एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश म्हणजे हिना चित्रपटातल्या एका गाण्याला सूट होण्यासारखाच आहे.
खडसे भाजप ला इतके दिवस म्हणत होते,
दिल दिया ऐतबार कि हद थी,
जान दि तेरे प्यार कि हद थी,
मर गये हम खुली रही आंखे,
ये तेरे इंतजार कि हद थी।
राष्ट्रवादी तून आवाज येतो,
हद हो चुकी है आजा,
जां पर बनी है आजा,
महफिल सजी है आजा,
तेरी कमी है आजा।
कारण,
लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे असे डिग्ग्ज नेते स्वपक्षावर नाराज असूनही ते पक्षातून बाहेर पडू शकले नाहीत. यात त्यांची पक्षनिष्ठा होती की आणखी दुसरीच काही समस्या होती? हे निश्चित सांगता येत नाही. पण भाजप मध्ये हि परंपरा आहे की, नाराज असले तरी पक्ष कुठे ना कुठे संधी देईल या आपेक्षेपोटी अनेक नेते पक्षश्रेष्ठीकडे डोळे लावून बसलेले असतात. एकनाथ खडसेही असेच डोळे लावून बसले होते पण त्यांचे डोळे थकले आणि त्यांनी वाट बघणे सोडून दिले.
एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे असे अनेक नेते नेमके कोणत्या पक्षात आहेत हे निश्चित पणे त्यांच्या कोणत्याही कार्यकर्त्याना सांगता येत नव्हते. यातून विनोद तावडे व पंकजा मुंडे यांना पक्षाने पुन्हा एकदा ओळख दिली असली तरी एकनाथ खडसे यांना आजूनही पक्षाने ओळख देण्याचा प्रयत्न केला नाही. या सर्व गोष्टीला वैतागून एकनाथ खडसे यांनी शेवटी भाजप मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण तिकडे गेल्यावर नेमकं काय? हा एकच प्रश्न शिल्लक राहत नाही तर मूळ प्रश्न असा आहे की, भाजप सोडण्याचे परिणाम नेमके काय असतील? कारण गोपीनाथ मुंडे एकवेळ बोलताना असे म्हणाले होते की, भाजपात फक्त एंट्री चा दरवाजा आहे एक्झिट चा दरवाजा नाही. म्हणून बाहेर पडता येत नाही.
गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेस अर्थात त्यांचे मित्र विलासराव देशमुख यांनी अनेक वेळा काँग्रेस मध्ये येण्याचे खुले निमंत्रण अनेक स्टेजवरून दिले होते. किती दिवस उप (मुख्यमंत्री), गट (नेते) असे शब्द लावून फिरणार आहात या आमच्याकडे आम्ही तुमच्या नावासमोर मुख्य (मंत्री) लावू असे खुले आव्हान विलासराव देशमुख यांनी लातूरच्या सभेत दिले होते.
दिल्ली च्या एका ओबीसी मेळाव्यात देशात ओबीसींची वोट बँक सर्वात ज्यास्त असून सत्तेत मात्र वाटा कमी आहे. याचा ओबीसींणी स्वतंत्रपणे विचार करावा असे आव्हान ओबीसी नेते शरद यादव, लालूप्रसाद यादव, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे अशा अनेकांनी केले होते. तेव्हापासून गोपीनाथ मुंडे यांचे पक्षातील वजन कमी कमी होत गेले. पुढे पुढे तर गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षात कोणी विचारेनासे झाले याची कबुली खुद त्यांनीच पत्रकारांना दिली होती. ते म्हणाले होते की, मी गेली ३५ वर्षे राजकारणात सक्रिय आहे. इतर पक्षातील नेत्यांशी असलेला स्नेह राजकारणाच्या पलीकडचा आहे. माझ्या वेदना जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दुर्दैवाने माझ्याच पक्षाचे लोक याबद्दल वावड्या उठवत आहेत. माझ्या मनात काही वेदना आहेत, दुःख आहे. त्या फक्त माझ्या नसून पक्षातील हजारो कार्यकर्त्यांच्या आहेत. पण स्पष्टपणे कोणीही बोलत नाही.
याचा अर्थ या वेदना दाबून अनेक कार्यकर्ते भाजप मध्ये काम करतात असा घेतला तर ते बाहेर का पडत नाहीत असाही प्रश्न निर्माण होतो. आजकाल पक्षात थोडेही डावलण्याचा प्रयत्न झाला तरी मोठे नेते पक्षातून बाहेर पडण्याच्या धमक्या देतात. पण भाजप हा एकमेव असा पक्ष आहे जिथे कितीही डावलले, कशीही वागणूक दिली तरी बाहेर पडण्याचे कोणी नावही घेत नाही. ते गोपीनाथ मुंडे यांनाही शेवटपर्यंत जमले नाही. अनेक नेते वर्षानुवर्षे आपल्याला कुठे तरी संधी मिळेल या आपेक्षेने वाट बघत बसलेले असतात. परंतु बाहेर पडण्याचे नावही घेत नाहीत.
गेली काही वर्षांपासून विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे हेही प्रतीक्षेत होते शेवटी विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना थोडेफार स्थान मिळाले पण एकनाथ खडसे यांना मिळाले नाही. बाहेरुन भाजप मध्ये येणारे गोपीचंद पडळकर हे पक्षात सेट झाले पण पक्षातले जुने कार्यकर्ते सेट झाले नाहीत आणि बाहेरही पडले नाहीत. काही वरिष्ठ नेते असेही म्हणायचे की, ते भाजप मधून बाहेर पडूच शकत नाहीत. त्यांचे म्हणणे आजपर्यंत खरेही ठरत आले पण एकनाथ खडसे यांनी प्रयोगिक डेरिंग केली आहे असेच म्हणावे लागेल कारण भाजप ला जर फक्त एंट्री डोअर असेल तर निश्चितच याचे परिणाम वाईट असतील आणि जर खरच एक्झिट डोअर हि असेल तर एकनाथ खडसे यांचा प्रवास निश्चितच सुखाचा असेल. अन्यथा तिकडेही संघर्ष त्यांची वाट बघतच बसलेला असेल.
वेळ निघून गेल्यावर सुद्धा काही जणांना कळत नाही, हे तर राजकारण आहे. 👌
ReplyDelete