Monday, April 10, 2023

आंबेडकरी चळवळ इतकी मनोरंजक आहे का?


  आंबेडकरी चळवळ इतकी मनोरंजक आहे का?

डॉ. ह. नि. सोनकांबळे

 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने निलेश कराळे आणि विठ्ठल कांगणे या दोन कॉमेडी शिक्षकांची मागाणी भाषणांसाठी वाढत चालली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दिवसेंदिवस मनोरंजनाकडे वळत चालली आहे याचे हे द्योतक आहे. पण खरोखरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती इतकी मनोरंजक आहे का? याचा विचार आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे. 

 
    2014 मध्ये एका कार्यक्रमात अरुधती रॉय असं म्हणाल्या होत्या की, ‘आम्हाला डॉ. आंबेडकर गांभीर्याने समजून घेण्याची गरज आहे.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही मनोरंजन नाही तर ती शोषीत, वंचीत समुहाच्या न्यायाची लढाई आहे आणि कोणतीही लढाई लढत असताना आपण जर विनोद करत बसलो तर त्या लढाईचे परिणाम काय होतील यावर जास्त सांगण्याची गरज नाही. 

 
    मागे काही दिवसांपूर्वी विद्रोही मराठी साहित्य सम्मेलनातही गर्दी जमवण्यासाठी आयोजकांनी निलेश कराळे यांना सम्मेलनाचे स्वागत अध्यक्ष केले आणि त्यातल्या एका विचारमंचाला “फुले-शाहू- आंबेडकर” विचारमंच असे नाव दिले. माझ्या दृष्टीकोणातुन हा फुले शाहू आंबेडकरांचा आणि त्यांच्या चळवळीचा फार मोठा अपमान आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पट्टे बापूराव, दिलीप कुमार अशा मनोरंजन करणा­या लोकांना साधे जवळही थांबू दिले नाही. त्यांच्याच नावावर आज मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. विद्रोही मराठी साहित्य सम्मेलन तरी गांभीर्याने घेतले जात असावे असे मला इतके दिवस वाटत होते पण विद्रोह देखील मनोरंजनाकडे वळला आहे असेच सध्या तरी दिसते आहे. 

 
    निलेश कराळे कोण? याचा शोध घेतल्यावर माझ्या असे लक्षात आले की, त्यांनी “बुलेट चालू घडामोडी” नावाचा एक महान ग्रंथ लिहला आहे आणि तो ग्रंथ विद्रोही मराठी साहित्यिकांना एवढा आवडला की बस्स…! त्यांना त्यांनी फुले-शाहू-आंबडकरी चळवळीचा नयक ठरवून टाकले. आज तेच आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या स्टेजवरून लोकांचे मनोरंजन करू लागले आहेत. 

 
    बे डोंमड्याहो, काचा-कचा, डुक­याहो, रान डुकरीन, कचकन, बुडया-टकल्या, साल्या, देऊ काय कोपच्यात, जा ना मरून, लिचोंड, ढस, धुस, फुससस, वानर तोंडया, बदमास लोकहो, भिकारवाडा, मारन भोकनेवा, पोट्टी जाते पोट्यासोबत फिरायले या आणि अशा अनेक शब्दातला निलेश कराळे यांचा विद्रोह कदाचित विद्रोही साहित्यिकांना जास्त आवडला असावा. तोच विद्रोह आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मंडळाला देखील आवडू लागला आहे. म्हणूनच की काय त्यांच्या तारखा देखील मिळणे सध्या कठीण झाले आहे. 

 
    तुम्ही जर या चळवळीतले दुसरे भाष्यकार बघितले तर त्यांचे नाव आहे विठ्ठल कांगणे, सध्या तेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध ठिकाणी चळवळीचे भाष्यकार म्हणून बोलू लागले आहेत. ते बोलणारच कारण जयंती समितीचा आग्रह आहे की, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. आणि मग ते मार्गदर्शन करायला येतात. तुम्ही जर यांचे नाव युटयुब ला सर्च करायला गेलात आणि विठ्ठल कांगणे असं सर्च केलं तर पुढचे शब्द फुल्ल, मोक्कार कॉमेडी असं आपोआप येतो. 

 
    ये दलिंदरा, बब्या, गौतमी पाटल, तु निराधार बायांच्या घरी बसतो, तोंडावर उलटी झापड देईन, क्लास करता करता पोरगी पटली, तुया बापाला आधी हाणलं पाहिजे, मग तु अंडरविअर विक अशे अनेक शब्द यांच्या तोंडून सातत्याने येतात. ही भाषा ऐकणारा आणि त्यांचे अनुकरण करणारा यांचा एक मोठा वैचारिक चाहता वर्ग आपल्याला पहावयास मिळतो. त्यामुळे या वर्गाची मागणी पुर्ण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा मंच सध्या यांच्यासोबत शेअर केला जातोय. 

 
    लोक येतात, ऐकतात, पोट धरून हसतात आणि अशा पध्दतीने मग जगातल्या सर्वात महान विव्दान व्यक्तीची जयंती साजरी केली जाते आणि आम्ही कोणीच काही बालत नाही. आता वेळ आली आहे हे सर्व थांबवण्याची.

 
जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक दोन फोटो सोडले तर कुठेच हसताना दिसत नाहीत, कुठेच एखाद्या भाषणात जोक सांगताना दिसत नाहीत. किंवा कुठेच मनोरंजन करतानाही आढळत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नावच इतकं सिरियस आहे की, हे नाव घेतांना मोठ मोठे विव्दान माणसांचे चेहरे गंभीर रूप धारण करतात. पण हे गांभीर्य मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणाऱ्यांना  आणि त्यांचे अनुयायी म्हणून घेणाऱ्यांनाच सध्या राहिले नाही.
पण आपण जर खरेच स्वत:ला डॉ. बाबासाहेब आंबेडरांचे अनुयायी किंवा वारस म्हणून घेत असू तर आपण हे सर्व थांबवले पाहिजे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर गांभीर्याने समजून घेतले पाहिजेत. अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानेही बाजारात विनोद/जोक यायला वेळ लागणार नाही. 

 
    तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की, आपल्याला असे कार्यक्रम  जे  लोक आयोजित करत आहेत त्यांना थांबवा, त्यांना ही चळवळ किती सिरियस आहे हे सांगा. समाजाचा पैसा आणि वेळ यात व्यर्थ जातोय हेही पटवून सांगा. वाटलं तर जयंती क करू नका पण पण जयंतीच्या नावावर होणारा हा तमशा थांबवा अशी हात जोडून विनंती करा आणि ऐकतच नसतील तर ………! पुढचा निर्णय तुम्हीच घ्या. 

 

कारण महामानवांची जयंती महामानवांची जयंती वाटली पाहिजे. तिचा एक वेगळाच थाट असला पाहिजे. केवळ गर्दी जमवण्याच्या नावाखाली उद्या तमाशे होऊ देऊ नका.   

 

 हेही वाचा

सम्राट अशोकाचा भारत "सोने की चिड़िया"  

 

रिझर्व बँक, लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर  

जागतिक चर्चाविश्वात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर 

 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि LIC चे राष्ट्रीयकरण  

 

अमेरिका-इंग्लंड-भारतीय संविधान आणि स्त्रिया  

 

स्वातंत्र्यापुर्वीच संविधानाचे 7 मसुदे तयार होते?  


4 comments:

  1. You are absolutely right sir, I agree with you. - Dr. Sudarshan Bhaware

    ReplyDelete
  2. Absolutely Right sir.

    ReplyDelete
  3. सहमत आहे सर, हल्ली महापुरुषांची जयंती म्हणजे जत्रा अस स्वरुप झालं आहे.

    ReplyDelete