पदवीधर /शिक्षक निवडणूक : मतदान कसे करावे?
Graduate/Teacher Election: How to Vote?
सध्या महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत उमेदवार आणि मतदार हे दोन्ही केवळ शिक्षित नाहीत तर उच्चशिक्षित आहेत. असे असले तरी मतदान करताना या उच्चशिक्षित मतदारांकडून देखील चुका होत असतात. मतदान कसे करावे हे माहीत नसल्यामुळे व कोणाला विचारल्यास आपला अपमान होईल अशा विविध कारणांमुळे मतदान बाद होण्याचे प्रमाण ज्यास्त असते. ही निवडणूक प्रक्रिया नेहमीच्या इतर निवडणुका पेक्षा वेगळी आणि किचकट असल्याचे अनेकांना वाटते. म्हणूनच ही मतदानाची आणि मतमोजणीची पद्धती बदलली पाहिजे असे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु संविधान सभेत देखील पसंती क्रमांका नुसारच निवडणुका व्हाव्यात यावर चर्चा झाली होती. पण त्यावेळेस मतदार हा पुरेसा प्रगल्भ नसल्याने ही पद्धती लागू करण्यात आली नाही. जोपर्यंत मतदार प्रकल्प होणार नाही तोपर्यंत सध्या सुरू असलेली मतदान प्रक्रिया पुढेही सुरू राहावी असे सांगण्यात आले. ही निवडणूक प्रगल्भ असलेल्या उच्च शिक्षितांची असल्यामुळे या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसारच निवडणूका घेतल्या जातात. या पद्धतीला एकल संक्रामक मत पद्धती किंवा यालाच सिंगल ट्रान्सफरेबल व्होट असे देखील म्हटले जाते.
ही निवडणूक उच्चशिक्षित वर्गाची असल्यामुळे आपण ती समजून घेऊन पार पाडणे देखील आवश्यक आहे. या निवडणुकीत आपले मतदान बाद होऊ नये म्हणून काही नियमाकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे.
1. या निवडणुकीत ईव्हीएम मशीन नसल्यामुळे इथे मतदान करत असताना मतपत्रिका आपल्या हाती दिली जाते परंतु त्यावर देखील ठप्पा मारण्याऐवजी आपल्याला पसंतीक्रम नोंदवावे लागतात.
2. उमेदवाराच्या नावासमोर दिलेल्या योग्य जागी 1,2,3,4 असे पसंतीक्रम द्यावे लागतात हे पसंतीक्रम किती उमेदवारांना द्यावे हे बंधनकारक नाही. आपण 1 पासून जेवढे उमेदवार आहेत तेवढया उमेदवारांना पसंतीक्रम देऊ शकतो. समजा 20 उमेदवार असतील तर आपण वीस ही उमेदवारांना 1, 2, 3, 4, 5, असे 20 पर्यंत पसंतीक्रम देऊ शकतो. आपल्याला हे क्रम देत असताना अनुक्रमे द्यावे असे बंधनकारक नसते. आपल्याला जर 5 व्या क्रमांकाचा उमेदवार आवडत असेल तर त्याला 1 क्रमांक द्यावा, त्यानंतर 10 वा आवडत असेल तर त्याला 2 क्रमांक द्यावा असे आपण क्रमांक देऊ शकतो.
3. हे क्रमांक पुढील तीन पद्धती पैकी कोणत्याही एका पद्धतीने देता येतात.
1, 2, 3, 4, 5
I, II, III, IV, V
१,२,३,४,५
4. एका उमेदवाराच्या नावासमोर एकच पसंतीक्रम नोंदवायचा असतो.
5. मतदान करायला जात असताना आपल्याला सोबत पेन बाळगणे आवश्यक नाही. कारण तिथे जो पेन पुरवलेला असतो त्याच पेनाने पसंतीक्रम लिहायचे असतात.
6. मतपत्रिकेवर आपले नाव, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा कोठेही देण्याची आवश्यकता नाही.
मतदान केंव्हा बाद होते?
1. मतदान करण्यासाठी स्वतःचा पेन वापरल्यास आपले मतदान बाद होऊ शकते. त्यामुळे मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेल्या पेनचाच वापर करावा.
2.मतदान करत असताना एक, दोन, तीन, चार, पाच असे मराठीत पसंतीक्रम दिल्यावर सुद्धा किंवा वन, टू, थ्री, फोर, फाईव्ह असे इंग्रजीतून पसंतीक्रम दिल्यावर सुद्धा आपले मतदान बाद होऊ शकते.
3. आपण जर पसंतीक्रम देत असताना पहिल्या क्रमांकाचा पसंतीक्रम दिला नसेल तर आपले मतदान बाद होऊ शकते.
4. मतपत्रिकेवर पसंतीक्रम देत असताना उमेदवाराच्या नावासमोर ✔ किंवा X अशा खुणा केल्यावर देखील आपले मतदान बाद होऊ शकते.
5. मतपत्रिकेवर आपण कोणती खून दर्शविली असल्यास किंवा आपले नाव, आपली सही असा काही प्रकार केल्यास आपली मतदान होऊ शकते.
उपरोक्त सर्व प्रकारची काळजी घेऊन मतदान केले तर आपले मतदान बाद होत नाही. ही निवडणूक उच्चशिक्षित वर्गाची असल्यामुळे आपल्याकडून चुका न होऊ देता आपण मतदान केले पाहिजे. या निवडणुकीत एका- एका मताला प्रचंड महत्त्व असते हे लक्षात घेऊन आपण मतदान करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत आपण सकारात्मक व उत्साहाने सहभागी होऊन मतदान करावे व लोकशाहीला बळकट करावे.
आपल्या मित्रपरिवारात कोणी नवीन मतदार असतील तर आपण त्यांना हे नियम समजावून सांगावेत किंवा त्यांना फॉरवर्ड करावेत ही विनंती.
डॉ. ह. नि. सोनकांबळे
#पदवीधर_शिक्षक_निवडणूक_मतदान_कसे_करावे?
No comments:
Post a Comment