र परिवाराचे खूप खूप आभार. 


मित्रहो, कधी या भागात गेलात तर नक्कीच या ऐतिहासिक स्मारकाला भेट द्यायला विसरू नका. 

डॉ. ह. नि. सोनकांबळे


कृपया Blog ला Follow करायला विसरू नका. ही विनंती. 


जय भीम! 

हेही वाचा 

जपानच्या डॉक्टरांनी का मागितली राष्ट्राची माफी

मराठा आरक्षण : चुका राज्यकर्त्यांच्या दोष संविधानाला

...हे मुख्यमंत्री लिहणार होते बाबसाहेबांचे चरित्र

No comments:

Post a Comment