अनुराधाची रिक्षा : संघर्षाची साथीदार
डॉ. ह. नि. सोनकांबळे
माझी खूप दग-दग होतेय!
हे वाक्य अनेक लोकांकडून ऐकायला मिळतंय. तिची पण धावपळ आणि दग-दग होत असेलच,पण चार मुलींच्या शिक्षणासाठी तिने रिक्षाचे स्टेरिंग हाती घेतलेय. ती नशिबाला आणि व्यवस्थेलाही दोष देत बसत नाही. ती लढतेय पण कधीच रडत नाही.
दै. महाराष्ट टाइम्स ने प्रकाशित केलेला अनुराधा यांच्या संघर्षावरील लेख.
प्राध्यापक, डाॅक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, ड्रायव्हर अशी प्रत्येक व्यक्तीला आपली एक ओळख असते. सामान्यतः ही ओळख त्यांच्या कर्तुत्वावरुन होत असते. जर एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या कर्तुत्वाची ओळख नसेल तर त्याची किमान ओळख त्याच्या वडीलांच्या नावाने, आईच्या नावाने होत असते आणि काही लोकांची ओळख तर सासु किंवा सासऱ्याच्या नावानेही होते. पण व्यक्ती नेहमी आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी सातत्याने संघर्ष करत असतो. यात पुरुषांना जितक्या सहजतेने आपली ओळख निर्माण करता येते तितक्या सहजतेने स्त्रियांना आपली स्वतंत्र ओळख निर्माण करता येत नाही हे वास्तव आहे. परंतु स्त्रियांच्या मनात ही घुसमट सातत्याने असते की, आपणही एखादी चांगली नोकरी मिळवून, व्यवसाय उभा करुन किंवा काही तरी नवीन करुन आपलीही समाजात एक स्वतंत्र ओळख निर्माण करावी आणि ओळख निर्माण करण्याच्या स्पर्धेत आपण स्वतःला एक अब्ज चाळीस कोटींच्या गर्दीत शोधत निघतो. मग प्रश्न पडतो. या गर्दीत माझे अस्तित्व काय? आणि माझ्याकडे जगावेगळं काय आहे? याचं उत्तर कदाचित अनुराधाला सापडलं असावं आणि म्हणूनच एक वेगळा व्यवसाय निवडण्याचे धाडस तिने केले आणि लातूरच्या गर्दीत तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
लातूर शहरातल्या साई नाक्यावरुन गंजगोलाईत जाण्यासाठी मी रिक्षाला हात दाखला आणि माझया समोर रिक्षा येउन उभी राहीली. रिक्षाच्या ड्रायव्हिंग सिटचा ताबा एका महिलेने घेतला होता. तीने सर कुठे जायचंय असा प्रश्न विचारला आणि मला कुठे जायचंय हे काही क्षणासाठी मी विसरुन गेलो. कारण एक महिला अशा गर्दीत रिक्षा चालवतेय याचं भान येण्यासाठी मला कोणीतरी चिमटा काढावा असे वाटले आणि मी याच भान हरवलेल्या अवस्थेत रिक्षात बसलो.
हेही वाचा
रिक्षा लातूरच्या गर्दीतुन मार्ग काढत जस-जसा पुढे जात होता तस-तसे काही प्रश्न माझ्या मनात निर्माण होत होते. अनुराधाला प्रश्न विचारावेत की नाही याचाही मी विचार करत होतो. कारण बोलण्या-बोलण्यात रिक्षा कुठे धडकली तर... याचीही भिती वाटत होती. पण ही भिती फक्त माझ्या मनात होती अनुराधाच्या मनात मात्र अजिबातच नव्हती. ती धाडसाने आणि काळजीपूर्वक रिक्षा चालवत होती. मी काही बोलणार इतक्यात पाठीमागून ‘मम्मी’ असा आवाज आला. बघतो तर काय, प्रवासी बसलेल्या शिटच्या मागे असलेल्या मोकळया जागेत अनुराधाची मुलगी बिस्किट खात बसली होती.
मी चर्चेला सुरुवात केली आणि अनुराधा रिक्षा चालवत अगदी सहजतेने बोलू लागली. मी विचारलेल्या सर्वच प्रश्नावर बोलताना अनुराधाने आपली संपुर्ण कहाणीच सांगीतली. ती म्हणाली, ‘ माझं मुळ गाव रेणापूर तालुक्यातलं खरोळा. माझे आई वडील मजुरी करायचे, मला त्यांनी दहावी पर्यंत शिकवलं. पुढचं शिक्षण देणं शक्य नाही असं लक्षात आल्यावर त्यांनी माझं लग्न लावून दिलं आणि मी सासरी हरंगुळ खु. ला रहायला आले. सासरी आल्यावर शिक्षण घेता येईल का याचा विचार माझ्या मनात होता पण परिवार मोठा असल्याने पुढे शिक्षणाची संधी मिळाली नाही. माझे सासु-सासरे आणि दिर सर्वजण मजुरी करायचे. मलाही बरीच वर्ष मजुरी करावी लागली. नंतर नवऱ्याने रिक्षा घेतली आणि ते रिक्षा चालवायला लागले. पुढे त्यांना एका शाळेवर स्कुल बस चालकाची नोकरी मिळाली.
अनुराधा चा परिवार
मी अनुराधा कडून तिच्या पतीचा मोबाईल नंबर मिळवला आणि दोन दिवसानंतर त्यांना फोन केला तेव्हा ते म्हणाले की, आम्हाला अक्षरा, अर्जीता, आरध्या आणि अमुल्या अशा चार मुली आहेत मुलगा नाही. मुलींना चांगलं शिक्षण देण्याचे आम्ही दोघांनी ठरवले आहे. त्यातल्या तीन मुली लातुरच्या नामांकित असलेल्या केशवराज विद्यालयात शिक्षण घेतात. सुरुवातीला त्यांना स्कुल बस किंवा रिक्षाने शाळेला पाठवावे लागायचे पण ते आम्हाला परवडत नव्हते. मी एका स्कुल बस वर ड्रायव्हर असल्याने घरी असलेली रिक्षा बसून होती. ती रिक्षा चालवणारे कोणीही नव्हते. मी अनुराधाला रिक्षा शिकवण्याचे ठरवले आणि तिनेही होकार दिला. एक महिन्यात ती चांगली रिक्षा चालवू लागली.
अनुराधाचे ड्रायव्हिंग लायसन काढण्याचा किस्सा सांगताना ते म्हणाले की, आम्ही तिचे लायसन काढण्यासाठी गेलो तेव्हा मी आरटीओ च्या भोये साहेब आणि पाटील साहेब या दोन अधिकाऱ्यांना रिक्षात बसण्याची विनंती केली आणि तुम्हाला जर योग्य वाटले तरच लायसन द्या असे सांगितले. अधिकाऱ्यांनी माझी विनंती मान्य केली आणि ते स्वतः रिक्षात बसले. ती पहिल्याच ट्रायल मध्ये पास झाली आणि तिला लायसन मिळाले. आज अनुराधा स्वतः मुलींना सकाळी शाळेत सोडते आणि शाळा सुटल्यावर घरी घेउन येते. मधल्या काळात ती शहरात रिक्षा चालवते. जेव्हा ती मजूरी करायची तेव्हा तीला शंभर ते दिडशे रुपये रोजगार मिळायचा आज ति दररोज तिनशे ते चारशे रुपये घेउन येते शिवाय मुलींना शाळेसाठी बस किंवा रिक्षाला द्यायच्या पैशातही बचत होते. दोघांच्या पैशातुन मुलींचे शिक्षण आणि घर खर्च भागतो. मागे काही शिल्लक राहील याची चिंता आम्ही सध्या तरी करत नाही. करण आम्हाला सध्या मुलींचे शिक्षण महत्वाचे आहे.
ग्रामीण भागातली एखादी महिला रिक्षा चालवते ही अचंबीत करणारी बाब आहे. लोक नावं ठेवतात का? असं विचारल्यावर दोघेही म्हणाले, ‘नाही आमचं गाव तसं खूप चांगलं आहे. उलट गावातले लोक अनुराधाच्या रिक्षातुन प्रवास करतात. गावचे लोक तिचं खूप कौतुक करतात. बऱ्याच दिवसांपासून अनुराधा रिक्षा चालवते. कोणी जाणते - अजाणते पणाने त्रास दिलाय असे कधी झाले नाही. घरी सासू-सासरे आणि दिर-भावजय यांचीही तिला चांगली साथ मिळते.
अनुराधाला आजही असं वाटतं आपण दहावी नंतरचं आपलं शिक्षण पुर्ण केलं पाहिजे. आई-वडीलांच्या गरीबीमुळे मला शिक्षण घेता आलं नाही याची खंत तिच्या मनात आहे. पण आपल्याला जोडीदार चांगला मिळाला याचा आनंदही अनुराधाच्या डोळयात दिसत होता. आता परिस्थिती थोडी बरी झाली आहे. नवऱ्याने रिक्षा चालवण्याची संधी आणि स्वातंत्र्य दिलं. इतकंच नाही तर त्यांनी स्वतः मला रिक्षा चालवायला शिकवला. आता पुढचं शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्यही त्यांनी मला दिलंय. आता मी माझं शिक्षण पुर्ण करण्याचा विचार करतेय. माझे पती, सासू, सासरे, दीर, भावजय, माझ्या मुली आणि गावचे सर्व लोक माझं कौतुक करत आले आहेत. त्यांच्या सहकार्याने आणि प्रोत्साहनाने पुढच्या शिक्षणातही मी नक्कीच पास होईन असा विश्वासही अनुराधाला आहे. याच विश्वासाने अनुराधाचा रिक्षा लातूरच्या ट्रॅफिक मध्ये सुसाट धावतोय तिच्या संघर्षाचा साथीदार बनून.
लेखक : औरंगाबाद येथे एमजीएम विद्यापीठाच्या राज्याशास्त्र व शासन विभागात सहाय्यक प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत.