Wednesday, November 11, 2020

एक खून, एक वाक्य आणि अमेरिकेत सत्तांतर




एक खून, एक वाक्य आणि अमेरिकेत सत्तांतर 


मायक्रो राज्यघटना आणि सोबत असलेले दीर्घ संसदीय संकेत यांच्या आधारावर जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेचा राज्यकारभार चालतो. नुकत्याच या महासत्ता असलेल्या राष्ट्राच्या निवडणूका अतिशय अटीतटीत संपन्न झाल्या.  या सर्व निवडणुकांचे वार्तांकन भारतातील अनेक प्रसारमाध्यमांनी केले. ट्रम्प आणि बायडन यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीचे वार्तांकन करत असताना बायडन विजयी होतील याचेही विश्लेषण करायला भारतीय प्रसारमाध्यमे विसरले नाहीत. या संपूर्ण निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर कॅलिफोर्निया मधून खासदार असलेल्या कमला हॅरीस या अमेरिकेच्या उप राष्ट्राध्यक्ष झाल्याचेही भारतीय प्रसारमाध्यमांनी सांगितले. त्या मूळच्या कुठल्या आहेत? त्या अमेरिकेत कशा गेल्या? त्यांचे पती काय करतात? त्यांना किती मुले आहेत? त्यांचे आई-वडील मूळचे कुठले? त्या व्यवसायाने काय आहेत? त्यांची राजकीय वाटचाल कशी आहे? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे भारतीय प्रसारमाध्यमांनी शोधून काढली आणि त्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कशा झाल्या हेही त्यांनी सांगितले. पण एक गोष्ट सांगायला ही प्रसारमाध्यमे विसरून गेली त्या गोष्टीची भारतात कुठेही चर्चा झालेली दिसून आली नाही. खरे तर बायडन व कमला यांना राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष करण्याच्या पाठीमागे कारणीभूत होता तो अमेरिकेतला वर्णसंघर्ष. 



 याचा शोध भारतातल्या कुठल्याही प्रसारमाध्यमांनी घेतल्याचे दिसत नाही. बायडन यांनी कृष्णवर्णीय महिलेची निवड उपराष्ट्राध्यक्ष म्हणून का केली? आजपर्यंत अमेरिकेत 1776 पासून एकाही महिलेला राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष पदावर बसण्याची संधी मिळाली नाही आणि थेट कृष्णवर्णीय असलेली भारतीय वंशाची महिला अमेरिकेची उपराष्ट्राध्यक्ष झाली.  मागच्या निवडणुकीत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री असलेल्या, प्रभावी महिला हिलरी क्लिंटन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती त्या अत्यंत प्रभावशाली, कर्तुत्ववान महिला म्हणून देखील ओळखल्या जात होत्या. तरीही अमेरिकन धार्मिक आणि वर्णद्वेषी असलेल्या ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली गेली. पण महिला राष्ट्राध्यक्ष होणे अमेरिकन जनतेला पटले नाही. या निवडणुकीत मात्र अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला उपराष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहोचली असे का झाले याचेही उत्तर शोधणे आवश्यक आहे. 






याचे मूळ कारण आफ्रिकन अमेरिकन असलेल्या जॉर्ज फ्लॉईड यांचा मृत्यूही हे आहे. हे विसरून चालणार नाही.  त्याच्या तोंडून निघालेले "I can't breathe" हे एक वाक्य अमेरिकेच्या सत्तांतरला कारणीभूत ठरले. निवडणुकीच्या काही दिवस आगोदर जॉर्ज फ्लॉईड यांचा एका पोलिस अधिकाऱ्याच्या हातून मृत्यू झाला होता. त्या प्रसंगाचा व्हिडीओ जगभर पसरला, जॉर्ज फ्लॉईड यांच्या तोंडून निघालेले शेवटचे शब्द "I can't breathe" हे वाक्य घेऊन अमेरिकेत मोठे जनांदोलनही उभे राहिले. या आंदोलनाला अमेरिकेतील व्हाईट पिपल्सचाही मोठा पाठींबा मिळाला.  यातूनच ब्लॅक लोकबाबद्दल असलेली सहानुभूती आणि न्यायाची भावना बायडन यांना राष्ट्राध्यक्ष तर कमला हॅरीस यांना उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या खुर्ची पर्यंत घेऊन गेली. कारण जो बायडन यांच्या विजयालाच हे आंदोलन कारणीभूत ठरले. आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या पाठींब्यावरच बायडन विजयी झाले. अनेक राज्यातून आफ्रिकन अमेरिकन लोकांनी बायडन यांना प्रचंड पाठींबा दिला आणि इथेच हे निश्चित झाले की, उपराष्ट्राध्यक्ष कोणीतरी ब्लॅक व्यक्तीच होणार. शिवाय आफ्रिकन अमेरिकन लोकांचा मोठा नेता म्हणून ओळख असलेल्या जेम्स क्लायबर्न यांनी बायडन यांना विनंती केली की, इतक्या मोठ्या समूहाने आपल्याला पाठींबा देऊन आपला विजय निश्चित केला आहे, त्यामुळे यांच्यातील एकाला अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाचा  मान द्यावा. या लोकांची साथ बायडन यांना विसरता आली नाही आणि कमला हॅरीस यांना बायडन यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाचा मान दिला. खरे तर ही निवडणूक समता, स्वातंत्र्य, बंधुभाव व न्याय विरुद्ध वर्णद्वेषी अशीच होती. यातून समता, स्वातंत्र्य, बंधुभाव व न्याय या तत्वांना मानणाऱ्या लोकांचा विजय आहे. 



 यापूर्वीदेखील 1980 पासून ते 2004 पर्यंत या तत्त्वांना मानणाऱ्या लोकांचे एक वेगळे संघटन अमेरिकेत पहावयास मिळाले होते. त्याचाच परिणाम म्हणून 2004 च्या निवडणुकीत बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. 1976 ते 1980 या चार वर्षात अमेरिकेत गाजलेले "रुट्स" हे पुस्तक या तत्त्वांना मानणाऱ्या लोकांच्या संघटनेस कारणीभूत ठरल्याचे म्हटले जाते. त्याचाच परिणाम हा बराक ओबामा यांना राष्ट्राध्यक्ष करण्यात दिसून आला. या निवडणुकीपूर्वी जॉर्ज फ्लॉईड यांचा मृत्यू अमेरिकेतील लोकांच्या संघटनेस पुन्हा एकदा कारणीभूत ठरला आणि एक ब्लॅक महिला अमेरिकेची उपराष्ट्राध्यक्ष झाली. जेव्हा जेव्हा अमेरिकेत अशी भावना निर्माण झाली आहे, तेव्हा तेव्हा अमेरिकेत एक वेगळे सत्तापरिवर्तन पहायला मिळाले आहे. यावेळेस याला जोरदार साथ मिळाली ती समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय यातत्वांना मानणाऱ्या जो बायडन यांची. मुळातच वर्णद्वेषी असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यू नंतर उभारलेलं आंदोलन हाताळता आलं नाही आणि त्यांच्या विरोधात जनप्रक्षोभ वाढत गेला. परिणाम सद्या जनतेसमोर आहेत. अमेरिका हे मानवधिकाराला प्राधान्य देणारं राष्ट्र आहे. शिवाय जनता ही सुशिक्षित आहे. त्यामुळे बदल तर निश्चितच होता. बघूया भारततील विद्वान जनता यातून काय शिकते ते. 


डॉ. ह. नि. सोनकांबळे 

फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे अभ्यासक






No comments:

Post a Comment