आपला नेता निवडून यावा या साठी जीवाचं रान करून प्रचार करणाऱ्या, नवस बोलणाऱ्या, माय-बापानं सांगितलेलं काम सोडून सोशल मीडियावर आपल्या नेत्यांचा तुफान प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्याला या लॉकडाऊन च्या काळात आपल्या त्याच नेत्यांचा एक फोन तरी आला आहे का? माझा कार्यकर्ता या काळात त्याच्या घरची चूल कशी पेटवत असेल. त्याची आई, त्याचा बाप, त्याची बायको, त्याचे लेकरं या काळात जिवंत आहेत का? त्याची बायको आणि आई चुलीकडे बघून काय विचार करत असतील? याचा विचार तरी कोणत्या नेत्याच्या मनात आला आहे का? आला असेल तर त्यांनी एखादा फोन अशा कार्यकर्त्याना या अडीच महिन्याच्या काळात केला आहे का? जर केला असेल, तुमच्या चुलीची काळजी त्यांनी या काळात घेतली असेल तर तोच तुमचा खरा नेता आहे. जर आला नसेल तर आजच सावध व्हा आणि पोटा पाण्याचा काही तरी धंदा करता येतो का ते बघा.
काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचं दुःख मांडणार भाषण केलं होत. त्यात त्यांनी कार्यकर्त्याना, त्याच्या आई, वडील, बायको या सर्वांना सावध केलं होतं. ते म्हणाले होते की, दिवसभर जर तुमचा पोरगा एखाद्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरत असेल आणि रात्री तो रिकाम्या हाताने घरी परत येत असेल तर त्याच्या आईला, वडिलांना, बायकोला काय वाटत असेल? माझ्या पक्षात काम करणारा पोरगा आता रिकाम्या हाताने कधीच घरी परत जाणार नाही. जर तो माझ्यासाठी दिवसरात्र एक करत असेल तर त्याची चूल पेटविण्याची जबाबदारी राज ठाकरेंची असेल.
याचा अन्वयार्थ असा होता की, जर तुम्ही एखाद्या पक्षाला, नेत्याला वेळ देत असेल तर त्यांनी तुमच्या चुलीची जबाबदारी घेतली पाहिजे. पण असं होत नाही. या लॉकडाऊनच्या काळात सामान्य मातदारापर्यंत तर सोडाच पण किमान आपल्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या कार्यकर्त्यापर्यंत या नेत्यांची मदत नाही तर नाही पण ख्याती खुशालीची रेंज तरी पोहचायला हवी होती. आता वेळ मिळाला नाही हे काही कारण असू शकत नाही. कारण या काळात तुमच्या नेत्याकडे काहीच काम नव्हते. ते नाही का, एक केंद्रीय मंत्री घरी बसून भाजी नीट करत होते. त्यांच्या इतका वेळ तर नक्कीच तुमच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार आणि खासदारांकडे असणारच असणार. मग एक रिंग वाजायला काहीच हरकत नव्हती.
खरं तर अनेक नेत्यांनी या लॉकडाऊन च्या काळात स्वतःला लॉक करून घेतलं आहे. ते कोणाच्याही सम्पर्कात येत नाहीत. कारण त्यांना माहित आहे निवडणूका होऊन आजून एक वर्षही पूर्ण झालं नाही आणि पुढच्या चार वर्षात हे सगळं विसरलं जाईल. जर समजा निवडणूका आता दोन तीन महिन्यांनी असत्या तर नेते एक तर तुमच्या घरून हलले नसते किंवा तुमची सर्व व्यवस्था त्यांनी फार्म हाऊस वर केली असती. पण ते म्हणतात ना "गरज सरो आणि वैद्य मरो" तशीच अवस्था आज कार्यकर्त्यांची झाली आहे.
काही कार्यकर्त्यांनी साहेबांनी दिलेली पाकिटे, आणि 15 दिवसाचं रेशन (जे कि सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी वाटण्यात आलं होतं. एकदा फोटो काढून झाले की ते दुसऱ्या वेळेस वाटले देखील नाहीत. करणं फोटोच इतके काढलेत कि तेच आजून अपलोड करायचे संपले नाहीत) यावर देखील भागवलं आहे आणि त्यालाच ते मदत म्हणून बसले आहेत. पण त्या कार्यकर्त्याला हे कोण समजावून सांगायचं कि ती मदत नव्हती तर "लोकांना वाटून शिल्लक राहिलेलं, साहेब म्हणाले घेऊन जा तू पण एखाद" पण साहेबांनी तुला पर्मनंट रेशन मिळावं याची काही व्यवस्था केली आहे का? तर अजिबात नाही. तुझी तशी व्यवस्था केली तर तू नाही का "आत्मनिर्भर" होणार आणि मग साहेबांच्या प्रचारापासून दूर जाणार.
एक कार्यकर्ता सांगत होता, निवडणुकीच्या काळात साहेबांकडून जेवणाबरोबर रिचार्ज देखील यायचं पण आता काहीच येत नाही. एके साहेबांनी गरिबांना रेशन वाटायसाठी बोलावलं पण साहेबांना कोण सांगणार कि, तुमचा हा कार्यकर्ताच त्याचा पहिला लाभार्ती आहे. मी पण मग असाच दोन पाकिटे रेशनची माझ्याच घरी टाकले. आता तेही संपत आले. साहेबांना दिसत नसेल का माझी गरिबी.
दुसरा एक जण म्हणाला, जेव्हा निवडणुकीचा प्रचार करत होतो तेव्हा भाऊ जवळ घेऊन, खांद्यावर हात ठेवून विचारायचे" घरी सर्व बरं आहे ना, काही लागलं तर सांगत चल" दिवसातून भाऊ दोन ते तीन वेळेस फोन करायचे. तेव्हा वाटायचं "आपल्याला अच्छे दिन" आले. पण आता लॉकडाऊन सुरु होऊन अडीच महिने झाले. भाऊंचा साधा मेसेज देखील नाही आणि मी केलेल्या मेसेज ला भाऊ उत्तर देखील देत नाहीत.
तिसरा एक म्हणत होता, वडील सुरुवातीपासून याच पक्षात काम करतात. म्हणून मीही बी ए ला असताना त्यांच्या सम्पर्कात आलो. निवडणुकीच्या काळात वडील एखादी ( भाड्याची) गाडी घेऊन त्यावर झेंडा लावून प्रचार करत फिरायचे. मलाही थर्ड इयर ला गेल्यावर तसेच फिरावं वाटलं. मलाही तेव्हा पाहिल्यांदाच मतदान आलं होतं आणि कॉलेज मध्ये राज्यशास्त्राच्या सरांनी लोकशाही, मतदानाचा अधिकार थोडाफार शिकवला होतं. म्हणून मीही जोशात प्रचाराला लागलो. मार्च-एप्रिल याच निवडणुकीच्या धामधुमीत गेला आणि बी. ए. केव्हा नापास झालो कळलंच नाही. कार्ट नापास झालं म्हणून वडील खूप रागावले. घरी बसून विषय काढतो म्हणून सांगितलं पण घरी काही अभ्यास होत नव्हता. गावात नुसत्या राजकारणाच्या गप्पा सुरु राहायच्या त्यात मी तर प्रत्यक्ष प्रचारात काम केलं होतं. एक दोन वेळेला साहेबांनी खांद्यावर हात टाकला होता आणि ते फोटो माझ्याकडे होते. लोक मला साहेबांच्या जवळचा समजायचे. या धुंदीत असेच तीन चार वर्षे निघून गेले. बी. ए. चा अभ्यास घरी बसून काही होत नव्हता. शेवटी इंग्रजीचा पेपर कसा तरी काढला पण तोपर्यंत घरच्यांनी मुलगी बघायला सुरुवात केली होती. लग्न झालं अन गावातच राहिलो. नेहमी वाटायचं माझा बाप आणि मी दोघेही पक्षात काम करतो. साहेबांची चांगली ओळख देखील आहे. आपलं काम होईल कुठे ना कुठे. पण काही झालं नाही. साहेब तिन वेळेस आमदार होऊन आता या वेळेस खासदार झालेत. त्यांचा मुलगा माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. पण तो या वर्षी आमदार झाला. माझा बाप आणि मी दोघेही आहोत तिथेच आहोत. या लॉकडाऊन च्या काळात ना साहेबांचा फोन ना पक्षाचा.
रोज हे ऐकतोय, चर्चा करतोय. मन सुन्न होत आहे. वाटतं यावर खूप लिहावं. पण वाटतं जाऊ द्या कोण वाचणार आहे आणि कोण इतका विचार करणार आहे. आज सांगितलं तरी उद्या तेच होणार आहे.
दरम्यान एकाने मला कार्यकर्त्यांची व्याख्या विचारली, तू राज्यशास्त्रात पीएच. डी. झाला. पुस्तकात कार्यकर्त्यांची व्याख्या काय केलेली आहे. काही वेळ मला असं वाटलं की, हिवाळ्यात खूप थंडी आहे म्हणून मी पांघरून झोपलोय पण कुणी तरी अंगावरची चादर ओढून थंडगार पाणी माझ्या तोंडावर फेकलंय. कारण आजपर्यंत मी कार्यकर्त्यांची व्याख्या कुठेच वाचली नव्हती. मलाही गरज वाटली नाही व्याख्या तयार करायची. कारण मला असं वाटायचं की पक्षात कोणीच कार्यकर्ता नसतो सर्व नेतेच असतात छोटे किंवा मोठे. पण या सर्व चर्चा ऐकल्या तेव्हा शेवटी या व्याख्येवर येऊन पोहचलोय. कार्यकर्ता म्हणजे आशेवर जगणारा एक सैनिक आहे. जो साहेबांना गड जिकुंन देतो आणि शहीद होतो. पण शाहिद झाल्यावरही त्याचा फोटो कधीच साहेबांच्या घरात, कार्यालयात किंवा साहेब जग सोडून गेल्यावर त्याच्या फोटो खाली देखील नसतो.
अनेक जुन्या आणि आणि नवीन कार्यकर्त्याबोरोबर चर्चा चालू आहे. अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांचे किस्से ऐकायला मिळत आहेत. असं वाटतं त्याचं एक चांगला पुस्तक होईल आणि किमान त्या नेत्यांच्या जयंत्या साजऱ्या करणाऱ्या आजच्या कार्यकर्त्याना तरी "प्रॅक्टिकल राजकारण" कळेल.
तुम्ही देखील अशा चर्चा करा आणि समजून घ्या "कार्यकर्त्यांचं लॉकडाऊन".