बेदखलांची दखल घेणारी - बेदखल
डॉ. ह. नि. सोनकांबळे
आजच बातमी वाचली, पदव्युत्तर शिक्षण घेतलेला वेठबिगार मालकाने साखळदंडाने बांधून ठेवला. कोंडबा हाटकर यांची कादंबरी वाचून सीएचबी धारकांची अवस्था देखील अशीच आहे यावर शिक्कामोर्तब होत. कोंडबा हाटकर बोलतोय बाकीचे बोलत नाहीत एवढाच फरक.
तसं पाहिलं तर माझं चरित्र, कांदबरी, कथा आणि कवितांचं वाचन फारच कमी आहे. मला यातलं कोणतंही साहित्य जास्त आवडत नाही. पण काही मोजक्या लोकांचे चरित्र आणि काही कादंबऱ्या वाचण्यात आल्या आहेत. सहसा चळवळीत काम करणाऱ्या लोकांनी लिहिलेले आणि चळवळीसाठी पुर्णवेळ देऊन लिहणाऱ्या लोकांच्या साहित्याकडे मी दुर्लक्ष करत नाही. याचाच एक भाग म्हणून चळवळीत काम करणारा आणि चळवळीसाठी लिहिणारा लेखक म्हणून परिचित असलेले कोंडबा हाटकर यांची बेदखल कादंबरी वाचण्यासाठी हातात घेतली.
कोंडबा हटकर यांनी आतापर्यंत अनेक वर्तमानपत्रातून वैचारिक लेखन केले आहे. मला असे वाटत होते की, कोंडबा हटकर यांच्या हातुन एखादं वैचारिक पुस्तक लिहिलं जाईल परंतु अचानक त्यांची कादंबरी प्रकाशित करून त्यांनी माझ्यासह अनेकांना धक्का दिला. कारण वैचिारिक लेखन करत असताना अचानक कादंबरीकडे हा तरूण कसा काय वळला याचं उत्तरच सापडत नव्हतं. पण बेदखल जेव्हा वाचून पुर्ण झाली तेव्हा असं लक्षात आलं की, चळवळ आणि जगणं या दोन्हींच्या मध्यभागी असलेली मनातली खद-खद कुठे तरी बाहेर काढायची होती आणि याचं माध्यम म्हणून त्यांनी कादंबरी लेखणाचा प्रपंच केला.
तसं पाहिलं तर ही कादंबरी रमेश वाघमारे नावाच्या एका सीएचबी प्राध्यापकाच्या भोवती फिरते. तोच या कादंबरीचा नायक आहे. इतर सर्व पात्रं ही रमेशच्या अवती भवतीची असली तरी कादंबरी वाचताना असं लक्षात येतं की, ही सर्व पात्रे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील असून त्यांची नावे बदलण्यात आली आहेत.
रमेश वाघमारेच्या आयुष्याचा आणि संघर्षाचा पट उलघडत असताना लेखकाने दोन अंगाने हा पट उलगडला आहे. एक तर रमेश वाघमारे या नावाने आणि दुसरा स्व कथनाने. या दोन्ही माध्यमातून त्यांनी रमेशच्या आयुष्याचा संघर्ष मांडला आहे. रमेश या कादंबरीचा नायक असला तरी हा नायक महाराष्ट्रातल्या प्रत्येक सीएचबी धारकाचा प्रतिनिधी आहे असेच म्हणावे लागते. कारण सीएचबीच्या धोरणाने रमेश सारख्या अनेकांना संघर्षाच्या वाटेवर तर आणलेच परंतु त्यांचे आयुष्य बर्बाद होईल अशी व्यवस्थाच निर्माण केली.
 |
ADVT |
शिक्षण वाघीनिचे दुध आहे असे म्हटले जाते परंतु आम्ही ज्या शिक्षणाला वाघीन समजुन तिचे दुथ पित आलो ती खरेच वाघीन होती का असा प्रश्न ही कादंबरी वाचल्यानंतर प्रत्येक सीएचबी धारकाणे स्वत:ला विचारला पाहिजे, अशा अवस्थेत ही कादंबरी वाचकाला घेऊन जाते आणि आपण स्वत: पेटुन उठलं पाहिजे याची जाणीवही करून देते. अनेकांनाच नव्हे तर सर्वच सीएचबी धारकांना हे सीएचबीचे धोरण चुकीचे आणि आयुष्याची राखरांगोळी करणारे आहे असे वाटत असले तरी याच्या विरोधात कोणीही बोलत नाही कारण या वर्षी सीएचबीच्या विरोधात संघर्ष केला तर पुढच्या वर्षी सीएचबी देखील मिळेल की नाही याची भिती प्रत्येक सीएचबी धारकाच्या मनात असते आणि आहे. ती भिती काढणारी चळवळ मात्र कोणीही उभी करत नाही आणि ति होणारही नाही. त्याची कारणे वेगवेगळी आहेत.
बेदखल कादंबरीने सीएचबी धारकांच्या चळवळीचाही वेध काही प्रमाणात घेतला आहे, काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा त्या चळवळीचे प्रमाणच तेवढे आहे असे म्हणायला देखील हरकत नाही. ही चळवळी पावसाळ्यात उगवलेच्या छत्रीप्रमाणे आहे असते की, काय? असाही प्रश्न ही कादंबरी वाचताना पडतो कारण अनेक चळवळी उभ्या राहिल्या आणि त्या पावसाळा संपला की, नष्टही झाल्या. अतिषय तुटपुंज्या वेतनात सीएचबी धारक उद्याच्या आशेवर जगताना दिसतो आहे. काही काही जन तर सीएचबी तत्वावरच सेवानिवृत्त झाल्याच्या नोंदी लेखकाने या कादंबरीत घेतल्या आहेत. सीएचबी वर कोणी 14 वर्ष कोणी 18 वर्ष तर कोणी 20 वर्षाहुन अधिक काम केले आहे. लॉकडाऊनच्या काळात तर सीएचबी धारकाचे वेतनच बंद होते अशा अवस्थेत अनेक प्राध्यापक हे आपल्या विद्यार्थ्यांच्या शेतातच कामाला होते. ही आवस्था बघुन लेखकाने ही व्यवस्थाच निर्लज्ज आहे आणि आपण या व्यवस्थेचे गुलाम आहोत असे सांगून यातून मुक्तीचा मार्ग आपल्याकाडे आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मुळात महाविद्यालयात तासिका कोण घेतं? नॅकचे सर्व कामे कोण करतं? अॅडमिशन प्रक्रियेत कोण असतं? पुर्णवेळ कार्यरत असलेल्या शिक्षकांचे तास देखील कोण घेतं? या सर्व प्रश्नांची उत्तर मात्र एकच आहे ते म्हणजे सीएचबी धारक प्राध्यापक. मुळात सीएचबी धारक प्राध्यापक म्हणजे एक प्ररकारचा चतुर्थश्रेणी कर्मचारी असतो जो पुर्णवेळ प्राध्यापकाच्या हाताखाली कामाला दिलेला असतो अशीच अवस्था सीएचबी धारकांची झालेली आहे.
त्याचे आपमानास्पत जगणे केवळ महाविद्यालयातच नाही तर समाजात देखील आहे हे सांगत असताना नायकाच्या कुटंुबातील, गावातील, समाजातील आणि लग्न जुळवतानाचे अनेक संवाद या कादंबरीत आणले आहेत.
आपला मुलगा आज ना उद्या प्राध्यापक होईल हे स्वप्न डोळ्यात घेऊन जगणारे आई वडील आणि त्यांना समाजातुन विचारले जाणारे प्रश्न हे भयानक वास्तव या कादंबरीत मांडले गेले आहे परंतु हे वाचून तरी आपण जागे होणार आहोत का? हा प्रश्न शिल्लकच राहतो.
महाराष्ट्राच्या बाहेर सीएचबीचे धोरण नाही. शिवाय अनेक राज्यात भरती प्रक्रिया देखील शासन स्तरावरून केंद्रिय पध्दतीने राबविली जाते. मध्यप्रदेश, बिहार अशा राज्यात देखील प्राध्यापक भरती ही आयोगामार्फत केली जाते. महाराष्ट्रात त्याची मागणीही काही दिवस सुरू राहिली आणि नंतर शांत झाली.
सीएचबीच्या धोरणाने महाराष्ट्राच्या उच्चशिक्षीतांच्या पिढ्या बर्बाद केल्या आता नवीन शैक्षणीक धोरण किती पिढ्या बबार्द करणार आहे हे निश्चित सांगता येत नाही. कारण पुन्हा परदेशी विद्यापीठे बाजारात येणार आहेत आणि शिक्षणाचे शेअर मार्केट होणार आहे. या आव्हांनाना आपण एक सीएचबी धारक म्हणून कसे पेलणार आहोत हे आजून तरी निश्चित नाही.
कोंडबा हटकर यांनी बेदखल या कादंबरीच्या माध्यमातुन कोणते प्रश्न निर्माण झाले आणि आमच्या पिढ्या कशा बर्बाद झाल्या याची दखल घेतली आहे परंतु हे वाचून हे निश्चत केले पाहिजे की नवीन शैक्षणिक धोरण आल्यानंतर सीएचबी धारकांचे काय? याचा विचार केला पाहिजे. इतकंच नाही तर जे पर्मनंट प्राध्यापक आहेत त्यांनीही हा विचार केला पाहिजे की, महाविद्यालयांची संख्या कमी होणार आहे म्हणजे काय? आणि महाविद्यालयांचे क्लस्टर होणार आहे म्हणजे काय? येणाऱ्या दहा वर्षात सर्वच प्राध्यापकांची आवस्था सीएचबी धारकांसारखी होणार आहे. हे विसरता कामा नये. 2036 मध्ये पुन्हा एक कादंबरी "पर्मनंट प्राध्यापकांची परवड" या शिर्षकाखाली कोणीतरी नक्कीच लिहील. तुर्तास पर्मनंट प्राध्यापकांनी बेदखल वाचून सीएचबी धारकांची तरी परवड थांबवावी अशी आशा आहे.
हेही पुस्तके वाचा
कोंडबा हाटकर यांची बेदखल हि कादंबरी मागविण्यासाठी 9552133951 / 80555 55500 या नं वर संपर्क साधा.
डॉ. ह. नि. सोनकांबळे
सहाय्यक प्राध्यापक,
राज्यशास्त्र विभाग,
एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद
सरजी मी यावर घंटामास्तर नावाचा खूप पुर्वी blog लिहीला होता...
ReplyDelete