Saturday, October 17, 2020

काँग्रेसने भिमशक्ती का संपवली?


काँग्रेसने भिमशक्ती का संपवली?



2004 च्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन उद्धव ठाकरे यांनी 11 फेब्रुवारी 2003 रोजी मुंबई विद्यापीठातील एका सभेत शिवशक्ती- भीमशक्तीच्या एकत्रीकरणाची घोषणा केली. तत्कालीन परिस्थिती मध्ये नेमकी "भीमशक्ती" म्हणजे कोणाला गृहीत धरायचे आणि कोणाला जवळ करायचे असा प्रश्न सर्वांच्याच समोर उभा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थात डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या महाकाय शक्तीला सर्वच जण भीमशक्ती म्हणायचे हे जरी खरे असले तेरी जवळपास 80 हुन अधिक पक्ष आणि संघटना या दरम्यान अस्तित्वात होत्या. यातली कुठली संघटना भीमशक्ती समजायची हा प्रश्न निर्माण झाला. 






प्रत्येक आंबेडकरी पक्ष हा आमचे संघटनच खऱ्या अर्थाने "भीमशक्ती" आहे असे ठासून सांगू लागला. शिवसेना म्हणजे शिवशक्ती आहे हे जरी निश्चित असले तरी भीमशक्तीच्या शोधमोहिमेला सुरुवात झाली. याच दरम्यान रामदास आठवले आणि बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली आणि आमचा पक्ष हीच खरी भीमशक्ती आहे असे रामदास आठवले यांनी सांगायला सुरुवात केली. अशाने काँग्रेसला मोठे नुकसान पोहचेल याची जाणीव चंद्रकांत हंडोरे यांना यापूर्वीच झाली होती. आणि म्हणून त्यांनी या चर्चेच्या दरम्यानच्या काळात काँग्रेस च्या अंतर्गत राहून "भीमशक्ती" या शिर्षकाखाली एक सामाजिक संघटना स्थापन केले. यात सर्वपक्षीय कार्यकर्त्याना त्यांनी सामावून घेतले पण अचानक 2004 च्या निवडणूक काळात "भीमशक्ती" चा पाठिंबा काँग्रेस ला असेल असे जाहीर केले. त्यामुळे इतर पक्षातील कार्यकर्त्याना एक तर भीमशक्ती सोडावी लागली किंवा त्यांचे इतर पक्ष सोडावे लागले. याचा फायदा निश्चितच काँग्रेस ला झाला. कारण निवडणुकीनंतर आपल्या संघटनेचा नेता मंत्रिमंडळात असणार आहे हे जवळपास निश्चित झाले होते शिवाय उत्तर प्रदेश च्या राजकारणाकडे बघून काही जणांना काँग्रेस एखाद्या दलित व्यक्तीलाच मुख्यमंत्री करेल असेही वाटू लागले होते त्यात चंद्रकांत हंडोरे यांच्या नावाची चर्चाही काही प्रमाणात झाली. त्यामुळे या संघटनेसोबत अनेक कार्यकर्ते जोडले गेले. अवघ्या 2003 ते 2004 या एका वर्षात भीमशक्तीच्या शाखा खेड्यापाड्यात उघडल्या गेल्या आणि मुंबईचा माजी महापौर ग्रामीण भागातील जनतेचाही नेता झाला. 



गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्याला मुंबईला बोलावणे आणि आपल्या संघटनेचे उद्देश पटवून सांगणे, त्याची मुंबई मध्ये चांगली व्यवस्था करणे आणि त्याला ट्रॅव्हल, रेल्वे मध्ये परतीच्या प्रवासाला सुखरूप बसवून देणे ही कामे स्वतः चंद्रकांत हंडोरे करू लागले त्यामुळे गावाकडचा सामान्य कार्यकर्ता देखील भारावून गेला. अशा अनेक कार्यकर्त्यांनी भीमशक्तीला आपला वेळ द्यायला सुरुवात केली. यातून भीमशक्तीचे पारडे दिवसेंदिवस जड होऊ लागले. यामुळे काँग्रेस ऐवजी "भीमशक्ती" हीच चंद्रकांत हंडोरे यांची ओळख निर्माण झाली. याचा मोठा फायदा निश्चितच 2004 च्या निवडणुकीत काँग्रेस ला झाला व पुढे हंडोरे हे सामाजिक न्यायमंत्री देखील झाले. 


त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा फायदा घेऊन त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राज्यात राबवायला सुरुवात केली. भीमशक्तीच्या कार्यकर्त्याना आणखी बळ मिळू लागले. चंद्रकांत हंडोरे यांनी सामाजिक न्याय खाते इतक्या उंचीवर नेऊन ठेवले कि, तिथपर्यंत भविष्यात कोणत्याही मंत्र्याला त्या खात्याला घेऊन जाता येणार नाही. समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी मंत्री असताना केला. जेव्हा काँग्रेस ने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तेव्हा हंडोरे यांनी महामंडळाकडून मजुरांची घेतलेले कर्जही माफ करावे अशी भूमिका घेतली आणि ती शेवटालाही नेली. प्रत्येक तालुका, जिल्हा आणि महानगर पालिका क्षेत्रात विद्यार्थी वसतिगृहे, सामाजिक न्याय भवन बांधकामे हाती घेतले. त्यांच्या काळात झालेली ही सर्व बांधकामे आज कोव्हिडसाठी सरकार वापरत आहे. त्यांच्या या कामाचा फायदा आज अशा संकट काळी प्रत्येक तालुक्यात झाला. आजही या सामाजिक न्याय भवन किंवा निवासी वस्तीगृहासमोर गेलं की चंद्रकांत हंडोरे यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. 



चंद्रकांत हंडोरे यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत, वसतिगृह भत्यात केलेली वाढ विद्यार्थी विसरू शकले नाहीत. एकूणच त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे समाजात एक वेगळे स्थान निर्माण झाले आणि भीमशक्तीची शक्ती दिवसेंदिवस वाढत गेली. 


या सर्व परिस्थितीत काँग्रेस मध्ये एक वेगळे संघटन आणि त्याचा एक वेगळा दबदबा "भीमशक्ती" च्या रूपाने दिसू लागला पण ही बाब पक्षातील इतरांना खटकणारी होती. त्यामुळे भीमशक्तीचा जोर कमी झाला पाहिजे असे काँग्रेसमधल्या एक गटाला वाटू लागले. याचा परिणाम म्हणून खेड्यातल्या भीमशक्तीच्या पाट्या कमी झाल्या आणि भीमशक्ती या बॅनर खाली होणारी कामेही हळूहळू कमी झाली. पण याचा फटका जसा चंद्रकांत हंडोरे यांना बसला तसा तो काँग्रेसलाही बसला आणि काँग्रेस सोबत अर्थातच भीमशक्तीच्या बॅनर खाली काम करणारे कार्यकर्ते इतर पक्षात गेले. 


काँग्रेस साठी एक मोठे संघटन ठरलेला नेता आणि त्याचे संघटन स्वतः काँग्रेस ने संपवले आणि अनुसूचित जाती सेल सुरु केला पण त्यासाठी काँग्रेस ला हवा असलेला नेता मात्र मिळाला नाही. काँग्रेसने राजेंद्र गवई, जोगेंद्र कवाडे अशा नेत्यांना हाताशी धरून आंबेडकरी मते मिळवण्याचा प्रयत्न केला पण संघटनात्मक पातळीवर याचा फायदा ना या नेत्यांना झाला ना काँग्रेस ला.  पण काँग्रेस मात्र चंद्रकांत हंडोरे सारख्या कणखर नेत्याला जो कि काँग्रेस साठी संघटनात्मक बांधणी करू शकतो अशा नेत्याला आणि त्याच्या संघटनेला बाजूला सारून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे. मुळातच काँग्रेसला हि घाण सवय आहे हे मात्र विसरता येत नाही. कारण ज्याचा काहीच फायदा संघटनात्मक पातळीवर काँग्रेस ला होत नाही अशा रेखा, सचिन तेंडुलकर यांना काँग्रेस नेते समजते आणि ज्यांचा खरोखरच पक्षाला फायदा होतो अशा नेत्यांना बाजूला सारले जाते. त्यामुळे पक्षाचे संघटन वाढत नाही शिवाय काँग्रेसच्या अशा नितीनेच पक्ष संपुष्टात येऊ लागला आहे. 


या सर्व परिस्थितून काँग्रेस ला पुन्हा एकदा उभारी घ्यायची असेल तर असे विसरलेले नेते आणि कार्यकर्ते यांचा शोध काँग्रेसला येणाऱ्या काळात घ्यावा लागेल तरच काँग्रेस तरेल.  रेखा, सचिन, गवई, कवाडे अशा निष्क्रिय लोकांना घेऊन कोंग्रेस मोट बांधणार असेल तर येणार काळ  काँग्रेसचा निव्वळ पश्चातापाचा काळ असेल हे मात्र निश्चित आहे. 

1 comment:

  1. खुप छान
    राहुल उद्धव रोटे
    भिमशक्ती युवा शहर अध्यक्ष औरंगाबाद

    ReplyDelete