डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचे जागतिक स्वरूप
14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षा भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि पुन्हा एकदा भारताला नव चेतना देणारा धम्म मिळाला. कारण अडीच हजार वर्षापूर्वी भारताच्या भूमीमध्ये तथागत गौतम बुद्धाचा जन्म झाला आणि अडीच हजार वर्षानंतर याच भूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. हा अडीच हजार वर्षांचा कालखंड वैचारिक व बुद्धधम्माच्या ऱ्हासाचा होता. तो भरून काढण्यासाठी हजारो लोकांनी एकत्र येण्याची गरज होती. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक शक्ती एवढी प्रगल्भ होती की, हजारो लोकांनी एकत्र येऊन करावयाची क्रांती त्यांनी एकट्यानेच केली. म्हणून हा धम्म आज जगभर पसरताना दिसतो आहे. आज जगभरात 42 राष्ट्रांमध्ये बौद्धधम्म पसरला आहे. तर 20 पेक्षा जास्त राष्ट्रे हे बौद्ध आहेत. जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केले, तेव्हापासून बौद्ध धम्माची चर्चा जगभरात सुरू झाली असे म्हणावयास हरकत नाही. आणि तेव्हापासूनच अनेक लोकांनी प्रभावित होऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याचे आपल्याला दिसून येते. मग तो सोहळा दलाई लामांचा अमेरिकेतील वीस लाख लोकांना दीक्षा देणारा असो की, भारतातील दीक्षाभूमीवरचा असो किंवा मग चैत्यभूमीवरचा असो असे अनेक सोहळे दरवर्षी जगभरात होतांना दिसून येत आहेत.
तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने भारावलेले लोक दरवर्षी असे सोहळे घडवून आणत असतात. जगभरात अनेक संस्था बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य करत आहेत. यात प्रामुख्याने अमेरिकेच्या वाशिंग्टन शहरातील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल असोसिएशन फॉर एज्युकेशन जपान, युनायटेट रविदास कम्युनिटी नेदरलँड, आंबेडकर असोसिएशन फॉर नॉर्थ अमेरिका, डॉ. आंबेडकर मिशन न्यूयॉर्क, आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर युएसए अशा अनेक संस्था सध्या जगभरात काम करत आहेत. 14 ऑक्टोबर 2010 पासून ग्रेंट ब्रिटनच्या वोव्हरहॅम्टन शहरांमध्ये डॉ. आंबेडकर मेमोरियल कमिटी द्वारे दीक्षा दिवस साजरा करण्यात येतो. या कमिटीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या कमिटीच्या कार्यालयासमोर ग्रेट ब्रिटनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा या शहराच्या महापौरांच्या हस्ते बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात भारतीय संविधान हा ग्रंथ नाही तर बौद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आहे. जगातील एकमेव असा पुतळा आहे. जो बौद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ घेऊन उभा आहे. अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जगभरातील पुतळे हे भारतीय संविधान हातात घेऊन उभे आहेत. युरोपातल्या हंगेरी सारख्या राज्यात दरवर्षी जय-भीम नेटवर्क या संस्थेकडून धर्मांतराचा सोहळा देखील आयोजित करण्यात येतो. एवढेच नाही तर अनेक विद्यापीठांमध्ये देखील हा उत्सव साजरा केला जातो. कॅनडाच्या सायमन फे्जर विद्यापीठाच्या डब्ल्यू सी बेन्नेटो ग्रंथालयात चौथ्या मजल्यावर एका मोठ्या हॉलमध्ये 14 ऑक्टोबर 2004 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील बसविण्यात आला आहे. तसेच 16 आणि 17 ऑक्टोबर 2009 रोजी कोलंबिया विद्यापीठ आणि द साऊथ एशिया इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने काष्ट अॅन्ड कंटेम्पररी इंडिया या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन देखील करण्यात आले होते. म्हणून केवळ सामाजिक संस्थाच नाही तर अनेक देशातील शैक्षणिक संस्था देखील विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना दिसून येत आहेत.
बौद्ध धम्माचे धम्मगुरू अनागरिक धम्मपाल असोत किंवा दलाई लामा असोत अशा अनेकांनी जगभराचा प्रवास करून धम्माचा प्रसार आणि प्रचार केला आहे. भारतात लोक पावलेल्या बौद्ध धम्माला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्जन्म देऊन केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगभरातील लोकांना जसा हवा होता तसा धम्म त्यांनी जगाला दिला. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक युगाचे आधुनिक बुद्ध ठरता आहेत. त्यांच्या या कर्तृत्वामुळे भारतीयांची जागतिक ओळख ज्याला आपण युनिक आय डी असे म्हणतो, ती ओळखत बौद्धधम्म ठरत आहे. याचा अनुभव मागील काही दिवसापासून आपल्याला येतो आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेंव्हा जपानला जाऊन आले, तेव्हा त्यांनी तेथील अनेक बौद्ध स्थळांना भेटी दिल्या आणि ते त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. मी बुद्धाच्या जन्मभूमी मधून आलो आहे. हीच त्यांची खरी ओळख जपान मध्ये होती. हे कोणत्याही भारतीयांनी विसरू नये. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी न्यूयॉर्क शहराला भेट दिली. या भेटीत कॉन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स च्या सभेत दहशतवादावर भाष्य करत असताना, भारत ही अहिंसेचा पुरस्कार करणारी भूमी असून ही बुद्धाची भूमी असल्याने अहिंसा व शांततेचे ती एक प्रतीक आहे. आणि या भूमीत दहशतवादाला कसलाच थारा नाही. असे सांगून त्यांनी पुन्हा एकदा आपली ओळख एक बौद्ध राष्ट्र असल्याचे सिद्ध केले आहे.
पंतप्रधानांच्या जपान दौऱ्यानंतर काही दिवसांनी भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्हिएतनाम दौऱ्यावर गेले होते. तेंव्हा जाताना ते बुद्धगया येथील बोधिवृक्षाची एक फांदी या देशाला भेट म्हणून देण्यासाठी घेऊन गेले होते. ही फांदी त्यांनी आपल्या स्वतःच्या हस्ते व्हिएतनाम मध्ये लावली आणि पुन्हा एकदा आम्ही बौद्ध राष्ट्रातून आलो आहोत आणि हा बोधिवृक्ष बुद्धाची निशाणी आहे असे सांगून आम्ही बुद्धाच्या भूमीतून आलो आहोत आणि हीच आमची खरी ओळख असल्याचे सिद्ध केले आहे. भारताची खरी ओळख ही बुद्धाची भूमी म्हणूनच जागतिक पटलावर आहे. म्हणूनच भारतात होणाऱ्या अनेक बौद्ध सोहळ्याकडे जगाचे लक्ष लागलेले असते. अनेक देश आपले सोहळे येवून बघतात. आणि त्यांच्या देशांमध्ये असे सोहळे साजरे करतात. याचे एक उत्तम उदाहरण आपल्याला घेता येईल ते असे की, हंगेरी हे युरोपातल्या छोटेसे राज्य. जेमतेम लोकसंख्या दहा कोटींच्या आसपास नऊ मोठी व तेवीस छोटी शहरे आणि बरीच खेडी या राज्यात आहेत. असे असले तरी जगातल्या प्रमुख तीस लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणुनही या राज्याची ओळख जगभरात आहे. दरवर्षी नऊ लाख पर्यटक या देशाला भेट देतात. या देशाने 1989 ला संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी इथे सुरू झाली असेच म्हणावे लागेल. कारण जगाच्या पाठीवर जिथे जिथे संसदीय लोकशाहीचा विषय असतो, तिथे तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव असतेच. इथेही अनेक पुस्तकांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पसरले आहेत.
युरोपातल्या या हंगेरी राज्यात प्रामुख्याने रोमा आणि जिप्सी या दोन आदिवासी जमाती राहतात. या दोन आदिवासी जमातीचे नेते दडॅक आणि ऑरसॉस यॉनॉस यांनी 2005 आणि 2007 साली महाराष्ट्राला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शोषण मुक्तीच्या चळवळीचा अभ्यास केला आणि ते भारावून गेले. जेंव्हा ते भारतातून हंगेरीला परत गेले तेंव्हा त्यांनी हंगेरीमध्ये जय-भीम नेटवर्क या संस्थेची स्थापना केली. या नेटवर्कच्या माध्यमातून 12 ऑक्टोबर 2013 रोजी ओल्सोझोल्का येथे धर्मांतराचा एक भव्य सोहळा देखील पार पाडला. आजही मोठ्या संख्येने या देशात धर्मांतर होताना दिसून येत आहे. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून अनेक लोक बौद्ध धम्माचा स्विकार करत आहेत. म्हणून विजया दशमीचा हा पवित्र धर्मांतराचा सोहळा केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही तर या सोहळ्याने एक जागतीक रूप धारण केले आहे.
डॉ. ह. नि. सोनकांबळे
फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचे अभ्यासक व लेखक
टीप: प्रस्तुत लेख, मासिक "विदर्भ साथी" च्या या महिन्याच्या विशेषांकात मा. संपादक रवी इंगळे यांनी प्रकाशित केला आहे.
खूप सुंदर विश्लेषण सर💐💐💐
ReplyDelete