अमेरिका-इंग्लंड-भारतीय संविधान आणि स्त्रिया
डॉ. ह. नि. सोनकांबळे
जगाची महासत्ता म्हणून ओळखल्याजाणाऱ्या अमेरिकेने महिलांच्या अनेक आंदोलनानंतर 1920 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार दिला. भारतातील महिलांना तो सहजासहजी प्राप्त झाला. आणि लवकरच इंदिरा गांधी यांच्या रूपाने जनतेने देशाला स्त्री पंतप्रधान तर प्रतिभाताई पाटील आणि द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने राष्ट्रपती देखील दिले. अमेरिकेत मात्र अजूनही स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला नाही स्त्री देशाचा कारभार सांभाळू शकत नाही ही अमेरिकणांची भावना आजही बदलली नाही. म्हणूनच स्त्रियांविषयी वाईट बोलणारा डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष चालेल पण स्त्री नको या भावनेतून हिलरी क्लिंटन यांचा पराभव झाला. कदाचित या देशाचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहले नसते तर भारतातल्या स्त्रियांकडे पाहण्याचा प्राचीन दृष्टीकोन तसाच राहिला असता आणि इंदिरा गांधी कधीच पंतप्रधान तर प्रतिभाताई पाटील आणि द्रौपदी मुर्मू कधीच राष्ट्रपती झाल्या नसत्या.
ज्या देशात स्त्रियांना मतदानाचा अधिकार तर सोडाच घराचा उंबराही ओलांडता येत नव्हता त्या देशाने एकेदिवशी आपल्या देशाची स्त्री पंतप्रधान आणि राष्ट्रपती होईल असे स्वप्न तरी पाहावे का? ज्याने कोणी असे स्वप्न पाहिले असेल त्यालाच लोक वेड्यात काढतील. लोकशाहीची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लड आणि "सर्व माणसे जन्मतःच समान आणि स्वतंत्र आहेत" असे म्हणून राष्ट्राची घटना तयार करणारी अमेरिका या देशालाही स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी 200 वर्षाहून अधिक काळ वाट बघावी लागली.
जर अशी बलाढ्य आणि आधुनिक शमली जाणारी राष्ट्रे स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी शेकडो वर्षे विचार करत असतील तर भारतासारख्या देशाने तर याचा विचार तर सोडाच स्वप्न देखील पाहणे गुन्हा होते. पण भारतीय संविधानाने शेकडो वर्षे गुलामीत असलेल्या स्त्रियांची बंधने तोडून टाकली, आणि तुम्ही देखील या देशाचा राज्यकारभार करू शकता असे ठणकावून सांगितले. चुलीपुढे नाकापर्यंत पदर घेऊन जाळ फुंकणाऱ्या स्त्रियांना थेट सत्तेच्या चाव्या देण्याची लढाईच सुरु झाली आणि देशाला फक्त कारभारीच असू शकतो हि अडीच हजार वर्षाची परंपरा मोडून देशाला "कारभारीन" देखील असू शकते हे संविधान निर्मात्यांनी दाखवून दिले.
इंग्लड देशाने जगाला लोकशाही दिली आणि तो लोकशाहीची जननी झाला पण त्यांही देशाने स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी तीन दशकाहून अधिक वेळ लावला आणि शेवटी 1928 मध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला. याच दरम्यान भारतात भावी भारताची राज्यघटना कशी असावी याची चर्चा इंग्लड पासून भारतापर्यंत होती. याच्या 8 वर्ष आगोदर All Men are born free and equal चे सूत्र घेऊन आपल्या देशाची राज्यघटना तयार करणाऱ्या अमेरिकेने स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला.
1776 ला अमेरिकेने हे All Men are born free and equal सूत्र घेऊन राज्यघटना स्वीकारली पण स्त्रियांना मात्र मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले. 1848 च्या दरम्यान अमेरिका आणि इंग्लंड मध्ये स्त्रियांनी अधिकाराची लढाई सुरू केली. आम्हालाही मतदानाचा अधिकार असला पाहिजे या मागणीसाठी स्त्रिया रस्त्यावर उतरू लागल्या.
प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयात पुन्हा All Men are born free and equal चे सूत्र मांडून स्त्रियांनी मतदानाचा अधिकर मागण्यास सुरुवात केली. जर राज्यघटनाच सर्वाना समान मानत असेल तर आम्हाला वंचित का ठेवण्यात आले? असा प्रश्न न्यायालयात उपस्थित केला गेला. न्यायालयाने एक मजेशिर निकाल दिला आणि सांगितले Men चा अर्थ Women असा होत नाही. त्यामुळे महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
Men चा अर्थ स्पष्टच होता. त्यामुळे स्त्रियांना मतदानाचा अधिकार द्यायचा असेल तर घटनादुरुस्ती करावी लागेल आणि Men ऐवजी Person असा शब्द वापरावा लागेल असे निश्चित झाले. प्रकरण घटनादुरुस्ती पर्यंत आले. पण दुरुस्ती काही झाली नाही. शेवटी Men चा अर्थ लावता लावता 1920 साल उजाडलं आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला गेला. राज्यघटना 1776 ला स्वीकारली गेली. स्त्रियांचे आंदोलन 1848 पासून सुरु झाले आणि शेवटी 1920 मध्ये निकाल लागला.
इंग्लंड आणि अमेरिका या देशांनी मतदानाचा अधिकार देण्यापूर्वीच भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समतेची लढाई लढत होते. 1919 चा कायदा भारतात आला तेव्हापासून 1947 पर्यंत मतदानाचा अधिकार एका विशिष्ट वर्गाला होता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मान्यच नव्हते. 1920 च्या माणगाव परिषदेपासून ते 1927 च्या महाड चवदार तळ्याच्या सत्यगृहापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकच गोष्ट अधोरेखित करत होते. "सर्व माणसे जन्मापासून समान आणि स्वतंत्र आहेत." स्त्री- पुरुष आणि माणसामांणसात भेद करणारी संस्कृती मला मान्य नाही असे म्हणून त्यांनी "मनुस्मृती"चे दहन केले आणि समतेची बीजे पेरायला सुरुवात केली. 1927 ला सायमन कमिशन भारतात आल्यावर आणि पुढे गोलमेज परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच तत्वाने लढत राहिले. शेवटी जेव्हा राज्यघटना तयार करण्याची संधी त्यांना मिळाली तेव्हा त्यांनी हीच तत्वे भारताच्या संविधानात समाविष्ट केली. भारतीय संविधानाच्या कलम 324 मध्ये प्रौढ मताधिकाराची तरतूद त्यांनी केली.
इंग्लड आणि अमेरिकेप्रमाणे स्त्रियांनी मतदानाच्या अधिकारासाठी कोणतीही लढाई लढली नाही. केवळ कर भरणारे, जमीनदार आणि सुशिक्षितांनाच मिळणारा मतदानाचा अधिकार सर्वाना बहाल केला. जर इंग्लड, अमेरिकेप्रमाणे आपणही मतदानाच्या अधिकारापासून स्त्रियांना वाचिंत ठेवले असते तर भारतात आजूनही स्त्रियांनी मतदानाचा अधिकार मागण्यासाठी मोर्चे काढले नसते हे मात्र निश्चित आहे. कारण तेव्हा देखील स्त्रियांना मतदानाचा अधिकारच काय कोणतेही अधिकार नको होते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी "हिंदू कोड बिल" मांडल्यावर त्यांच्याच घरावर दिल्लीत स्त्रियांनी दगफेक केली. "आम्हाला अधिकार नको आमचा धर्म प्यारा आहे" असे या स्त्रिया रस्त्यावर येऊन सांगू लागल्या होत्या. कदाचित आजही ती मानसिकता बदलली नसती आणि स्त्रिया गुलामच राहिल्या असत्या. आजही जेव्हा आपण स्त्रियांच्या संसदेतील आरक्षण विधेयकाचा विचार करतो तेव्हा ते पेंडिंग ठेवले जाते आणि कोणत्याही स्त्रिया ते मंजूर करावे म्हणून आंदोलन करत नाहीत. तीच अवस्था मतदानाच्या अधिकाराची देखील झाली असती. आपल्या नवऱ्याला मतदानाचा अधिकार असताना आपल्याला त्याची काय गरज आहे याच भावनेने स्त्रिया जगल्या असत्या. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाची पावले ओळखली आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार बहाल केला.आज जरी इथल्या स्त्रिया धर्म निवडत असल्या तरी उद्या अधिकाराची भाषा बोलणार आहेत याच जाणीवेतून ते स्त्रियांच्या अधिकारासाठी भांडत राहिले. म्हणूनच इंदिरा गांधींना प्रधानमंत्री तर प्रतिभाताई पाटील आणि द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती होता आलं. अन्यथा त्यांना कधी स्वप्नही पडले नसते कि, आम्ही प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती होऊ शकतो.
कदाचित इंदिरा गांधींना, प्रतिभाताई पाटील आणि द्रौपदी मुर्मू यांना देशात स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आंदोलन उभे करावे लागले असते आणि मग प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती होण्याचा विचार करावा लागला असता. पण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इथल्या समाजात हि बीजे रोवली आणि इथल्या स्त्रियांचे मार्ग सुकर झाले.
लेखक : , एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर येथे राज्यशात्र व शासन विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.
डॉ. ह. नि. सोनकांबळे
फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचे अभ्यासक