Thursday, March 31, 2022

भारतीय लोकशाहीच्या मूल्यमापणाची चौकट व विरोधाभास



 भारतीय लोकशाहीच्या मूल्यमापणाची चौकट विरोधाभास

 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात डॉ. मोईन शाकीर व्याख्यानमाला (दि.18, 19 जाने. 2017) आयोजीत करण्यात आली होती. या व्याख्यानमालेत  सावित्रीबार्इ्र फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सुहास पळशीकर यांनी भारतीय लोकशाहीच्या मूल्यमापणाची चौकट व भारतीय लोकशाहीतील विरोधाभास या दोन विषयावर सलग दोन व्याख्याने दिली. त्याचा सारांष रुपाणे काही भाग देत आहोत.

    लेकशाहीत निवडणूका या सामान्य मानसाचे हत्यार असतात परंतु भारतात हे हात्यार सामान्य माणसाच्या हाती राहिले नाही. व्यक्तीष: सामान्य माणूस निवडणूक लढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर आजही नकारात्मक असून निवडणूक लढविण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो याचा विचार करुन सामान्य माणूस आजही प्रत्यक्ष निवणूक लढविण्यापासून दूर आहे. हे भारतीय लोकशाहीचे खरे अपयश आहे. आज भारताच्या लोकसभेत 36 राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत परंतु यापैकी सामान्य माणसातून निवडूण गेलेले किती लोक आहेत यावर देखिल विचार करणे गरजेचे आहे. सामान्य माणूस निवडणूकीच्या काळात मतदान करुन प्रतिनिधी निवडूण देतात आणि त्यांना स्वतःवर शासन करायला सांगतात. परंतु त्यांना निवडूण कशासाठी दिले आहे याचा विचार करुन त्याचा पाच वर्शातील हिशोब मात्र मागत नाहीत. राज्यघटनेने राज्याला दिलेली ताकद ही कल्याणकारी स्वरुपाची असते परंतु ती नेहमी लोकांच्या विरोधात जावून दमनकारी बनून नोकरशाही, पोलीस, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून ती लोकावर दबाव टाकत असते. म्हणून आजही लोकशाहीचे सामान्यीकरण झालेले दिसून येत नाही. लोकशाहीत सत्ता लोकांच्या हाती असतानाही लोक गरीब का आहेत? हा प्रश्न कोणी उपस्थित करत नाही. म्हणूनच गरीबी आणि लोकशाही यांनी एकत्र संसार थाटला आहे.

    आज अस्मितांच्या आधारावर समूह निर्माण होवून आमच्या समूहाच्या मागण्या या अंतीम आहेत असे प्रत्येकाला वाटू लागले आहे. त्यात आम्ही कसलीही तडजोड करणार नाही अशी भूमिका घेवून लोक सरकारच्या विरोधात रस्त्यावर येत आहेत. आणि यातून दोन समूह अस्मितांच्या आधारावर एकमेकांच्या विरोधात भांडत आहेत. गुजर समाजाचा मोर्चा खरे तर सरकारच्या विरोधात होता परंतु सरकार बाजूलाच राहिले आणि त्यांचा वाद मिना लोकांसोबत झाला. अस्मितांच्या आधारावर अशी भांडणे होणे लोकशाहीसाठी धोक्याचे असते. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे याचा विचार करत असताना या विविधता विषमता निर्माण करणारया आहेत का? याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे.

    बहुमताचे राज्य म्हणजे लोकशाही नाही ही गोषट देखिल आपण समजून घेणे गरजेचे आहे. तसे झाले तर ज्या राज्यात ज्या जातीची संख्या जास्त त्यांचा बोलबाला होवून बहुसंख्यांकवाद निर्माण होत असतो. भारतात अनेक राज्यात असे घडतही आले आहे. मिझोरम मध्ये मिझो लोकांचे, पंजाब मध्ये शिख लोकांचे, तामिळनाडू मध्ये तमीळ लोकांचे आणि महाराश्ट्रात आपल्या सगळयांना माहितच आहे. परंतु हा लोकशाहीतील विरोधाभास असून हा लोकशाहीसाठी धोक्याचा आहे.     भारतीय लोकशाहीत व्यक्तीपूजेचाही प्रश्न निर्माण होवू लागला आहे. परंतु व्यक्तीपूजा आणि लोकशाही एकत्र राहू शकत नाहीत. लोकसभेत आता विरोधक चांगलीच चर्चा करु लागले आहेत. अनेक प्रसंगी कामकाज दिवस दिवसभर बंद पडत आहे. यामूळे देशाचा पैसा आणि वेळ वाया जातो आहे असे अनेकांना वाटू लागले आहे. परंतू लोकशाहीत अशा टोकाच्या चर्चा होतच असतात. त्या मूल्यमापणाच्या चौकटीतून आपण बघायला हवे. आपल्या लोकप्रतिनीधींनी घेतलेले सर्व निर्णय योग्यच असतात असे म्हणता येत नाही. लोकशाहीत लोक सार्वभौम असल्याने लोकांनीच अशा निर्णयाचे मूल्यमापण करायचे असते. ज्या दिवषी या मूल्यमापणाला सुरुवात होईल त्या दिवषीच भारतात लोकशाही यशास्वी होईल.

    (शब्दांकन: डॉ. ह. नि. सोनकांबळे)

Saturday, March 19, 2022

मुख्यमंत्र्याला पराभूत करणारा गडी



 मुख्यमंत्र्याला पराभूत करणारा गडी

"माझे लोक विकासाने मागास आहेत विचाराने नाही!"

नुकत्याच पंजाबच्या निवडणूका पार पडल्या आणि आम आदमी पक्षाने बहुमताने सत्ता मिळवली. पण या सर्व निवडणूकांच्या धामधुमीत एक नवा चेहरा समोर आला तो म्हणजे लाभ सिंह उगोके. ज्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा पराभव केला. आणि सर्वांनाच प्रश्न  पडला की, हे लाभ सिंह उगोके आहेत तरी कोण?


 



शोध सुरु झाली तेव्हा असे लक्षात आले की, लाभ सिंह उगोके यांचा एक साधारण परिवार आहे आणि त्यांचे एक मोबाईल रिपेरिंगचे दुकान असून ते त्या दुकानात मोबईल दुरुस्तीचे काम करतात. शिवाय त्यांचा प्लबरींगचा डिप्लोमाही झालेला आहे. त्यांनी पंजाब पोलीस आणि आर्मीत भरती होण्याचेही प्रयत्न केले पण ते होउ शकले नाहीत. आज त्यांचे वय अवघे 35 वर्शे इतके आहे.



2013 मध्ये लाभ सिंह उगोके यांनी आम आदमी पक्षासोबत काम करायला सुरुवात केली. ते म्हणतात की, ‘मी एक कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करत होतो. मला कधी असे वाटलेही नव्हते की, मला पक्ष निवडणूकीत उतरवेल आणि मी निवडूण येईल. अनेकांचे म्हणने असे होते की, मी ज्या बरनाला जिल्हयाच्या भदौड भागातून उभा होतो. तो भाग अतिशय मागास आहे. तो पैस्यावर मतदान करतो. पण मी लोकांना हे सांगत होतो की, माझा मतदार संघ हा विकासाने जरी मागास असला तरी तो विचाराणे मागास नाही. तो विचार करुनच मतदान करेल.’ आणि झालेही तसेच. 

हेही वाचा

रोबोट आता निवडणूक लढवणार ? 

बाबासाहेबांच्या स्पर्शाने विहिरीचे सोने झाले  

दलित कुटुंबाच्या खात्यात थेट 10 लाख 

 
या निवडणूकीत लोकांनी विचारपूर्वक मतदान केले आणि लाभ सिंह उगोके यांना थोडयाफार नाही तर प्रचंड मतांनी विजयी केले. लाभ सिंह उगोके यांनी 37,000 मतांनी  पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा पराभव केला.

लाभ सिंह उगोके यांची आई
    लाभ सिंह उगोके यांची आईएक सफाई कामगार असून ती 1996 पासून एका शाळेत सफाई कामगार म्हणून नोकरी करते. मुलगा निवडूण आल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्या नियमितपणे शाळेत आणि शाळेची साफसफाई करतात. त्यांना केवळ 1000 रुपये वेतन मिळते. त्या म्हणतात मी हा झाडू कधीच सोडणार नाही. मी माझ काम करत राहीन आणि माझा मुलगा त्याचे काम करत राहील.


 



लाभ सिंह उगोके यांचे वडील
लाभ सिंह उगोके यांचे वडील एक ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत. ते म्हणतात की, यापूर्वी मला असे वाटत होते की, राजकारण हे श्रीमंतासाठी आहे. पण माझया मुलाने हा पायंडा मोडीत काढला असून राजकारण हे गरीबांसाठी देखिल आहे हे दाखवून दिले आहे.

लाभ सिंह उगोके यांची
पत्नी


    लाभ सिंह उगोके यांची पत्नी ही कपडे षिवण्याचे काम करते. त्या म्हणतात की, माझे पती जरी आमदार झाले असले तरी मी माझे काम करत राहीन. आमचे कुटुंब एक साधारण कुटुंब  असून त्यात कोणताही बदल होणार नाही. 



बदल होउ शकतो. बदलाचा विचार केला पाहिजे.
    

डॉ. ह. नि. सोनकांबळे




Saturday, March 5, 2022

"कडूतात्या"चे तुफान



कडूतात्याचे तुफान


"मी आंधळा असून सुद्धा,समाजातला अंधार मला दिसतोय, तुम्हला डोळे असूनही का दिसत नाही." 

कडूतात्या 


महाराष्ट्र शासनाच्या  सांस्कृतीक कार्य संचालनालयाने औरंगाबाद  येथे आयोजीत केलेल्या 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धेत 2 मार्च रोजी ‘कडूतात्या‘ हे नाटक पाहण्यात आलं. 40 हून अधिक पात्र असलेल्या या दोन अंकी नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन गणेश सुभाषराव मुंढे यांनी केले असून योगेश मच्छिंद्र घुगे यांची निर्मिती आहे.

    एकुणच हे नाटक एका ग्रामीण कथेवर आधारलेले आहे. नाटकाच्या उपशीषर्शकातच हे नाटक सामाजिक आणि विनोदी असल्याचे लेखकाने सांगून टाकले आहे. त्यामूळे हे नाटक ‘म्हातारपण आणि बालपण‘ हे सारखंच असतं याची जाणीव ठेवून मांडण्यात आले आहे. नाटकात असलेले संवाद हे अस्सल ग्रामीण असल्याने शहरातील लोकांना ते सहजासहजी रुचणारे नाही. पण ग्रामीण वास्तव मांडत असताना शहरी भाषेचा आव आणून ते मांडताही येत नाही हे सर्वच लेखकांना महित असतं. उदा. फॅंड्री या चित्रपटात जब्याचे नाव बदलून ‘जॅब’ असं ठेवलं असतं तर ग्रामीण भागातला जब्या आपल्या लक्षातच आला नसता. उगीच शहरी भागातील लोकांना आपल्या भाषेबद्दल काय वाटतं याचा विचार लेखकाने कधीच करु नये आणि तो करण्याचा प्रयत्न कडूतात्याच्या लेखकानेही केला नाही. त्यामूळेच संपूर्ण सभागृहाने कडूतात्या डोक्यावर घेतला.

    म्हातारपण आणि त्यात दृष्टी जाणे या दोन्ही समस्येवर मात करुन ग्रामीण भागात जीवन जगणाऱ्या 'कडूतात्या'चे दुःख लेखकाने कधी विनोदी तर कधी गंभीर स्वरुपात मांडले आहे. 'कडूतात्या' म्हातारा जरी असला तरी कडूतात्याचा आवाज म्हणजे एक तुफान असल्याचे जाणवते. शिवाय ग्रामीण भागात शौचालयाच्या असलेल्या अडचणी आणि त्यात दृष्टी नसलेला 'कडूतात्या' आपले ‘टंबरेल’ घेउन गावातल्या उकंडयावर बसतो आणि त्याची तक्रार घेउन उकंडयाची मालकीन तात्याच्या सुनकडे येते. हे चित्र शहरी भागातील लोकांना उमजणारे नसले तरी हे वास्तव आहे . हे ग्रामीण भागात फिरल्याशिवाय समजत नाही. असं म्हणतात की म्हातारपण नशिबाला येऊ नये आणि आलं तर काय होतं. हे दाखवत असताना नाटकात एक दोन ठिकाणी कडूतात्याचे धोतर सुटलेले दाखवले आहे. हे वास्तव शहरातले लोक नाकारतात. कारण त्यांचे म्हतारे हे वृद्धाश्रमात असतात. पण ग्रामीण भागात म्हताऱ्याची म्हातारी आणि चांगली असली तर सून या दोघीच म्हातारपण करतात. त्यामुळे ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळत. सरकारने हागणदारी मुक्तीची घोषणा केली असली तरी ती 100 टक्के झाली नाही हे मान्यच करावं लागतं. हि योजना आजून कडूतात्यापर्यंत पोहचली नाही. हे सांगण्याचे कामही लेखकाने केले आहे.  कडूतात्याची भूमिका ही स्वतः लेखकाने साकारलेली असल्याने आणि  नाटकाचा नायक कडूतात्याचे असल्याने नाटक  पूर्णपणे त्याच्या भोवतीच फिरते.

 हे नाटक दोन अंकी असले तरी हे पात्र कडूतात्या हे पत्र साकारत असताना या पत्रातली ग्रामीण ऊर्जा  तब्बल दोन तास आपल्यातली  कुठेच कमी पडू दिली नाही. खरे तर इतक्या स्पिडने हे पात्र साकारत असताना इतकी उर्जा टिकवून ठेवणे कोणत्याही कलाकारासाठी जीकरीचेच असते.

    कडूतात्याच्या पत्नीची भूमिका साकारणारी रुकमा हीने आपल्या भूमिकेचा कुठेही तोल जाउ दिला नाही. खरे कौतुक तर कडूतात्याच्या सुनेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे केले पाहिजे.  ग्रामीण सूनेची भूमिका साकारत असतानाच  अभिनयाबरोबरच अस्सल ग्रामीण भागातला आवाज सभागृहात घुमताना आपण एका खेडेगावातच आहोत असेच वाटते.

    नाटकातल्या सरपंचाच्या भूमिकेला देखिल अस्सल ग्रामीण लहेजा देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. ‘असेच निवडूण येत रहा आणि एक एक वावर इकत रहा’ असे पंच मारुन ग्रामीण भागातल्या राजकारणाचे वास्तव इथे मांडण्याचे प्रयत्न लेखकाने केले आहेत. शिवाय ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पन्नास-पन्नास रुपयाला मत विकले जाते. " एवढया पैशात तर कोणी उसात देखिल खुरपायला जात नाही". या  कडूतात्याच्या संवादातून आवल्याला संविधानाने दिलेल्या मताच्या मूल्यावर कठोर प्रहार  करण्याचे काम देखिल लेखकाने केले आहे.

    नाटकात वापरलेली अंध व्यक्तीची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने केलेल्या अभिनयाकडे बघितल्यावर असे वाटते की तो खरोखच अंध आहे. असे एकुण चाळीस पात्र एकत्रीत आणून या नाटकाला उभारण्याचे काम गणेश मुंडे आणि योगेश घुगे यांनी केले आहे. त्यामूळे ते कौतुकास पात्रच आहेत.

    नाटकात अशा अनेक जमेच्या बाजू असल्या तरी नाटकातील पात्रांची संख्या जास्त असल्याने संपूर्ण नाटकात बराच गोंधळ झाल्याचे वाटते. या गोंधळामुळे आणि साउंड सिस्टिम चांगली नसल्याने चांगले सवाद प्रेक्षकापर्यंत पोहचले नाहीत.(हा दोष आयोजकांचा आहे. शासनाने थोडे चांगले पैसे दिले असते तर चांगली साउंड सिस्टम आणि चांगले सभागृह मिळाले असते)  नाटकात डॉक्टरने केलेली भूमिका अतिरेकी वाटते तर नाटकात पात्रांची संख्या जास्त असल्याने अनेकांना संवादच नाहीत. ग्रामीण भागात असलेली लव्ह स्टोरी लेखकाने दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्यातील संवादाची प्रेक्षक वाट पाहताना दिसतात मात्र शेवटपर्यंत त्यांच्यात कोणताच संवाद होत नाही पण त्यांच्या हालचालीवर प्रेक्षक लक्ष ठेवून असल्याचे जाणवते. नाटकात "माझा झुला तुला घे तुझा झुला मला दे" हे गाणे आधूनमधून वापरण्यात आले आहे त्याचा एक दोन ठिकाणी ताळमेळ लागलेला दिसत नाही. पण यात वापरण्यात आलेले अभंग, गझल आणि याला सोबत असलेली ढोलकी आणि पेटीची साथ प्रेक्षकांना टाळया वाजवायला भाग पाडते. महत्वाचे म्हणजे या नाटकात आधुनमधून मंचावर येणारी हालगी नाटकातील पात्रांना आणि प्रेक्षकांना ठेका तर धरायला लावते.

    नाटकात आधुनमधून लिंक तुटल्याारखी वाटते पण पुन्हा लिंक जोडण्यासाठी लेखकाने आणि सर्वच कलाकारांनी प्रचंड मेहनत केलेली दिसते. नाटकात आलेले संवाद शहरी भागातील लोकांना पटत नसले तरी त्या संवादाशिवाय ग्रामीण भागातले जीवन आणि त्यांचे प्रश्न मांडलेच जावू शकत नाहीत. अगदी नामदेव ढसाळांना देखिल ते टाळता आले नाही आणि वास्तवाचे भान ठेवून लिहनाऱ्या कोणत्याही लेखकाला ते टाळता येणारही नाही.


डॉ. ह. नि. सोनकांबळे

(मी समीक्षक नाही, पण प्रेक्षक म्हणून मला काय वाटले हे लिहण्याचा प्रयत्न मी केला आहे.) 


तुम्हाला हे नाटक कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. 

Wednesday, September 8, 2021

सरकारची बतावणी - तमाशाहून चांगलीच



सरकारची बतावणी - तमाशाहून चांगलीच 


डॉ. ह. नि. सोनकांबळे 


प्रेक्षकांना हसवत खेळवत ‘तमाशा’ला पुढे सरकावणे या प्रकाराला ‘बतावणी’ असे म्हटले जाते. हाच प्रकार सध्या राजकारणात सुरु झाला आहे.  प्रेक्षकांना हसवत खेळवत, त्यांचे मनारंजन करत पाच वर्ष राज्य करणे याला ‘सरकार’ असे म्हणतात. तमाशात बतावणी ऐकताना जसे प्रेक्षक आपलं सगळं दुःख विसरुन जातात. तोच प्रकार सध्या आपल्यासोबत केला जातो आहे. सरकारमधले लोक रोज असा एक विषय आणतात आणि आपण आपले सर्व प्रश्न विसरुन जातो. 

केंद्रात सत्तेत असलेले लोक राज्याच्या सरकारवर सोबत बतावणी करतात तर राज्यात सत्तेत असलेले लोक केंद्रासोबत बतावणी करतात. तमाशाच्या बतावणीत एखा जोरदार पंच आलाच तर लोक टाळया आणि शिटया वाजवतात. तर केंद्र राज्य यांच्यातल्या बतावणीत पंच आलाच तर लोक सोशल मिडीयावर ‘दात’ काढतात. 

आपल्याला हसायला मिळालंय एवढयातच सध्या लोक समाधानी आहेत. काही दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर-अमोल मिटकरींनी मंच गाजवला, त्यानंतर नारायण राणे केंद्रात मंत्रीपद मिळवून महाराष्ट्रात आले आणि त्यांनी महाराष्ट्रात येवून जोरदार ‘बतावणी’ला सुरुवात केली. त्यांनी दरेकारांना ‘तु गप रे मध्ये बोलू नको’ असे म्हटले आणि पोटयांचे  आठ दिवस आनंदात गेले. त्यात पुढे लगेच अनिल परबांचा फोन मिडीयासमोर सुरु झाला आणि नारायण राणेंना अटक झाली की नाही हे बघण्यात पुन्हा पोटयांचे तीन दिवस गेले.  यात लगेच काल ‘किलीट सोमया’ ने उडी घेतली. आणि ‘लवकलच मुख्यमंत्ल्याच्या मागे ‘ईली’ लावू’ असे सांगून पुन्हा पोटयांच्या फेसबुकला रंग भरवला. आज पुन्हा ते झेड सुरक्षा घेउन अॅक्षन मध्ये आले आहेत. त्यांच्या सुरक्षेवर 60 लाख रुपये खर्च होणार आहे.

परवा करुणा ने परळीत येवून ‘कारुण्य’ दाखवले. पोट्टे  तिच्या गाडीच्या मागे पळून पळून थकले. मध्येच अॅट्राॅसिटी चा गुन्हा दाखल झाला. आज पोलीस करुणा शर्माच्या मुबईतल्या घरी गेलेत. तिकडे मोहन भागवतांनी ‘सर्व मुस्लिम हे हिंदू आहेत’ असे म्हटले तर दुसरीकडे शरद पवारांनी ‘त्यांच्या मुळे माझया ज्ञानात भर पडली’ असे सांगून रान हाणले. तर तिसरीकडे गुणवरत्न सदावर्तेंनी ‘दिलीप वळसे आणि शरद पवारांना अटक करा’ असी मागणी करुन चर्चेला नवे वळण दिले. 

दुसरीकडे आधुमधून कार्यक्रमात जाहीरात आल्यासारखे 12 अमदारांचा प्रश्न येतोच. परावा त्यातून राजू शेट्टीचे  नाव वगळल्याच्या बातम्या आल्या तर त्यावर सदाभाउ खोत, राजू शेट्टीला म्हणाले, ‘कशीला चालत जा आणि माझी काशि झाली म्हणून सांगण.’

हा सर्व प्रकार बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की, तमाशातल्या बतावणीत आणि सरकारच्या बतवाणीत काहीच फरक नाही. तिथेही लोक आपले दुःख, प्रश्न विसरुन जातात आणि शिटया वाजवतात टोप्या उडवतात. इथेही लोक गॅस दरवाढ, पेट्रोल दरवाढ, बेकारीत होणारी वाढ, भरतीप्रक्रियेचा प्रश्न हे सर्व दुःख, प्रश्न विसरुन चालले आहेत. गेली एक महिन्यापासून उच्च शिक्षीत मुले नोकर भरती प्रक्रिया सुरु करा म्हणून पुण्यात उपोषणाला बसलेत. तिकडे कोणीच फिरकत नाही. मात्र 12 आमदारांची निवड प्रक्रिया रखडली म्हणून डझनावर नेते राज्यपालांना भेटायला जातात. तरीही आम्हाला आनंद आहे की, आम्ही लोकशाहीत आहोत. 

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. भाजप चे सरकार देशात आहे. आनंदच आनंद आहे. कोरानामूळे नाटयगृह, तमाशे बंद असले म्हणून काय झालं. तुमच्या मनोरंजनात तीळमात्र कमतरता आलेली नाही. दोन्ही सरकारे खूप चांगली आहेत. फक्त आनंद घेता आला पाहिजे. ज्यांना या सर्व गोष्टींचा आनंद घेता येत नाही ते सर्व देशद्रोही आहेत आणि ज्यांना घेता येतो ते सर्व लोकशाहीवर प्रेम करणारे आहेत. 

ज्यांना यातलं काहीच कळत नाही किंवा देणंघेणं नाही. त्यांच्यासाठी सरकारची नवी स्किम ‘लाईक, काॅमेंट, शेअर आणि सब्सक्राईब’ उपलब्धच आहे. कोणतेही चार्जेस नाहीत. त्यामूळे ‘बतावणी’ला जनतेचा जोरदार प्रतिसाद तर मिळणारच आहे. कारण ही सरकारची बतावणी आहे, जी तमाशाहून चांगली आहे.

Thursday, August 19, 2021

प्रत्येकालाच जमायला हवे "नात्यांचे सर्व्हिसिंग"

 


जिथे ‘अर्थ’ (पैसा) आहे तिथे ‘स्वार्थ’ आहे आणि जिथे ‘स्वार्थ’ आहे तिथे ‘नाते’ कधीच टिकून राहत नाहीत हा प्राचिन इतिहास आहे. म्हणूनच प्रसिद्ध राजकीय चिंतक मॅकिव्हली असे म्हणाला होता की, ‘लोक एकवेळेस आपल्या बापाचा मृत्यू विसरतील पण पैसा विसरत नाहीत.’ थाॅमस हाॅब्ज या विचारवंताने देखिल त्याच्या ‘लेवियथान’ या ग्रंथात मनुष्यस्वभाव हिंस्र, दांभाीक आणि स्वार्थी असल्याचे स्पष्टपणे सांगीतले.  जस-जसा काळ बदलला तस-तसे माणसांचे स्वभाव, नाते, संबंध सर्वच बदलत गेले पण माणूस आणि पैसा यांच्यातले संबंध म्हणावे तेवढे बदलले नाहीत. बदललेही असले तरी ते सैल स्वार्थी पणाकडून घट्ट स्वार्थी पणाकडे गेले असतील. पण यात काही अपवाद असेही आहेत की, ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आला पण स्वभाव मात्र स्वार्था कडून परमार्थाकडे गेला. यात विश्वास ठाकूर यांचे नाव आजच्या काळात अग्रक्रमाने घ्यावे लागेल. नुकताच त्यांचा ‘नात्यांचे सव्र्हिसिंग’ हा कथा संग्रह प्रकाशित झाला असून त्यांच्या या कथासंग्रहात त्यांचा हा स्वभाव पडद्यामागे असल्याचे दिसत. कारण त्यांनी एकाही कथेमध्ये  ‘मी’ किती श्रेष्ठ आहे असे दाखवून दिले नाही. 

पैसा हा आहेरे वर्गाचा धर्म आहे. ज्याचे तत्वज्ञान हे ‘भेदाभेद’ आहे. पण एका बॅंकेचे विश्वस्त (मालक) असूनही विश्वास ठाकूर या तत्वापासून कोसो दूर राहिल्याचे त्यांच्या या कथासंग्रहातून दिसून येते. कार्ल मार्क्स म्हणाला होता की, भांडवलदार आणि कामगार यांच्यात नेहमीच संघर्ष राहिला आहे. पण मार्क्सचे हे तत्वज्ञानही विश्वास ठाकूर यांनी मोडीत काढल्याचे दिसते. त्यांच्या या कथासंग्रहात जिथे-जिथे बॅंकेच्या कर्मचार्यांचे संदर्भ आले आहेत तिथे-तिथे मालक आणि कामगार असा संबंध कुठेच प्रदर्शीत होत नाही. एका बॅंकेेचे मालक असूनही त्यांनी जो कर्मचारी आणि जनतेचा जिव्हाळा जपला आहे त्यातून एक वेगळाच मनुष्यस्वभाव पुढे येताना दिसतो आहे. त्यांच्या संपर्कात  सर्वच लोक चांगले (निस्वार्थी) आले आहेत असे नाही. पण ते जरी तसे असले तरी त्यांच्या स्वभावात देखिल बदल होईल या आपेक्षेने विश्वास ठाकूर यांनी त्यांच्यातील स्वभावाचेही ‘सर्व्हिसिंग’ करुन नाते जोडण्याचे धाडस  केले आहे. 

खरे तर अनुभव कथन करणे ही तशी अवघड बाब असते. एखादे वेळी माणूस सोयरीक, लग्न, पर्यटन अशा ठिकाणचे अनुभव कथन करु शकतो. पण जिथे रोज आर्थिक व्यवहार घडत होतेे अशा ठिकाणचे अनुभव कथन करण्यासाठी मोठे धाडस लागते. हे धाडस विश्वास ठाकूर यांनी दाखवले आहे. त्यांनी कथन केलेले अनुभव हे फक्त निस्वार्थी लोक भेटले अशा अशयाचे नाही तर सर्वच प्रकारच्या लोकांचा संबंध आल्याचे वास्तव त्यांनी मांडले आहे. हे सांगत असताना अनेकांच्या ‘नात्यांचे सव्र्हिसिंग’ करता आले नाही याचे दुःखही त्यांनी मांडले आहे. 

विश्वास ठाकूर यांचा हा कथसंग्रह वाचल्यानंतर एक महत्वाची बाब लक्षात येते ती म्हणजे, त्यांना नात्याचा भागाकार आणि वजाबाकी कधीच जमली नाही. त्यांनी केवळ नात्यांची बेरीज आणि गुणाकार केला आहे. या साठी त्यांनी ‘सर्व्हीसिंग’चे जे सूत्र वापरले आहे ते वाचकांना या कथासंग्रहात भावल्याशिवाय राहत नाही. खरे तर ही मेथड आपल्या प्रत्येकालाच जमली पाहिजे. या कथा वाचल्यानंतर वाचकांचा हाच प्रयत्न राहणार आहे की, आपणही ही ‘सर्व्हिसिंग’ची मेथड आपल्या आयुष्यात वापरली तर नात्यांची कुठेच कमतरता भासणार नाही. आज तंत्रज्ञानाने जग जवळ आले असले तरी आपल्या बाजूला बसलेल्या माणसाशी आपला संवाद होत नाही. आपल्या कुटंुबात आपण एकमेकांच्या बाजूला बसून जेवण करत असलो तरी संवाद होत नाही. या काळात खरेच आपल्या प्रत्येक ‘नात्याचे सर्व्हिसिंग’ झाले पाहिजे त्यासाठी हा कथासंग्रह ‘नात्यावर’ प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. 

विश्वास ठाकूर यांचा हा पहिलाच कथासंग्रह आहे असे वाचताना कुठेच जाणवत नाही. त्यांची भाषा, संवादशैली, मांडणी एखाद्या जेष्ट लेखकाची वाटते. या कथासंग्रहात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या सर्वच कथा आल्या नसल्या तरी येणाऱ्या काळात ते पुन्हा एखादा कथासंग्रह वाचकांसाठी घेवून येतील अशी अपेक्षा आहे. त्यांच्या भावी लेखनास मनःपुर्वक शुभेच्छा!



आपला नम्र, 

डाॅ. ह. नि. सोनकांबळे

राज्यशास्त्र विभाग, 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद 

मो. नं. 9403973043 / 23

Wednesday, July 21, 2021

सिद्धार्थ गोदाम: चळवळीचं महाकव्हरेज




सिद्धार्थ गोदाम: चळवळीचं महाकव्हरेज 

@डॉ. ह. नि.  सोनकांबळे

दुष्काळ पडला म्हणून आपली जनावरे विकायला घेवून जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करणारा ‘मला विकू नका’ या विशेष शो साठी मागच्या वर्षी सिद्धार्थ गोदाम यांना राष्ट्रीय पातळवरील इएनबीए पुरस्कार मिळाला. याही वर्षी पुन्हा दुसऱ्यांदा हाच पुरस्कार त्यांना ‘बेस्ट करंट अफेयर्स’ विभागातून  प्रप्त झाला आणि काल पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने दिला जाणारा 2020 चा राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार त्यांना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

असं म्हणतात की, ‘तुम्हाला जर जगाच्या हृदयाजवळ जायचं असेल तर पत्रकार बनने हा एकमेव मार्ग आहे.’ पण हल्ली असे खूप कमी पत्रकार आहेत जे लोकांच्या हृदयाजवळ पोहचतात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली लेखणी झिजवतात. खरे तर पत्रकारीतेच्या अभ्यासक्रमातूनच हा धडा वगळण्यात आला आहे. पत्रकारीता म्हणजे प्युअर बिझनेस होवून बसला आहे. अभ्यासक्रमात देखिल जाहीरात कशी मिळवायची, कोणत्या बातमीला जास्त महत्व द्यायचं, पेड न्यूज कशा छापायच्या, कोणत्या बातमीतून जास्त बिझनेस मिळू शकतो, जे लोक आपल्याला जास्त बिझनेस देतात त्यांनाच कसे कव्हरेज द्यायचे, याचेच धडे प्रामुख्याने दिले जातात. परंतु अशा काळात देखिल एक दिलासादायक चित्र म्हणजे काही पत्रकार या सर्व वातारणापासून दूर आहेत. याच यादीत एक नाव घ्यावं लागेल ते म्हणजे, आयबीएन 18 लोकामत चे पत्रकार, मराठवाडा ब्युरो चिफ सिद्धार्थ गोदाम यांचं.  

एरवी पत्रकारीतेचं माईक हातात घेवून लांबलचक बडबड करण्यात अनेक पत्रकारांचा वेळ जातो. परंतु ‘मी जास्त बोलण्यापेक्षा चला थेट परिस्थितीतच दाखतो’ हेच सूत्र सिद्धार्थ गोदाम यांच्या पत्रकारीतेचं राहिलं आहे आणि म्हणूनच ते आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून लोकांच्या हृदयाजवळ पोहचले. चळवळी, आंदोलने, मोर्चे, शेतकरी आत्महत्या, विद्याथ्र्यांचे प्रश्न अशा विविध प्रश्नावरचा त्यांचा अभ्यास आणि त्याचे रिपोर्टींग करण्याची शैली इतरांपेक्षा निराळीच. काही दिवसापूर्वी परभणीच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. जवळपास सर्वच वर्तमानपत्रांनी ती बातमी एक किंवा दोन काॅलमपेक्षा जास्त छापली नाही. त्यामूळे सर्वांनीच या बातमीकडे एक साधारण घटना म्हणून बघितले. परंतु याचं रिपोर्टींग जेव्हा सिद्धार्थ गोदाम यांनी न्यूज 18 लोकमत ला केलं तेव्हा यातली दाहकता शासन, प्रशासन व जनतेच्या लक्षात आली. त्या शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती प्रचंड हालाखीची असल्याचे महाराष्ट्राच्या लक्षात आले. दोन्ही कानाचे आॅपरेशन झालेली शेतकऱ्याची पत्नी, कापूस वेचायला जावून शिक्षण घेणारी मूलगी आणि इतर लहान भावंडं असा त्याचा परिवार. खरे तर अशा कुटंुबांना न्याय देणारी पत्रकारीता सध्या लोप पावताना दिसते आहे. 

अशाच अनेक कुटंुबातून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ येतात. तसे तर हे विद्यापीठ ग्रामीण महाराष्ट्रातल्या शेतक$यांच्या मुलांचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. या विद्यापीठात येणारे अनेक विद्यार्थी हे शेतकरी आणि शेतमजूर कुटंुबातून येत असल्याने त्यांच्या समोर अनेक प्रश्न असतात. हे प्रश्न प्रशासनाच्या आणि शासनाच्या दरबारी मांडून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक वेळा त्यांची पत्रकारीता कामी आल्याचे पहायला मिळाले. विद्यापीठात होणारे विद्यार्थी संघटनांचे आंदोलने, त्यांच्या मागण्यांना मिळणारे यश यात सिद्धार्थ गोदाम यांच्या योगदानाला बघावंच लागतं. कारण इतर कुठल्याही बतम्यांपेक्षा त्यांचा ओढा मोर्चे, आंदोलने व चळवळीच्या बातम्या देण्यावर आणि मागण्या लाावून धरण्यावर राहिला आहे. 


विद्यापीठात आणि मराठवाडयात कोणत्याही संघटनांचे मोर्चे असोत की, मागील काही वर्षापासून सुरु असलेले मराठा क्रांती मोर्चे, बहुजन क्रांती मोर्चे, ओबीसी मोर्चे व धनगर समाजाचे मोर्चे असोत या सर्वच मोर्चांना त्यांनी दिलेले कव्हरेज कुठेही एका बाजूला झुकलेले दिसले नाही. त्यांची पत्रकारीता कोणत्याही एखाद्या संघटनेला, राजकीय पक्षाला किंवा जात समुदायाला अतिरिक्त महत्व देताना दिसत नाही. कोणत्याही संघटनेपेक्षा, पक्षापेक्षा किंवा जात समुदायापेक्षा त्यांच्या मागण्या आणि सर्वच समुहाला त्याच्यापासून होणारा फायदा यावर त्यांची पत्रकरीता प्रकाश टाकताना दिसते. 

खरे तर त्यांची माझी प्रत्यक्षात भेट कधी झाली नाही किंवा त्यांचा माझा परिचय देखिल नाही. परंतु खऱ्या पत्रकाराची ओळख ही त्याची लेखणी आणि त्यातून लिहली जाणारी बातमीच असते. बातमीला रंगवण्यापेक्षा त्या बातमीतले वास्तव दाखविणे आणि त्याचे योग्य परिणाम शासन आणि प्रशासनावर होणे हीच खरी पत्रकारांची ओळख असते. 

सिद्धार्थ गोदाम यांनी त्यांची ओळख त्यांच्या पत्रकारीतेतून निर्माण केली आहे. म्हणूनच त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने दिला जाणारा 2020 चा राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

यापूढेही त्यांची लेखणी समता, स्वातंत्रय, बंधुभाव आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी व त्यासाठी लढणाऱ्या चळवळींसाठी ‘महाकव्हरेज’ ठरेल यात शंकाच नाही. त्यांना हा पुरस्कार देवून मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहार संघाने एका उत्कृष्ठ, धडाडीच्या पत्रकाराचे मनोबल वाढवले त्याबददल संघाचे व पुरस्कार मिळाल्याबददल सिद्धार्थ गोदाम यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस सम्यक सदिच्छा !

Monday, July 12, 2021

सामाजिक न्याय विभागाला महापुरुषांच्या जयंतीचाही विसर


सामाजिक न्याय विभागाला महापुरुषांच्या जयंतीचाही विसर

डॉ. ह. नि. सोनकांबळे


काल परदेशातून एका मित्राचा फोन आला, म्हणाला, महाराष्ट्र शासनाने महापुरुषांच्या जयंत्यावर बंदी आणली की काय? मी म्हटलं नाही रे. तर म्हणाला, संकेतस्थळावर कोणत्याही महापुरुषांच्या जयंतीचा फोटो दिसत नाही. 


लागलीच संकेतस्थळावर जाऊन बघितलं तर खरंच तिथे काहीच नाही. 


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामाजिक न्याय हे महत्वाचे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आले. हे खाते त्यांच्याकडे देण्यामागचा उददेश बोलून दाखवत असताना शरद पवार म्हणाले होते की, ते खूप अॅक्टीव्ह असल्याने तेच हे खाते चांगले सांभाळू शकतील. या खात्याचा पदभार स्विकारल्यानंतर धनंजय मुुंडे यांनी काही महिने आपल्या कार्याचा ‘कार्यअहवाल’ देखिल शरद पवार, सुप्रिया सुळे यांना सादर केला आणि हा अॅक्टीव्हनेस काही दिवसातच बंद सुद्धा झाला. आता तुम्ही म्हणाल या नंतर कोरोना आला आणि धनंजय मुंडे यांनाही झाला. पण प्रश्न असा आहे की, काय त्यांच्या संकेतस्थळालाही कोरोना झाला होता का? कारण त्यानंतर हे संकेतस्थळ ऍक्टिव्ह झालेच नाही. 



महत्वाची गोष्ट म्हणजे या खात्याच्या संकेतस्थळावर गेल्यावर आपल्याला असे दिसेल की मा. धनंजय मुंडे खरंेच किती अॅक्टीव्ह आहेत. या खात्याचा पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी आपले सर्वांचे फाटो तत्काळ अपलोड करुन घेतले. यात मा. मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे, स्वतः धनंजय मुंडे, राज्यमंत्री म्हणून असलेले विश्वजीत कदम आणि या खात्याचे प्रधान सचिव श्याम तांगडे यांच्या फोटोचा समावेश आहे. परंतु नंतर या संकेतस्थळावर 2019 पासून ना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा फोटो आला ना इतर कोणत्या महापुुरुषाच्या



आपण जर या संकेस्थळावर जाउन पाहिले तर असे दिसेल की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 127 व्या जयंतीचे फोटो इथे देण्यात आलेले आहेत. तेही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या काळातले आहेत. त्यानंतर या खात्याने कोणतेही फोटो अपलोड केलेले नाहीत. या संकेतस्थळावर गेल्यावर असे दिसते की, त्यानंतर या खात्याने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच साजरी केली नाही की काय? 


खरे तर या खात्याचे सकेतस्थळ महाराष्ट्रातच नाही तर भारतासह जगभरातील अनेक लोक हाताळत असतात, या संकेस्थळाला भेटही देत असतात. परंतु या मंत्र्यांना याचे काहीही सोयरसुतक नाही. 


या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर आपल्याला असे दिसेल की, इथे 127 व्या जयंतीचे काही फोटो आहेत तर देवेंद्र फडणविस यांच्या काळातलाच पुरस्कार वितरणाचा एक 3 मिनीटाचा व्हिडीओ इथे आहे. या व्यतिरिक्त इथे काहीही नाही. हो पण जयंतीच्या नावाने मात्र या खात्याने 2 कोटीहून (यात विविध प्रसारमा/यमांना दिलेल्या जाहीरातींचाही खर्चाचा समावेश आहे) अधिक खर्च केला आहे. परंतु याच जयंतीचे दोन फोटो टाकायला धनंजय मुंडे विसरले आहेत. 


शरद पवार यांनी निवडलेल्या या अॅक्टिव्ह मंत्र्यांला समजून घ्यायचे असेल तर सामाजिक न्याय विभागाच्या या संकेतस्थळाला एकदा नक्की भेट द्या. किंवा या ब्लाॅग पेज वर येणारी विशेष लेखमाला नक्की वाचा.


वास्तव जाणून घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या खालील संकेतस्थळाला भेट द्या. 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

Thursday, July 8, 2021

55 हजार भारतीय व परदेशी वाचकांचे आभार.

उजव्या बाजूला असलेल्या Follow या बटनावर नक्की क्लिक करा. 


#भारत

#अमेरिका #इंग्लंड सह 18 देशातून अधिक देशात असलेल्या 4000 मराठी वाचकांसह 55 हजार वाचकांनी ब्लॉग ला भेट दिली आहे. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! 






आपणही या लिंक वर 👇


drhanisonkamble.blogspot.com


जाऊन नक्की भेट द्या! या वाचक चळवळीत सहभागी व्हा! 🙏🙏🙏🙏🙏

Wednesday, July 7, 2021

१२ कोणी वाजवले ?



तरुणांचे १२ कोणी वाजवले ?

 डाॅ. ह. नि. सोनकांबळे

 

 

शरद पवार महाराष्ट्राला नवं वैभव प्राप्त करुन देतील अशी आपेक्षा अनेकांनी व्यक्त केली होती. उध्व ठाकरे चांगलं काम करत आहेत महाराष्ट्राला आता चांगले दिवस येतील असेही लाक सुरुवातीला म्हणत होते. पण सुरुवातीपासूनच 12 आमदार हा विषय विनाकारण चघळला गेला. आज पुन्हा नव्या 12 आमदारांचा प्रश्न  निर्माण झाला आहे आणि जनतेच्या आपेक्षांचेही 12 वाजले आहेत. या १२ आमदारामुळे महाराष्ट्राचे कोणते प्रश्न आडले आहेत. त्यांची नियुक्ती झाली नाही किंवा बडतर्फ केल्याने जनतेचे असे काय नुकसान झाले आहे. याचे ऊत्तर कोणालाच सापडत नाही. म्हणून लोक आता  12 मतीवर प्रश्न  उपस्थित करत आहेत.

नवं सरकार येईल आणि काही तरी नवं होईल. या जनतेच्या आणि तरुणांच्या आपेक्षेचा महाविकास आघाडी सरकारने आपेक्षाभंग केला आहे. 2014 पासून थांबलेली नोकरभरती सुरु होईल, पोर्टल मध्ये भ्रष्टाचार आहे तो बंद होईल, अनुशेष भरला जाईल आमच्या पोराला नोकरी मिळेल अशा आपेक्षा 2019 पासून सर्वांनाच लागल्या होत्या. पण सर्व काही निराशामय आहे.  याचा कळस म्हणजे काल स्वप्नीलने आत्महत्या केली,  सभागृहात चर्चा मात्र 12 आमदारांचीच झाली. पण तरुणांचे १२ कोणी वाजवले यावर कोणीच बोलत नाही.  उठ-सुठमहाराष्ट्र नं. 1 आहे म्हणून ‘जय महाराष्ट्रर' म्हणणाऱ्यांनी  थोडं बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश कडे बघावं अशी  म्हणायची वेळ आली आहे का? 


उठसुठ बिहार आणि उत्तरप्रदेश या राज्यांना दोष देणारे महाराष्ट्र सरकार जनतेची दिषाभूल करत आहे. बिहारी आणि युपीचे लोक महाराष्ट्रात रोजगार मागायला येतात असे टोमणे मारते आहे. परंतु ते हे लक्षात घेत नाही की, युपी असो की बिहार लोकसेवा आयोगाचे काम महाराष्ट्राच्या कितीतरी पुढचे आहे. इतकेच नव्हे तर या राज्यात प्राध्यापक  भरती देखिल आयोगाच्या मार्फतच होते. शिवाय मागच्या दोन वर्शात जे युपीएससी चे निकाल लागले त्यात 1700 पैकी 1000 हून अधिक यशस्वी विद्यार्थी हे एकटया बिहारचे आहेत. शिवाय महाराष्ट्रात 2012 पासून प्राध्यापक भरती बंद असताना म/यप्रदेष, बिहार, उत्तर प्रदेष या राज्यांनी आयोगाच्या मार्फत हजारो प्राध्यापकांची भरती मागच्या दोन वर्षात केली आहे. आज महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या केंद्रीय लाकसेवा आयोगामार्फत आलेल्या अधिकाऱ्यांवर एक नजर टाकली तर यात सर्वाधिक अधिकारी हे बिहारचेच आहेत.

    तरीही आम्ही बिहार, उत्तर प्रदेष, मध्यप्रदेश  यांच्यापेक्षा प्रगत आहोत हेच आमचे सरकार सांगत आले आहे. 2019 ला सत्तेत आल्यावर एक महिन्याच्या आत पोर्टल बंद होईल असे आश्वासन  काही नेत्यांनी दिले होते. आज दोन वर्ष  पूर्ण होत आले आहेत. पोर्टल बंद करणे तर सोडाच, पोर्टल हा शब्द देखिल ते उच्चारत नाहीत. निवडणूकीपूर्वी नोकरभरतीची दांडगी आश्वासने दिली गेली. त्यावर कोणीही बोलत नाही. मागच्या दोन वर्षापासून एकच चर्चा आहे. सरकार टिकेल की पडेल. संजय राउत आणि शरद पवार दररोज बोलतात सरकार टिकेल, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणविस म्हणतात सरकार पडेल आणि काॅंग्रेसचे नेते म्हणतात आम्हाला काही फरक पडत नाही. आणि या तिघांच्याही बातम्या ब्रेकिंग  न्यूज म्हणून महाराष्ट्राची 10 कोटी जनता बघते आहे. दोन वर्ष झाले ते बोलतात, मध्यमे बातम्या देतात आणि आम्ही बघतो आहे.

    12 आमदारांची यादी हारवली म्हणून चिंता करणारे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमत्री अजीत पवार, संजय राउत आणि या सर्वांचे सर्वेसर्वा शरद पवार किमान आठवडयातून एकदा तरी बोलतात आणि त्याच्या मोठ मोठया बातम्याही होतात. पण दोन वर्षपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची यादी हारवली आहे यावर यातले कोणीही बोलत नाही. त्यांना ही यादी महत्वाची वाटत नाही का? या व्यतिरिक्त 12 आमदारांची यादी हरवली म्हणून संपादकीय लिहणारे यावर साधी बातमीही लिहित नाहीत. असं सरकारचं कोणतं काम या 12 आमदारांमूळे आडलं आहे. ज्याच्यामूळे सरकारचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आतोनात नुकसान झाले आहे. यावर किमान एक तरी लेख संजय राउत यांनी ‘सामना’ मधून लिहला पाहिजे. पण ते लिहणार नाहीत. कारण सरकार बनणार, टिकाणार आणि असेच पाच वर्ष जाणार हीच आपेक्षा संजय राउत यांची आहे आणि त्यासाठी ते जीवाचे रान करुन हाॅस्पीटलमध्ये  अॅडमीट होउनही लिहीत असतात. पण पत्रकार या नात्याने ते आम्हा तरुणांच्या प्रश्नावर काहीच लिहीत नाहीत आणि लिहणारही नाहीत.

    आज सरकारच्या याच भूमिकेचा निशेध म्हणून स्वप्नील लोणकर यांनी आत्महत्या केली. खरे तर त्यांनी आत्महत्या केली नाही तर, तू एमपीएससी का करतो? असा प्रश्न विचारुन त्याला फासावर लटकवले आहे.  इथून पुढे सरकारकडे नोकरी मागणाऱ्यांची आवस्था स्वप्नीलसारखीच होणार आहे. कारण सरकार हे जनतेसाठी असते हे सरकारमधील लोकही विसरलेत आणि जनताही हे विसरुन गेली आहे. त्यामूळे सरकारी नोकरीचे प्रत्येक मैदान हे तरुणांसाठी स्मशान  बनत चालले आहे. 



    खरे तर लोकप्रतिनिधींनी तरुणांचे माय-बाप कसे होता येईल याचा विचार करावा. मागच्या अनेक दिवसापासून 12 आमदारांची यादी हरवल्याचे दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा  दोन वर्षपासून हरवलेली एमपीएससीची यादी शोधली असती तर आज स्वप्नीलने आत्महत्या केलीच नसती.

 खरे तर, फडणवीस सरकारने मागच्या ५ वर्षात नोकर भरती बंद करून तरुणांच्या आयुष्याचे १२ वाजवले म्हणून तरुणांनी नवीन सरकार निवडून दिले.  पण याही सरकारने वेगळे काही केल्याचे दिसत नाही. हेही १२ आमदारांच्या चर्चेच्या पुढे जाऊ शकले नाही. एखाद्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने आभाळाकडे बघावे तसे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले तरुण अजूनही १२ मतीकडे डोळे आणि कान लावून बसलेले आहेत.  १२ आमदारांचा प्रश्न बाजूला ठेऊन तरुणांचे १२ कोणी वाजवले यावर ते  नक्कीच विचार करतील.  कारण ते जाणते राजे आहेत  यावरच सद्या तरुणाई चर्चा करत आहे.  


हेही वाचा 

फुले, शाहू , आंबेडकरांचे नाव घेऊन दुकानदारी 

 दलित कुटुंबाच्या खात्यात थेट 10 लाख

छत्रपतींच्या राज्याभिषेकात दडलंय काय?  

Thursday, July 1, 2021

फुले, शाहू , आंबेडकरांचे नाव घेऊन दुकानदारी

 


 फुले, शाहू , आंबेडकरांचे नाव घेऊन दुकानदारी 



    फुले, शाहू , आंबेडकरांचे  नाव घेवून  महाराष्ट्रात अनेक नेते आपली दुकानदारी चालवतात असा आरोप भाजप चे विधान परिशद सदस्य आ. गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. खरे तर या आरोपात किती तथ्य आहे याची जाणीव फुले,  शाहू , आंबेडकरांच्या अभ्यासकांना आहेच.


जवळपास सर्वच राजकीय पक्ष फुले,  शाहू , आंबेडकरांचे नाव घेतात परंतु त्यांच्या पावलावर चालत नाहीत. हे उघड वास्तव आहे. सर्वच नेते आम्ही यांचे कसे अनुयायी आहोत हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतात. प
त्यांनी जो इथल्या शोषित , वंचित समूहाच्या उन्नतीचा मार्ग दिला त्याचा विचार कोणही करत नाही. 


म. फुलेंनी पहिल्यांदा गुलामगीरी, शेतकऱ्यांचा असूड, तृतीय रत्न अशा   अनेक लिखानातून बहुजन समाजाच्या व्यथा मांडल्या आणि त्यावर उपाय देखिल सुचविले. तर सामाजिक न्यायाचे जनक राजर्शी  शाहू  महाराज म्हणायचे, ‘शासनकर्ता जर आईबापासाखा असेल तर तो प्रजेपैकी दुबळया विभागाकडे खास लक्ष देतो आणि ता तसा नसेल तर ज्यांचे चांगले चालले आहे त्यांनाच अधिक देतो आणि जे दुबळे आहेत त्यांना आर्थिक दुर्बल करतो. पहिला समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पावले टाकतो, तर दुसरा विशमता वाढवतो.’ पुढे जावून या दांघांच्याही विचारांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत स्थान दिले आणि आपला सामाजिक न्यायाचा दृष्टीकोण स्पश्ट केला. 


    परंतु आज या सामाजिक न्यायाच्या संकल्पनेकडे आणि संविधानातील तरतुदीकडे जवळपास सर्वच सत्ताधाऱ्यांनी  दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच आरक्षणाचा अनुशेष भरला जात नाही, कोणत्याही कल्याणकारी योजना गरीबांपर्यंत पोहचत नाही, संविधानात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था असतानाही गरीबांना शिक्षण दिले जात नाही. गरीबांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी सर्वच महामंडळे कुलुपबंद आहेत. प्रत्येक योजनेला काही ना काही खोडा घालून सरकारच बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. सामाजिक न्यायाचा निधी दुसरीकडेच वळवला जात आहे. सामान्य जनांवरचे अन्याय अत्याचाराचे प्रमाण देखिल वाढले आहे. हे सर्व या नेतेमंडळींना माहीत नाही अशातला भाग नाही. परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. 


    अ
शा परिस्थितीतही हे नेते स्वतःला फुले, शाहू, आंबेडकरांचे अनुयायी समजतात आणि आपण हे सर्व बघून, ऐकून, दुर्लक्ष करतोय. याच्यावर चळवळींनी विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्याला काय वटते? आणि काय करणे गरजेचे आहे? याचा विचारही होणे आपेक्षित आहे.  


नुकतेच काल तेलंगणा सरकारने अशा लोकांचा विचार करून त्याच्यासाठी नवी योजून आखली आहे. व त्यासाठी ४० हजार कोटींची तरतूदही केली आहे. [कालच्या ब्लॉग मध्ये मी त्यावर स्पष्ट लिहले आहे.] याचा विचार स्वतःला  पुरोगामी म्हणून घेणारे सरकार करनार आहे का? जर करत नसेल तर पडळ करांचा आरोप खरा समजावा लागेल. 



कालचा ब्लॉग

दलित कुटुंबाच्या खात्यात थेट 10 लाख


   Note :  गोपीचंद पडळकरांनी जो आरोप केला आहे? यात आपल्याला काही तथ्य वाटत असेल तर नक्की विचार करा आणि काय केले पाहिजे यावरही विचार करा.


Wednesday, June 30, 2021

दलित कुटुंबाच्या खात्यात थेट 10 लाख

 

 


दलित कुटुंबाच्या खात्यात थेट 10 लाख 


डाॅ. ह. नि. सोनकांबळे

 

 
    अटलबिहारी वाजपेयी यांनी सामाज कल्याण खात्याचे नाव बदलून सामाजिक न्याय असे केले आणि अनुसूचित जाती-जमातीच्या आर्थिक उन्नतीला ब्रेक लागला. तदनंतर कोणत्याही सरकारने या समूहाच्या विकासासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामूळे या समूहातील दारिद्रय रेशेेचे प्रमाण कमी होवू शकले नाही. केंद्रसरकारने तर नेहमीच हात झटकले. पण राज्य सरकारे देखिल याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. बजेट मांडत असताना आर्थिक तरतुद तर केली गेली. परंतु हे बजेट एक तर परत पाठवले जावू लागले किंवा दुसरीकडे वळवले जावू लागले. याचा अनुभव गेली अनेक वर्ष महाराष्ट्र  घेत आला आहे. 


    सध्याच्याही सरकारमध्ये असलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही यापेक्षा काही वेगळे केल्याचे दिसत नाही. परंतु या सर्व परंपरलेला तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर  राव यांनी बाजूला सारुन एक नवा आदर्श  निर्माण केला आहे. त्यांनी ‘मुख्यमंत्री दलित अधिकारीता कार्यक्रमांतर्गत’ दलित कुटंुबाच्या खात्यात थेट 10 लाख रुपयांच्या मतदीची घोषणा केली आहे. सुरुवातीला या योजनंअंतर्गत पहिल्या वर्षी 119 विधानसभा मतदारसंघातून 11,900 कुटंुबाची निवड केली जाणार आहे. या कुटंुबाच्या खात्यात थेट 10 लाख रुपयांची मदत जमा केली जाणार आहे. 



    ही योजनेसाठी येणाऱ्या  चार वर्षात  40 हजार कोटींची तरतुद केली जाणार असून दरवर्षी 119 विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी 100 कुटंबाची निवड केली जाणार आहे. 


    सध्या सत्तेत असलेल्या  टीआरएस पार्टीचा असा दावा आहे की, या योजनमूळे येणाऱ्या  काळात दलितांचा आर्थिक विकास होईल व राज्यातील दारिद्रयाचे प्रमाण देखिल कमी होईल. 


    सध्या देषभरात रोजगाराचा मोठा प्रश्न  निर्माण झाला असून अनेकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. अशा  परिस्थितीत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या या निर्णयाने हजारो कुटंबांना आधार दिला आहे. त्यामूळे चंद्रशेखर राव यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

 



    इतर राज्यांच्या सरकारने देखिल दारिद्रय निर्मुलनासाठी याचा विचार करणे आपेक्षीत आहे. कारण सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी शाहू महाराज म्हणायचे, ‘शासनकर्ता जर आईबापासाखा असेल तर तो प्रजेपैकी दुबळया विभागाकडे खास लक्ष देतो आणि ता तसा नसेल तर ज्यांचे चांगले चालले आहे त्यांनाच अधिक देतो आणि जे दुबळे आहेत त्यांना आर्थिक दुर्बल करतो. पहिला समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पावले टाकतो, तर दुसरा विषमता वाढवतो.’ टीआरएस चे सरकार हे शाहू महाराज म्हणतात त्या प्रमाणे तेथिल जनतेला ‘आई बापासारखे’ वाटत आहे. 

 

विनंती : 

आपल्याला माझे लेख / ब्लॉग आवडत असल्यास वर उजव्या बाजूला असलेल्या Follow या बटनावर click करायला विसरू नका. 

टीप: लेखातील कोणताही मजकूर कोठेही कॉपी पेस्ट करू नये. शेअर करावासा वाटल्यास केवळ लिंक शेअर करावी.

 

Saturday, June 5, 2021

छत्रपतींच्या राज्याभिषेकात दडलंय काय?



छत्रपतींच्या राज्याभिषेकात दडलंय काय? 

डाॅ. ह. नि. सोनकांबळे


डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी शुद्र पूर्वी कोण होते? या ग्रंथाचा शेवटचा भाग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर लिहला तर हा ग्रंथ त्यांनी महात्मा फुले यांना अर्पण केला आणि या देशातील बहुजनांना ऐक्याचे सुत्र दिले. पण हे सूत्र आजच्या राजकीय पार्श्वभूमीवर आम्ही समजून घेणार आहोत का? 


हू अॅम आय? हा प्रश्न जेव्हा आम्ही स्वतःला विचारतो तेंव्हा अडीच हजार वर्षापुर्वीचा इतिहास आम्हाला आठवायला लागतो जो इतिहास डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शुद्र पुर्वी कोण होते? या प्रचंड संशोधन करुन लिहलेल्या ग्रंथाकडे घेवून जातो. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना हे संशोधन करुण हा ग्रंथ लिहण्याची गरज का भासली असावी असा एक प्रश्न  आपल्यासमोर उभा राहतो. त्याचे उत्तर देखिल डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनीच दिले आहे. ते म्हणतात, जे लोक आपला इतिहास विसरतात ते लोक इतिहास घडवू शकत नाहीत. याचा अर्थ डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याकडून एका नव्या इतिहासाची आपेक्षा होती. परंतु आजूनही आम्ही आमचा इतिहास समजून घेतला नाही आणि जरी घेतला असेल तर  त्या इतिहासाचे मूळ घेऊन नवीन इतिहास घडवण्यासाठी आम्ही पेटून कधीच उठलो नाही. . 

खरे तर नवा इतिहास घडवायचा असेल तर आपल्याला आपल्या पुर्वजांचा इतिहास माहित असणे आवश्यक असते. म्हणून शुद्र पुर्वी कोण होते या ग्रंथाच्या  माध्यमातून आमचा इतिहास आमच्या समोर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवला. परंतु त्याच्या पुढची अॅक्शन आम्ही आजूनही घेतली नाही. आपल्या नंतर अमेरिकेतल्या ब्लॅक लोकांना त्यांचा इतिहास माहित झाला आणि त्यांनी इतिहासाचे धडे घेवून नवीन इतिहासही घडवला. जी क्रांती डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘शुद्र पुर्वी कोण होते? या ग्रंथाच्या माध्यमातून भारतात अपेक्षीत होती. त्याच स्वरुपाची क्रांती अमेरिकेत ‘रुटस’ या ग्रंथाने झाली. कारण अमेरिकन लोकांनी जो दृष्टीकोण ठेवून ‘रुटस’ हा ग्रंथ वाचला ती दृष्टी घेवून ‘शुद्र पुर्वी कोण होते?’ हा ग्रंथ आम्ही भारतीयांनी वाचला नाही. 

अॅलेक्स हॅले या अमेरिकन संशोधकाने दक्षिण आफ्रिकेत जाऊन सतत तेरा वर्श संशोन केले आणि 1976 साली ‘रुटस्: द सागा आॅफ अॅन अमेरिकन फॅमिली’ नावाचे एक पुस्तक प्रकाशीत  केले. या पुस्तकात त्यांनी ब्लॅक लोकांचा म्हणजेच निग्रांेचा वास्तव इतिहास कुंटा किंटे या पात्राच्या रुपाने मांडला आणि त्यांच्यासोबत इतिहासात गोऱ्या  लोकांनी कसा व्यवहार केला याचे वास्तव आणि पुराव्यासह चित्र मांडले. ब्लॅक लोकांना गुलाम बनवून त्यांची कशा  प्रकारे विक्री केली जायची याचे वास्तव त्यांनी या पुस्तकात मांडले. एका देशातून दुसऱ्या  देशांत गुलाम घेऊन जात असताना ते सर्व गुलाम एका बोटीवर भरले जायचे. समुद्र मार्गे प्रवास करत असताना ज्या देशात हे गुलाम विकायचे आहेत त्या देशात पोहचायला महिना दोन महिने लागायचे आणि याच दरम्यान या गुलामांना मारहाण व्हायची, त्यांना खायला मिळायचे नाही, बोटीवर उपाशिपोटी काम करावे लागायचे अशा अनंत यातना सहन करत ते दुसऱ्या। देशात पोहचायचे आणि तिथे गेल्यावर यांच्या विक्रीचा प्रचंड मोठा व्यवहार व्हायचा. 

जर एका देशातून ही बोट दोनशे गुलाम घेवून निघाली तर दुसऱ्या  देशात केवळ शंभर ते एकशे  विस गुलाम पोहचायचे. कारण महिना दोन महिने प्रवास करत असताना कोणी आजारी पडून, कोणी उपाशी पोटी असल्याने, तर  कोणी काम करता करता असेच मरायचे. या आजारी पडलेल्यांना, मेलेल्यांना आणि कामासाठी योग्य नसलेल्या गुलामांना या बोटीतला व्यापारी जाता जाता समुद्रातच फेकुन द्यायचा म्हणून दोनशेपैकी केवळ शंभर ते एकशे विसच गुलाम तिथपर्यंत पोहचायचे. हा सर्व इतिहस अॅलेक्स हॅले यांनी शोधून काढला आणि 1976 साली ‘रुटस्ः द सागा आॅफ अॅन अमेरिकन फॅमिली’ या पुस्तक रुपाने प्रकाषित केला आणि अमेरिकन लोकांनी तो झपाटल्यासारखा वाचला. 

अॅलेक्स हॅले च्या हे लक्षात आले की, काही अशिक्षीत लोकांना हा इतिहास वाचता येत नाही. त्यांच्यासाठी त्याने या पुस्तकावर आधारीत आठ भागाची एक टिव्ही मालिका तयार केली आणि त्या माध्यमातून ब्लॅक लोकांना त्यांचा इतिहास माहित करुन देण्यात आला. असे म्हणतात की, जेव्हा ही मालीका टीव्ही वर दाखवली जायची तेव्हा अमेरिकेतल्या शहरातल्या रस्त्यावरची सत्तर टक्के वाहतूक कमी व्हायची. इतका जाणीवपूर्वक इतिहास तिथल्या लोकांनी जाणून घेतला. पुढे याच पुस्तकाने नवी क्रांती केली. आपला संपुर्ण इतिहास या लोकांना माहित झाल्याने हे लोक काळया आणि गोऱ्या या भेदभावाच्या वरोधात संघटीत व्हायला लागले. सतत्यांने पंचवीस वर्ष केवळ संघटन आणि संघटनच त्यांनी केले आणि पंचेविस वर्षानंतर त्यांनी अमेरिकेत क्रांती घडवून आणली  ‘बराक ओबामा’ नावाच्या एका ब्लॅक मानसाला त्यांनी अमेरिकेचे राश्ट्राध्यक्ष केले. 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘शुद्र पुर्वी कोण होते?’ या पुस्तकाच्या माध्यमातून अशीच क्रांती आपेक्षित होती. परंतु आम्ही आजूनही डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या  गभीरपणे समजून घेत नाही. ज्या प्रमाणात अॅलेक्स हॅले च्या पुस्तकाला अमेरिकेतील ब्लॅक लोकांनी समजून घेतले. त्यांच्याप्रमाणे आम्ही इतिहास वाचून त्यांच्याप्रमाणे अमपानाच्या विरोधात उभेच राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळी दिलेली वर्तणुक, राजर्शी शाहू महाराजांचे वेदोक्त प्रकरण, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना दिलेली वर्तणुक आणि त्यांना फेकुण मारलेल्या शेणाचा अर्थ आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची या सर्व इतिहास संषोधनामागची भूमिका आणि त्यांना दिलेली वर्तणुक याचा अन्वयार्थ अजूनही आम्ही लावला नाही. 

खरे तर शुद्र पुर्वी कोण होते? या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले यांच्या वारसदारांना एकत्र आणण्याचे सुत्र आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी शुद्र पूर्वी कोण होते? या ग्रंथाचा शेवटचा भाग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर लिहला तर हा ग्रंथ त्यांनी महात्मा फुले यांना अर्पण केला आणि या देशातील बहुजनांना ऐक्याचे सुत्र दिले. पण हे सूत्र आजच्या राजकीय पाश्र्वभूमीवर  आम्ही (मराठा-ओबीसी-एसी) समजून घेणार आहोत का? हा खरा प्रश्न आहे. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !


हेही वाचा

राजीव सातव : तांडवी राजकारणातला सायलेंट नेता


चीन सध्या काय करतोय?


ऍड. बाळासाहेब आंबेडकर : वंचितांचा मसिहा

Saturday, May 29, 2021

बाबासाहेबांच्या स्पर्शाने विहिरीचे सोने झाले



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झाला अन विहीरीचे सोने झाले. विहिरीची इतिहासात नोंद झाली. 


२९ मे १९२९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा या गावी दौरा होता. या गावातील अस्पृश्य मंडळींनी दोन दिवसीय अस्पृश्य परिषद येथे भरवली होती. अतिशय दुर्गम भागात असलेले हे गाव आजही येथे पोहचण्यास अडचणी येतात. 29 मे च्या उन्हाळ्यात बाबासाहेब या गावातील जि. प. च्या शाळेत दोन दिवस मुक्कामी होते. या गावातील विहीर बाबासाहेबांनी अस्पृश्यासाठी खुली करून दिली. आजही हि विहीर जशास तशी आहे. बाबासाहेबांचा स्पर्श झालेली ही विहीर आता स्मारक म्हणून इतिहासात नोंदवली गेली आहे. 



 बाबासाहेबांची  ही पातुर्डा भेट केवळ एक घटना नव्हती तर, चळवळीतील ऐतिहासिक नोंद होती. बाबासाहेबांच्या आगमनाने जिल्ह्यातील दलित चळवळीला उभारी मिळाली. या भेटीनंतर अनेक कार्यकर्त्यांंनी चळवळीत स्वत:ला झोकून दिले. 



या दोन दिवसीय अधिवेशनासाठी त्यांच्यासोबत त्यावेळी रा.पी मटकर, रा. सोनोने, . मकेसर ,  केशवराव खंडारे , संभाजी जाधव, रायभान इंगळे इ. मंडळी हजर होती. 



मध्यप्रांत व वऱ्हाड अस्पृश्य परिषदेचे हे दोन दिवसीय अधिवेशन होते. संध्याकाळी झालेल्या या अधिवेशनाच्या सुरुवातीला एक ऐतिहासिक घटना देखील घडली. या गावातील  बथुरामजी दाभाडे यांची कन्या कु. कवतिकाबाई आणि सखाराम इंगळे यांचा विवाह सुधारलेल्या पद्धतीने व अल्प खर्चात करण्यात आला होता. यामुळे आपले विवाह कसे असावेत हे बाबसाहेबांनीच सांगितले होते असे अनेक जुनी मंडळी सांगत असतात.



ज्या काळात बाबासाहेब या खेड्यात पोहचले त्या काळात गाड्यांची इतकी काही व्यवस्था नव्हती, रस्ते चांगले नव्हते. नद्या, नाले ओलांडून बाबासाहेबांनी हे गाव गाठले होते.



दरवर्षी शासनाच्या वतीने या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श सोहळा साजरा केला जातो. मलाही व्याख्यानांसाठी या गावातील मंडळींनी या ऐतिहासिक पर्वाला निमंत्रित केले होते. आमचे मित्र पत्रकार रवी इंगळे यांच्यामुळे मला हा सोहळा आणि बाबासाहेबांचा प्रवास अनुभवता आला. गावकरी मंडळी आणि सर्व मित्र परिवाराचे खूप खूप आभार. 


मित्रहो, कधी या भागात गेलात तर नक्कीच या ऐतिहासिक स्मारकाला भेट द्यायला विसरू नका. 

डॉ. ह. नि. सोनकांबळे


कृपया Blog ला Follow करायला विसरू नका. ही विनंती. 


जय भीम! 

हेही वाचा 

जपानच्या डॉक्टरांनी का मागितली राष्ट्राची माफी

मराठा आरक्षण : चुका राज्यकर्त्यांच्या दोष संविधानाला

...हे मुख्यमंत्री लिहणार होते बाबसाहेबांचे चरित्र